आम्ही चालवू, हा पुढे वारसा!
महा एमटीबी   09-Jan-2019

 

 
 
 
 
 
दि. १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांची जयंती. हा दिवस आता राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्वामी विवेकानंदांच्या संन्यस्त वृत्तीचा आजच्या तरुणपिढीला परिचय करुन देणे आवश्यक आहे. कारण, अवघड अशा काळात स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांच्या छत्राखाली स्वतःसमवेत देशातीलच नव्हे, तर विदेशातील लोकांनाही घडवले. विवेकानंद हे एक योद्धा संन्यासी होते. एका संन्याशाने काळानुसार लोकांमध्ये जागृती निर्माण केली. शरीर व्यायामाने मजबूत, निरोगी बनवायला सांगितलं. आरोग्यसंपन्न, शक्तीशाली देहामध्ये निरोगी मन राहू शकतं. असंच मन संयमी, सोशिक होऊन समाजाची सेवा करू शकतं. सावध, साक्षेपी वृत्तीनं समाजाला घडवू शकतं. प्रत्येकाने संन्यास दीक्षा घेऊन संन्यासी होण्याची गरज नाही. संन्यासी ही वृत्ती आहे.
 

सगळीकडे चंगळवाद, भौतिकवाद पसरलेला आहे. ‘मी आणि माझा’ याला अतिमहत्त्व आलेलं आहे. व्यक्तिगत सुखाचा, आरामाचा विचार जास्त केला जातो. अशा वातावरणात समाजाचा, सात्विकतेचा विचार टिकवून ठेवणं अवघड जातं. अवघड गोष्टी टिकवून ठेवण्याचा वसा घेतलेली मोजकी माणसं आहेत. वसा घेऊन तोच वारसा पुढे चालवण्यासाठी विशिष्ट लोकांना तयार करावं लागतं. यासाठी कष्ट आणि त्याग करावा लागतो. टीकेला तोंड देताना जो टिकून राहतो ना, तोच पुढे सात्विकतेचा सुंदर सूर आळवू शकतो. काही लोकांना हा सूर आवडायला लागतो. हेच कार्य संत पिढ्यान्पिढ्या करत आहेतहा चंगळवाद शेकडो वर्षांपासून हळूहळू वाढत जाऊन त्याने सध्या उच्चांक गाठलेला आहे. द्वेष, मत्सराचा वणवा सर्वत्र पसरला आहे. त्या वणव्याच्या आगीमध्ये समाजाला सुयोग्य मार्गावर नेणाऱ्या गोष्टींना झळ लागून त्या नष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत संतांची गरज प्रकर्षाने जाणवते. समाजाला प्रेमाने सांभाळणारे संत ही काळाजी गरज आहे. संतांच्या अंगी दैवी गुणांचा उत्कट आविष्कार बघताना सात्विकता, सज्जनता पुनश्च रूजते. रूजून छान रोपं तरारतात. मतभेदांनी भेगाळलेली मनं भरून येतात. हट्टी, दुराग्रही वृत्ती कमी होऊन मवाळपणा येतो. संतांठायी विवेकाची वेल कायम बहरलेली असते. त्यामुळे नको त्या गोष्टींना मनामधून समूळ काढून टाकायला संत साहाय्य करतात.

 

संत बाह्यदृष्टीने तुमच्या-आमच्यासारखेच असतात, परंतु त्यांचं अंतरंग वैराग्याच्या केशरी रंगात रंगून गेलेलं असतं. भक्तीच्या निळसर रंगाला ते सदैव नामाच्या कुंचल्याने रंगवत राहतात. माणसाचं जीवन स्वार्थाच्या रंगाने भडक होऊन जातं. क्रोध, संतापाचे रंग नकोसे वाटतात. कामवासनेचे, विकार, विकृतीचे रंग ओंगळवाणे, किळसवाणे वाटतात. जीवन प्रेम, आपुलकी, स्नेह यांच्या सुंदर रंगाने ते बघत राहावंसं वाटतं. परमात्मा परमेश्वराने मानव जन्म दिलेला आहे. तो कशासाठी दिला आहे? पूर्वसंस्कारांचे विवित्र रंग भगवंताच्या भक्तीने पुसून टाकायचे. साधना, उपासना करून भगवंताच्या रूपाचे, गुणाचे रंग जीवनात भरण्यासाठी नरदेह देऊ केलेला आहे, याचं सातत्याने स्मरण करून देण्याचं काम संत सहजपणाने करत असतात. संत भूलोकीचे चालते-बोलते ईश्वर असतात नं, म्हणून त्यांच्या उपदेशाचं चिंतन करायचं असतं. संत सहवासाने जीवन सुगंधी करायचं असतंमानवजन्म प्राप्त होऊन लोक काय करतात? नको ती कृत्य करून नकोशी होतात. पैशाच्या लोभापायी एकमेकांना त्रास देतात. एकमेकांपासून दूर जातात. दानवी वृत्तीने क्रौर्य करतात. खरंतर संपत्ती, सत्ता सरणावर नेता येत नाही. रिकाम्या हाताने परत जावं लागतं. कित्येकांचे मृत्यू बघूनदेखील माणूस शहाणा होत नाही. याला काय म्हणायचं? मोठे-छोटे असा आग्रह धरून दुसऱ्याला हीन लेखण्यात काय अर्थ आहे? दुसऱ्यावर वर्चस्व गाजवून का कधी कोणी मोठं होतं? किती चुकीचे विचार घेऊन माणसं जगतात. त्यांना अशा विचित्र वृत्तीने शांतीचा लाभ होणं शक्य आहे का? संतच सगळ्यांना जीवन कसं जगावं आणि कशासाठी जगावं ते सांगतात.

 

स्वामी विवेकानंदांनी युवकांना सांगितले की, “डोळे उघडून आजूबाजूला बघा. अनेक जीव द्रारिद्य्रात, अज्ञानात, दु:खात पिचत पडलेले आहेत. त्यांची सेवा स्वत:चा स्वार्थ बाजूला करून करा. दु:खितांचे अश्रू पुसा. उपाशी असलेल्यांना अन्न द्या. आजारी असतील त्यांची शुश्रूषा करा. यामुळेच जीवनांचं सोनं होईल. मनाला शांत वाटू लागेल. संत रामकृष्ण परमहंसांचे लाडके शिष्य विवेकानंद. रामकृष्ण परमहंसाच्या अंत:करणातून निघालेल्या प्रकाशाने विवेकानंदांचं जीवन उजळून उठलं. इतकंच नाही तर समाजातल्या शेकडो लोकांचं जीवन प्रकाशमान केलं. कर्मयोगाचा आदर्श प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद हे श्रेष्ठ कर्मयोगी होते. ते नरेंद्रचे विविदिशानंद झाले. पुढे ते सच्चिदानंद झाले. नंतर ते विवेकानंद झाले. हे त्यांच्या जीवनातील बदलाचे, प्रगतीचे टप्पे आहेत. अवघड अशा काळात स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांच्या छत्राखाली स्वतःसमवेत देश, विदेशातील लोकांना घडवलं. विवेकानंद हे एक योद्धा संन्यासी होते.

 

एका संन्याशाने काळानुसार लोकांमध्ये जागृती निर्माण केली. शरीर व्यायामाने मजबूत, निरोगी बनवायला सांगितलं. आरोग्यसंपन्न, शक्तीशाली देहामध्ये निरोगी मन राहू शकतं. असंच मन संयमी, सोशिक होऊन समाजाची सेवा करू शकतं. सावध, साक्षेपी वृत्तीनं समाजाला घडवू शकतं. प्रत्येकाने संन्यास दीक्षा घेऊन संन्यासी होण्याची गरज नाही. संन्यासी ही वृत्ती आहे. सर्व सुखांचा, सुविधांचा सहजपणाने त्याग करणारी ही वृत्ती आहे. कशाचाही संग्रह न करता अलिप्तपणे जगणं म्हणजे संन्यासी होय. एका एका वासनांची निवृत्ती करून वासनारहित होऊन जगणं म्हणजे संन्यास होय. समाजाला अशाच गुणवान, धैर्यवान लोकांची फार फार आवश्यकता आहे. भगव्या रंगाची वस्त्रं धारण करून कोणी संंन्यासी होत नाही. तो भगवा रंग अंतरात उतरला पाहिजे. काळाप्रमाणे समाजाला समजेल, अशा पद्धतीने जीवन जगायला शिकवणारे संत, संन्यासी महान आहेत. त्यांच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांमुळेच समाज खऱ्या अर्थाने उभा आहे. अशा मूठभर, मोजक्या लोकांना सहकार्य करून समाजाला व स्वतःला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणं, हीच ईश्वरसेवा आहे. हा ईशसेवेचा वारसा आम्हाला चालवायचा आहे.

 
 
- कौमुदी गोडबोले
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/