क्षण कसोटीचे
महा एमटीबी   09-Jan-2019
 
 
 

जर आपण आयुष्यातली प्रत्येकच परीक्षा/कसोटी सिरिअसली घेतली समजा आणि त्यातून बाहेर पडण्याचा विचार जणू जीवनमरणाचाच विचार मानला, तर सगळाच घोळ होईल. प्रत्येक आव्हान आपण पेललेच पाहिजे, प्रत्येक जबाबदारी आपण पार पाडलीच पाहिजे, या जिद्दीने जीवाची अशी तगमग केली तर आपणच आपला ‘छळ मांडियेला’ म्हणावे लागेल.

 

परीक्षा म्हणजे मुलांसाठी आ वासून उभा असलेला अक्राळ-विक्राळ राक्षसच जणू. खाऊ का गिळू अशा अविर्भावातला राक्षस. पालकांची तर मनःशांती, झोप आणि पैसा सगळेच या राक्षसाने हिरावून घेतलेले. या ना त्या क्लासेससाठी पैसे, तर वेगवेगळ्या विषयाच्या ट्यूटरसाठी पैसे. सीईटी जणू आजच्या शैक्षणिक युगातला दहशतवादाचा नमुना म्हणायला हरकत नाही. माझी भाचीसुद्धा या सीईटीला बसलेली. सकाळचा फिजिक्स, केमिस्ट्रीचा पेपर म्हणे सगळ्या मुलांना कठीण गेला होता. सगळेच घाबरलेले. बरोबर आधाराला आलेले आई-बाबा, काका, मामासुद्धा मनातून हादरलेले. मुलांना कसेबसे समजावत होते की, आता घाबरू नका. पेपर्स सगळ्यांनाच कठीण गेलेत. तेव्हा पुढच्या मॅथ्सच्या पेपरकडे लक्ष द्या. मी जेव्हा तिला विचारले, “बेटा, पेपर कसा गेला?” तेव्हा ती म्हणाली, “सकाळच्या पेपरमुळे मूड बिघडला व त्याचा परिणाम माझ्या दुसर्‍या पेपरवरसुद्धा झाला. नाहीतर पेपर मला आणखी बरा गेला असता.” ती हे सांगत असताना मला माझ्या शिक्षकांनी सांगितलेले वाक्य आठवले. ते म्हणाले होते, “आयुष्य ही प्रत्येक क्षणाची कसोटी आहे.” खरेच नाही का ते? आयुष्य हे खर्‍या अर्थाने कसोटीच आहे. म्हणूनच त्याचा परिणाम आपल्या अपेक्षेपेक्षा सर्वार्थाने वेगवेगळा असतो. म्हणूनच आपण जे जे ठरवितो किंवा जसजसे इच्छितो तसे घडेलच असे नाही. मग आपण या आयुष्याला इतके गंभीर का बरे घ्यायचे? एखाद्या कसोटीत आपण खरे नाही उतरलो तर मग इतके विद्ध का व्हायचे? प्रॅक्टिकली म्हणायचे झाले तर आयुष्याला इतके वेड्यासारखे गंभीरपणे घेतले नाही तर बरेच! व्यावहारिकदृष्ट्या तेच जास्त योग्य आहे.

 

जर आपण आयुष्यातली प्रत्येकच परीक्षा/कसोटी सिरिअसली घेतली समजा आणि त्यातून बाहेर पडण्याचा विचार जणू जीवनमरणाचाच विचार मानला, तर सगळाच घोळ होईल. प्रत्येक आव्हान आपण पेललेच पाहिजे, प्रत्येक जबाबदारी आपण पार पाडलीच पाहिजे, या जिद्दीने जीवाची अशी तगमग केली तर आपणच आपला ‘छळ मांडियेला’ म्हणावे लागेल. कारण, ज्या ज्या गोष्टी आपण कसोटीसदृश्य मानल्या व त्यातून यश मिळण्यासाठी जीवाची ससेहोलपट केली व शेवटी हाताला काही लागलेच नाही, तर मग आपण जीवनात खाचखळग्यांचा रस्ता स्वत:च्याच हातांनी बनविला म्हणायला हरकत नाही. म्हणूनच खूप गंभीर न होता आयुष्यातल्या आव्हानात्मक घटना, जबाबदार्‍या, कठीण प्रसंग यांना फक्त कसोटीचे प्रसंग समजून त्यातून आपल्याला काय मिळविता येईल, हे पाहावयाचे. या प्रसंगातून आपण काही धडा घेत गेलो, शहाणपण शिकलो, कुठल्या चुकांची पुनरावृत्ती करायची नाही, हे शिकलो म्हणजे या खाचखळग्यांच्या बाहेर बर्‍यापैकी अर्थपूर्ण आयुष्य आहे, हे कळते. आपण आता तग धरला तर आयुष्यात आज जरी मार खावा लागला तरी उद्या पुढे जाणे शक्य आहे, याची हळूहळू खात्री पटेल.

 

प्रत्येक कसोटीत इतके जरी आपण शिकलो तरी खूप आहे. आपण नोकरीच्या इंटरव्ह्यूत प्रत्येक वेळा मार खाल्ला तर नक्की स्वत:ला विचारू शकतो ना की, आपल्याच बाबतीत हे का घडते आहे? ही माझ्या आयुष्यातली कसोटी आहे ? यातून बाहेर येण्यासाठी मी काय करू? मला माझी स्टाईल बदलायला हवी आहे का ? मला या कसोटीतून काही डावपेच शिकता येतील का? म्हणजेच आपण अपयशी होत चाललो आहे, या गंभीर विचारातून खच्ची होण्यापेक्षा या कसोटीतून ‘मी काय धडा घ्यायला पाहिजे’, हे शिकणे केव्हाही फायद्याचेच ठरणार. म्हणूनच आयुष्य हे एक कसोटीचे मैदान आहे. आपला खेळ आपण खेळायचा. खेळताना चुकलो तर का व कसे याचा मनात विचार करून दुसर्‍या डावात थोडे जास्त शहाणे व्हायचे. काही छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा एक निर्भेळ आनंद देऊन जातात. या गोष्टी आपल्या मनातून सहज उत्पन्न होतात. कुठलेही अवडंबर त्यात नसते. त्या गोष्टी आपण प्रत्यक्षात केल्या की, मनाला एक निखळ आनंद मिळतो. थोडक्यात सांगायचे तर आयुष्यातल्या प्रत्येक आव्हानाला शांतपणे सामोरे गेले तर शेवटी फायदा आपलाच आहे.

 - डॉ. शुभांगी पारकर 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/