जात्यावरील ओवी ते रेडिओ जॉकी
महा एमटीबी   09-Jan-2019

 


 
 
 
अशिक्षित असूनही केराबाई सरगर यांनी केवळ आवड आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ‘रेडिओ जॉकी’ म्हणून आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
 

रेडिओ जॉकीम्हटले की समोर येतो तो मनाला भुरळ घालणारा एक तरुण, तडफदार आणि अतिशय ऊर्जावान आवाज. पण, ‘रेडिओ जॉकी’साठीच्या या मापदंडांमध्ये कदापि न बसणारी, तरीही ‘रेडिओ जॉकी’ म्हणून मान, सन्मान, नाव कमवणारीही एक व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातच कार्यरत आहे. या आगळ्यावेगळ्या, मराठमोळ्या ‘रेडिओ जॉकी’ने आपल्या आवाजाने माण तालुक्यातील दीडवाघवाडीच्या जवळपासच्या अनेक गावांना भुरळ घातली आहे. त्यांचे नाव आहे केराबाई सरगर. कानाला हेडफोन लावून माईकच्या समोर नऊवारी साडी, डोक्यावर पदर, कपाळावर भलंमोठं कुंकू, हातात डझनभर हिरव्या बांगड्या, कमरेला चांदीचा कंबरपट्टा, पायात ठोकाळ जोडवी अशा अस्सल माणदेशी पेहेरावातील केराबाई. माणदेशी (माण, जि. सातारा) ठसक्यातील आवाजात ‘समाजसुधारणेचं हे संविधान’ गाणं गाताना केराबाई मग्न झालेल्या असतात.

 

“नमस्कार....

९०.४ वर आपण ऐकत आहात,

माणदेशी तरंगवाहिनी....

मी केराबाई सरगर आपल्यासमोर सादर करत आहे, संविधान ओवी...

सुंदर माझं जातं गं, फिरतं बहुत...’

ओवी गाऊ कौतुकात,

गाऊ या संविधान...’

पहिली माझी ओवी गं,

भीमाच्या लेखणीला।

विद्रोहाचं इचार रुजवून

शानं केलं लोकांना॥

दुसरी माझी ओवी गं,

सुधारकांच्या वारश्याला।

अस्तित्वाचं जिणं सांगून

शिकवलं लोकांना॥

 

वयाची ५९ वर्षं पूर्ण करून साठीकडे झुकलेल्या या आरजे (रेडिओ जॉकी) केराबाईंचा उत्साह तरुणाईलाही लाजवेल असा. रेडिओचे कोणत्याही प्रकारचे पारंपरिक/व्यावसायिक प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नाही. परंतु, केवळ गाण्याची आवड आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी इथवरचा पल्ला गाठला आहे. माण तालुक्याच्या ग्रामीण भागातील केराबाईंसारख्या अनेक महिला शहरातील अगदी नामांकित संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या आरजेंनादेखील लाजवतील अशा स्वरूपात आपल्या श्रोत्यांसाठी माणदेशी तरंग वाहिनीच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करत असतात.

 

संपूर्णत: ग्रामीण भागातील महिलांनी, महिलांसाठीच चालवलेले कम्युनिटी रेडिओ (सामाजिक नभोवाणी केंद्र) म्हणून माणदेशी तरंग वाहिनी प्रसिद्ध आहे. या रेडिओ वाहिनीवर ‘आरजेईंग’ करणाऱ्या केराबाईंनी चार भिंतींच्या शाळेतील पुस्तकी शिक्षण जरी घेतले नसले तरी दैनंदिन जीवनातील अनुभवांच्या/यातनांच्या शिदोरीवर त्या आपले म्हणणे लोकांच्या पुढ्यात मांडत असतात. आपल्या कलागुणांचे सादरीकरण, समाजप्रबोधन करतानाचा त्यांचा उत्साह नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. “रेडिओ वाहिनीत जाऊ नकोस म्हणून माझ्या मुलाने-सुनेने कधीही अडवले नाही. माझे मालक तर म्हणत्यात, तरुणपणात लय जाच सहन केलायस माझा, पण आता तुझं दिवस चांगलं आलंत. त्यामुळं एकादं काम राहिलं तरी चाललं, पण वाहिनीतून फोन आला की, जात जा तू,” असे त्या सांगतात.

 

केराबाईंना गाण्याचे बाळकडू त्यांच्या आईकडूनच मिळाले. त्यांची आई जात्यावरील ओव्या म्हणत असे. ते ऐकून केराबाईंनीही दळतादळता या ओव्या गायला सुरुवात केली. गाणे म्हणता म्हणता त्यांना गाणे म्हणण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर पुस्तकांतील गवळणी, अभंग लक्षात ठेवून त्यावर त्यांनी गाणी बनवली. हळूहळू त्यांना गाण्याचा छंदच लागला. पण, त्यांच्या आवडीला एके दिवशी अचानक कलाटणी मिळाली. एकदा त्या म्हसवडला कांदा घेऊन बाजाराला विकायला गेल्या होत्या. तेव्हा रस्त्यात त्यांनी एक रेडिओ विकत घेतला. त्या रोज रेडिओवर लागणारे कार्यक्रम ऐकू लागल्या. त्यांना कार्यक्रमातील लता मंगेशकर, दादा कोंडके यांची गाणी खूप आवडायची. तेव्हा त्यांना वाटायचे की, माझा आवाजदेखील चांगला आहे. मलादेखील केंद्रावर जाऊन अशी गायनाची संधी मिळावी. मला एकदा केंद्रावर जाऊन भजन, ओव्या, पाळणा म्हणायचा आहे, ही आपली इच्छा त्यांनी आपल्या मुलांना बोलून दाखविली. पण, त्यांच्या घरच्या सदस्यांनाही या केंद्रात जायचे कसे याबाबतचीही माहिती नव्हती. एक दिवस म्हसवडच्या बाजाराला गेल्यावर त्यांच्या मोठ्या मुलाला माणदेशी तरंग वाहिनीचं पोस्टर दिसलं. तो केराबाईंना मग थेट केंद्रावरच घेऊन गेला. अशाप्रकारे जात्यावर गाणाऱ्या केराबाई यांचा तरंग वाहिनीबरोबर प्रवास सुरू झाला. ओव्या, भक्तिगीते, भजने, महिलांच्या यशोगाथा यांसारखे अनेक नावीन्यपूर्ण कार्यक्रम करणाऱ्या आरजे व प्रोग्रॅमर या माणदेशी तरंग वाहिनीच्या स्टुडिओमध्ये पाहायला मिळतात. केराबाई आनंदाने सांगतात की, “या वाहिनीमुळे केंद्रावर गाण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. माझ्यासारख्या अडाणी बाईला त्यांनी कुठलेही टेन्शन न घेता, तुम्हाला जे वाटते ते बिनधास्त बोला म्हणून सांगितले. कार्यक्रम झाल्यानंतर गावातील लोक जेव्हा आम्ही तुमचे गाणे ऐकले, तुमचा आवाज चांगला आहे, असे कौतुक करतात, तेव्हा खूपल बरे वाटते.” ते म्हणतात ना, ‘एज इज नो बार,’ तेच केराबाईंचा आवाज ऐकल्यावर म्हणावे लागेल.

 
 
 - नितीन जगताप
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/