जो त्रिविध तापे पोळला ।
महा एमटीबी   09-Jan-2019

 

 
 
 
 
 
 
सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे’ असे आपण नेहमी म्हणतो. याचा अर्थ, सुखाच्या तुलनेत आयुष्यात येणारे दुःख हे अनेक परींनी जास्त आहे, असे आपल्याला सांगायचे असते. मूल जन्माला येण्यापूर्वी गर्भावस्थेत असताना आणि जन्माला आल्यानंतर त्याला अनेक दुःखे भोगावी लागतात. या यातनांचे वर्गीकरण करण्यासाठी तापत्रयाची कल्पना केलेली आहे. हे त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. जगातील अनेक बाह्य वस्तूंचा आपल्या इंद्रियांशी संबंध आल्याने जी दुःखे भोगावी लागतात, त्याला ‘आधिभौतिक ताप’ म्हणतात. बाह्यवस्तूच्या संपर्काशिवाय देह, इंद्रिये आणि प्राण यांच्या संयोगाने माणूस सुखदुःखे भोगत असतो. त्यामुळे जो त्रास सहन करावा लागतो, त्याला ‘आध्यात्मिक ताप’ म्हणतात. मानसिक चिंता, काळजी, नैराश्य हे आध्यात्मिक तापात समाविष्ट आहेत. त्यानंतर आपल्या चांगल्या-वाईट कर्माची फळे भोगावी लागतात. त्याला ‘आधिदैविक ताप’ म्हटले आहे. आधिदैविक तापात काही दुष्कर्माची फळे मृत्यूनंतर भोगावी लागतात. त्याला ‘यमयातना’ म्हणतात. अशा रीतीने या त्रिविध तापांनी माणूस त्रासला की, तो जीवनाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. जीगोष्ट सुखाची म्हणून करायला जावे, तेव्हा त्यापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रापंचिक गोष्टीतून निर्भेळ सुखाची अपेक्षा करता येत नाही. दुःखाशिवाय सुख मिळत नाही, याची त्याला प्रचिती येते. सुखापाठोपाठ दुःख उभे असते. ते भोगावेच लागते. त्यापासून सुटका नसते. अशा स्थितीत माणूस परमार्थाकडे म्हणजे भगवंताकडे वळतो. यासाठी समर्थ सांगतात की, जो तापत्रयाने पोळला आहे, असा माणूस त्यापासून सुटण्याचा मार्ग शोधू लागतो आणि परमार्थाचा विचार करू लागतो. प्रपंचाचे खरे स्वरूप कळल्यावर भगवंताकडे वळलेला माणूस परमार्थाचा अधिकारी होतो. समर्थ सांगतात-
 

तैसा संसारे दुखवला । 

त्रिविध तापे पोळला ।

तोचि येक अधिकारी जाला ।

परमार्थासी ॥ (दा. ३.६.७)

 

दासबोधात बरेच वेळा ओवीची पुनरावृत्ती होते. वेगळ्या संदर्भात ती ओवी पुन्हा आलेली असते. यात द्विरूक्तीचा दोष आहे, असे वाटले तरी समर्थ सांगतात की, “शिष्यांचे अज्ञान घालवण्यासाठी तेच ते पुन्हा पुन्हा सांगावे लागते.” हाच प्रकार या ओवीबाबत झालेला आहे. शिष्य कसा असावा याचे निरूपण करताना दशक ५.३ मध्ये वरील ओवी त्याच रूपात येते.

 

जो संसार दुःखे दुखवला ।

जो त्रिविध तापे पोळला ।

तोचि अधिकारी जाला ।

परमार्थविषीं ॥ (दा. ५.३.३४)

 

पुन्हा मुमुक्ष लक्षण निरूपण करताना या स्वरुपाची ओवी वापरली जाते.

 

संसार दुःखे दुखवला ।

त्रिविध तापे पोळला ।

निरूपणे प्रस्तावला ।

अंतर्यामी ॥ (दा. ५.८.३)

 

हे त्रिविध ताप विस्ताराने सांगण्यापूर्वी समर्थांनी प्रथम सामान्य माणसाची सुख किंवा आनंद याबाबत काय कल्पना असते, ते सांगितले आहे. आनंद म्हणजे तरी नेमके काय असते? भूक लागलेल्या माणसाला अन्न मिळाले किंवा तहानलेल्याला पाणी प्यायला मिळाले, तर त्याला जे सुख वाटते, तो त्याचा आनंद. अनेक वर्षे तुरुंगवासात राहिलेला कैदी जेव्हा तेथून सुटतो, तेव्हा त्याला आनंद होतो. कोणी महापुरात गटांगळ्या खाताना अचानक पलीकडच्या तीरास पोहोचला, तर त्याला आनंद होतो. त्यानंतर शिष्यांनी स्वामींना विचारले की, “हे त्रिविध ताप आता विस्तारपूर्वक सांगा.” तेव्हा स्वामींनी प्रथम आध्यात्मिक तापाचे सविस्तर वर्णन केले आहे. “देह, इंद्रिये आणि प्राण यांच्या संयोगाने माणूस जेव्हा दुःख भोगतो, त्रास सहन करतो तेव्हा त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात,” अशी व्याख्या करून त्या तापाची लक्षणे पुढे सांगितली आहेत. त्यातून शरीरात उद्भवणाऱ्या विविध व्याधी सांगितल्या आहेत. खरूज, नायटा, खवडे, नारू, गोवर, देवी, काखमांजरी, काळपुळी, मूळव्याध इत्यादी. त्यानंतर शरीर, पाठ, पोट, कंबर, गळा, तोंड, दात, कान, शरीरातील हाडे, थंडी वाजून दात वाजणे, हुडहुडी भरणे यासंबंधीच्या अनेक व्याधींचा समर्थ उल्लेख करतात. या व्याधींची इतकी नावे समर्थांना माहीत आहेत की, ती एखाद्या चांगल्या वैद्याससुद्धा आठवणार नाहीत. तसेच मोतीबिंदू, काचबिंदू, आंधळेपण, मुका, बहिरा, भ्रमिष्ट, वेडसर, पांगळा, तिरळा, अतिलठ्ठ, तोतरा, बोबडा वगैरे अशा अनेक यातनांचा समर्थ उल्लेख करतात. हे सारे ‘आध्यात्मिक ताप’ आहेत. या व्याधींची माहिती व नावे दासबोधातून वाचताना समर्थांचे सूक्ष्म निरीक्षण, व्यावहारिक ज्ञान विस्ताराने सांगण्याची पद्धत आणि अफाट स्मरणशक्ती यांचा प्रत्यय येतो.

 

आध्यात्मिक तापाच्या यातना देहाच्या आतून आलेल्या असतात. आता बाहेरच्या वातावरणाच्या आघाताने जी दुःखे निर्माण होतात, त्यांचे वर्णन ‘आधिभौतिक ताप’ या समासात येते. ठेच लागणे, पायात काटे मोडणे, अंगाची आग आग करणाऱ्या आग्या वनस्पतीचा स्पर्श होणे, अंगाला खाज सुटणारी खाजकुहिरी वनस्पती अंगाला लागणे, गांधील माशा चावणे इत्यादींमधून जे दुःख होते ते या तापाचे लक्षण. या झाल्या शेतातील घटना. आता बाहेरील घटना पाहा. साप, विंचू चावणे, वाघ, लांडगे, रानडुक्कर, रानगाई, रानबैल, रानहत्ती यांनी केलेला हल्ला किंवा त्यांची भीती. तसेच मगरी, सुसरी या जलचर प्राण्यांची भीती, या जंगलातील गोष्टींचा उल्लेख येतो. त्यानंतर शत्रूंनी हल्ला करून पळवून नेलेल्या माणसांचे हाल वर्णन केले आहेत. रोग बरा होण्यासाठी केलेले अघोरी उपाय, आगीमुळे झालेले नुकसान, शेतातील धान्य, गवताच्या गंजी, ऊस इत्यादी उत्पादने आगीने जळून खाक होणे, ही आग लागली असो वा कोणी लावली असो. होणारे दुःख काही कमी नसते. हा ‘आधिभौतिक ताप‘ होय.

 

ऐसा आग्न लागला ।

अथवा कोणी लाविला।

हानी झाली का पोळला ।

या नाव आदिभूतिक ॥ (दा. ३.७.४३)

 

तसेच ग्रहांची दशा, चंद्राचे अशुभ भ्रमण, अपशकुन, कोल्हेकुई, कुत्र्याचे रडणे इ. गोष्टींपासून होणारा त्रास आधिभौतिक. स्वामींनी या गोष्टींचा उल्लेख काळाला अनुसरून केला आहे. राजाकडून केल्या जाणाऱ्या शिक्षांचाही यात समावेश आहे. त्या शिक्षातील भयानकता पाहिल्यावर अंगावर काटा येतो.

 

ऐसे सांगता अपार ।

आहेत दुःखाचे डोंगर ।

श्रोती जाणावा विचार ।

आदिभूतिकतेचा ॥

 

यानंतरआधिदैविक तापा’चे वर्णन आहे. माणूस शक्ती, पैसा, सत्ता यांच्या जोरावर अनेक बरीवाईट कर्मे करीत असतो. माणसाने केलेल्या कुकर्माची फळे या जन्मी किंवा मृत्यूनंतरही भोगावी लागतात. जीवाची त्यातून सुटका नसते. ही ‘आधिदैविक तापा’मागील भूमिका आहे. अंगबळाच्या अथवा द्रव्यबळाच्या किंवा सत्तेच्या बळावर नीतिनियम धुडकावून दुष्कर्मे करीत असतो. उन्मत्तपणे जीवांचा संहार करणे त्याला आवडते. तो समाजविघातक कामे करीत असतो. अशा माणसाला मेल्यावर यमयातना भोगाव्या लागतात. त्या यातना म्हणजे ‘आधिदैविक ताप’ होय.

 

शास्त्रामध्ये यमदंड व यमयातना यांचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. दुष्कर्मी जेव्हा वाईट कर्मे करीत असतो, तेव्हा त्याचे सारे दोष माणसाच्या सूक्ष्म जीवात साठवले जातात. हा मनुष्य मेल्यावर त्याचा सूक्ष्मदेह पापपुण्यानुसार यथोचित शरीरात घालून त्याला पुण्याची अथवा पापाची फळे भोगावी लागतात. यमयातना भोगण्यासाठी एक यातना देह त्या पापी माणसाला दिला जातो. यमयातनांचे थोडेसे वर्णन स्वामींनी या समासात केले आहे. अक्षोभ नावाच्या नरकात असंख्य जुने किडे वळवळत असतात. यम पापी माणसाचे हातपाय बांधून त्याला त्यात फेकतो. कुंभपाक नावाचे लहान तोंडाचे एक मोठे भांडे नरकात असते. त्या भांड्यात अत्यंत उकाडा व दुर्गंधी असते. पापी माणसाला त्या कुंभपाकात ठेवले जाते. जगात मार देण्याचे अनेक प्रकार आहेत. पण, यमयातना त्याहून अनेक पटींनी कठीण आहेत. त्यासाठी जीवाला यातना देह दिला जातो. स्वामी शेवटी सांगतात की, शास्त्रात सांगितलेल्या या यमयातना कविकल्पना नाहीत. माणसाने त्या खोट्या समजू नयेत.

 

नाना दोषे यातना कर्कश ।

शास्त्रीं बोलिले अविश्वास ।

मानूच नये ॥

 

माणसाने जिवंत असतानाच नीतीधर्माने वागावे. सत्ता, पैसा, मद यांच्या जोरावर नीतीबाह्य वर्तन करू नये. आपल्याला कोण विचारणार किंवा कोण पाहतोय या भ्रमात राहू नये. कारण दुष्टांना यमयातना चुकणार नाहीत.

 
 

- सुरेश जाखडी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/