जालना येथे भरणार पशू-पक्षी प्रदर्शन
महा एमटीबी   08-Jan-2019२ हजार वेगवेगळ्या जातीच्या पशुधनाचे एकत्रीत प्रदर्शन होणार


मुंबई : जालना येथे २ ते ४ फेब्रुवारीला अखिल भारतीय स्तरावरील भव्य पशू-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पशु संवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. संपूर्ण देशातील सुमारे २ हजार वेगवेगळ्या जातीच्या पशुधनाचे एकत्रीत प्रदर्शन होणार आहे. पशूपालनाविषयी जनजागृती व्हावी आणि पशूपालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे हा या प्रदर्शनामागील उद्देश असल्याचे खोतकर यांनी सांगितले.

 

सुलतान, युवराज यासारख्या कोटी कोटी रुपये किंमतीच्या रेड्यांचा सहभाग हे या प्रदर्शनातील विशेष आकर्षण असणार आहे. जवळपासच्या बाहेरील राज्यातील १ हजार पशूधन सहभागी होणे अपेक्षित आहेत. ३ दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाला दररोज किमान ५० हजार प्रेक्षक, शेतकरी व पशूपालक भेट देतील अशी अपेक्षा आहे. याचबरोबर चारा टंचाईचा मुकाबला करण्यासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान, दुग्धोत्पादन व्यवसाय किफायतशीरपणे करण्यासाठी मुक्त संचार, गोठा तसेच मिल्क पार्लर व स्वच्छ दूध उत्पादन-जंतू विरहित दूध उत्पादन तंत्रज्ञान एकत्रीत बघायला मिळणार आहे. या प्रदर्शनाचा राज्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन खोतकर यांनी केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/