बॅंकांची कामे आजच उरकून घ्या…
महा एमटीबी   07-Jan-2019
 
 

मुंबई : सामाजिक सुरक्षा, खासगीकरण आणि कंत्राटीकरणाला विरोध करत देशभरातील कामगारांनी ८ व ९ जानेवारी रोजी संप पुकारला असून बॅंकांचाही त्यात सहभाग आहे. सलग दोन दिवस बॅंका बंद राहणार असून बॅंकांची कामे आजच उरकून घ्यावी लागणार आहेत.

 

केंद्र सरकारकडून वारंवार स्पष्टीकरण दिल्यानंतरही काही कामगार संघटनांनी बॅंकांच्या विलिनीकरणाला विरोध दर्शवत आहेत. नुकत्याच पुकारलेल्या संपात देशभरातील १० लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला होता. उद्यापासून पुन्हा ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने पत्रक प्रसिध्द करुन संप पुकारला आहे.

 

पोस्टाचीही कामे आजच करा

 

पोस्टातील खासगीकरण, व्यापारीकरण आणि आऊटसोर्सिंग, पाच दिवसांचा आठवडा, यासह पोस्टातील विविध रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया आदी प्रमुख मागण्यांसाठी पोस्ट सेवकांनीही संप पुकारला आहे. ग्रामीण पोस्ट सेवकांच्या बेमुदत संपामुळे अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे महत्वाची कामे आजच उरकून घ्यावी लागणार आहेत.

 

'आयटक' अंतर्गत ८ व ९ जानेवारी सर्व कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. यामध्ये पोस्ट सेवकांनी देखील सहभाग घेतला आहे. मंगळवारी व बुधवारी पोस्टाचे कामकाज बंद राहणार आहे. सेवकांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ८ व ९ जानेवारी रोजी ग्रामीण, शहरी पोस्ट सेवकांसह पोस्टमन संप करतील.

 

यामध्ये सुमारे ७०० सेवक संपावर जाणार आहेत याचा ताण पोस्ट सेवेवर पडणार आहे. उद्यापासून असलेला दोन दिवसीय संप यशस्वी व्हावा, यासाठी पोस्ट सेवकांची सोमवारी (७ जानेवारी) रोजी पुन्हा बैठक होणार आहे. सायंकाळी ६ वाजता गंजमाळ सिग्नल येथील मुख्य पोस्ट ऑफिस शेजारील नाशिक प्रधान डाकघर येथे ही बैठक होईल. यासाठी सर्व पोस्ट सेवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त कृती समितीने केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/