काळोखातील सोनेरी किरणे
महा एमटीबी   07-Jan-2019

 

 
 
 
 
 
 
२०१८ हे वर्ष सरताना अनेक पर्यावरणवाद्यांनी आजच्या मानवाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. समुद्रातील पाणी पातळीत वाढ, तापमानवाढ, हिमनद्यांचे वितळणे आणि वन्य प्रजातींची संख्या सातत्याने घटत जाणे, हे सर्व चिंता वाढविणारे आहे. आजकाल, या प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रातही नियमितपणे येतात. अशा परिस्थितीत आशेचा एक किरण अगदी अनपेक्षित अशा स्त्रोताकडून आला आहे - पारंपरिक व्हॅटिकनमधून.
 

पोप फ्रान्सिस यांच्या, ‘आपण कडेलोट होण्यापासून अजूनही वाचू शकतो,’ या शब्दांमुळे उमेदीचा उषःकाल अजूनही होऊ शकतो, हा विश्वास वाटतो. ते म्हणाले, “अजून सर्वकाही संपलेले नाही. वाईटात वाईट घडवून आणू शकणारा माणूस, स्वार्थत्याग करून अत्मोत्थान साधण्यासही सक्षम आहे. वर्षानुवर्षांच्या सामाजिक-मानसिक बेड्या तोडून पुन्हा एकदा चांगल्याची निवड करण्यास आणि नव्याने सुरुवात करण्यासही सक्षम आहे. सत्यम्-शिवम्-सुंदरम्कडील आपली ओढ कधीच नष्ट होऊ शकत नाही. मी आज जगातील प्रत्येकाला आपली ही शाश्वत ओढ न विसरण्याचे आवाहन करीत आहे. ती आपल्याकडून हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाच नाही.” ते पुढे आपल्या प्रत्येकाच्या जबाबदारीबद्दल म्हणतात, “आपले ध्येय अधिकाधिक माहिती साठवणे आणि आपले कुतूहल शमवणे हे नसून, अत्यंत जागरूकपणे जगाच्या वेदनांशी समरसता साधून, त्या वेदना दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो याचा शोध घेणे हे आहे. पोप यांच्या शब्दांतून प्रेरणा घेऊन आपण आपला खारीचा वाटा जरी उचलला तरी या पृथ्वीला विनाशापासून आपण वाचवू शकू.”

 

दुर्दैवाने, दाट धुक्याचे सावट हे फक्त दिल्ली, बीजिंग किंवा मेक्सिको या शहरांवरच नव्हे तर आपल्या मनांवरही पसरले आहे, आपण आधीच हताश होऊन बसलोय आणि आता लवकरच जगाचा शेवट होणार हे मान्य करून प्रयत्नच सोडून दिले आहेतहीच परिस्थिती बातम्यांतूनही रोजच झळकत असते. केरळवर निसर्गाचा प्रकोप झाला आणि पावसाने मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी केली, हे खरे आहे. त्याचप्रमाणे एकीकडे जागतिक कार्बन उत्सर्जनात कधी नव्हे इतकी वाढ झालेली असताना दुसरीकडे मूर्खाच्या नंदनवनात राहणारे ट्रम्पसारखे काही मूर्ख लोक- मानवी कृत्यांमुळे वातावरण बदल होत नाही, असे म्हणत आहेत. कीटकनाशक आणि तणनाशकांच्या वापरात भयंकर वाढ झाली असून खनिजांचा उपसा करण्यासाठी पृथ्वीच्या पोटात अधिकाधिक खोल खाणी खोदल्या जात आहेत, मुख्यत्वे खराब सार्वजनिक वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे खनिजतेलांचा वापर वाढून प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. येऊ घातलेली महाकाय धरणे ईशान्य भारतातील जैवविविधतेचा घास घ्यायला सरसावताहेत, सांडपाण्याचे विशाल लोंढे, अतिक्रमण आणि अति मासेमारीने आपले समुद्रकिनारे कोलमडताहेत, हेदेखील खरेच आहे आणि शासनाच्या नवीन धोरणांमुळे गवताळ प्रदेश आणि पाणथळी पडीक ठरवल्या जात आहेत. नवीन प्रकल्पांना पर्यावरण मंजुरी मिळणे सहज शक्य झाले आहे.

 

जगणे आपल्याला निरर्थक वाटू लागेल.

 

अशावेळी मी पोप फ्रान्सिस यांच्या भाषणातून प्रेरणा घेतली आणि आपल्या छोट्या-छोट्या प्रयत्नांनी जगाचा विनाश लांबवता येईल, असा विश्वास बाळगणाऱ्यांकडे आपली दृष्टी वळवली. हे जग अजूनही जगण्यालायक आहे असा विचार करण्यास मला भाग पाडणारी काही उदाहरणे पाहूयाया दृष्टिकोन बदलाची सुरुवात २००३ च्या थोडीशी आधी झाली. त्यावेळी सिक्कीमचे मुख्यमंत्री, पवनकुमार चामलिंग यांच्या सरकारने कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या संख्येत झालेल्या धक्कादायक वाढीची नोंद घेतली आणि त्यावर एक अत्यंत चाकोरीबाहेरची उपयायोजना आखली. राज्य शासनाने रासायनिक खतांवरील अनुदान दरवर्षी १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. जोडीला कम्पोस्टिंगचे शिक्षण द्यायला आणि त्यात गुंतवणूक करायला सुरुवात केली. २०१४ मध्ये राज्यात कृत्रिम खतांवर पूर्ण बंदी आणली गेली. त्यानंतर दोनच वर्षांत सिक्कीम देशातील पहिले १०० टक्के सेंद्रिय राज्य बनले. या धोरणबदलामुळे फक्त ६० हजार शेतकरी कुटुंबांचाच फायदा झाला नाही तर अ‍ॅग्रो-ईकॉलोजीत ५० टक्के वाढ आणि पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली. याचवेळी देशातील इतर राज्यांत जमिनीवर तसेच माणसांच्या शरीरावर, मुख्यत्वे अन्नातून, अधिकाधिक कार्सिनोजेनिक रसायनांचा मारा सुरूच आहे.

 

माणसांनी केलेले सकारात्मक काम पाहण्यासाठी इतक्या दूर जाण्याचीही खरंतर गरज नाही. मुंबईतीलच एक उदाहरण पाहूया. वकील अफरोज शाह यांच्या प्रेरणेने मुंबईकरांनी वर्सोवा बीचवरील प्लास्टिकचा कचरा साफ केला. मीडिया आणि सोशल मीडियाने या महत्कार्याला भरपूर प्रसिद्धी दिली, हे सांगणे नलगे. परंतु खरी दाद मिळाली ती ऑलिव्ह रिडली या कासवांकडून, जे तब्बल २० वर्षांनंतर या समुद्रकिनाऱ्यावर घरटे करण्यासाठी आले!!! याचप्रमाणे जागरूक नागरिकांकडून चंदीगढ तलावातील गाळ उपसा आणि अशी कित्येक उदाहरणे देता येतील, जी आपल्याला, तुम्हाला आणि मला प्रेरित करू शकतात, शासकीय मदतीची वाट न पाहता बदल घडवून आणण्यासाठीशासनानेही त्यांच्या जागी काही पर्यावरणपूरक योजना हाती घेतल्या आहेत. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या १३ कोटी वृक्ष लागवडीवर टीका करणाऱ्यांची संख्याही कदाचित तेवढीच असेल. परंतु या धोरणात खड्डे शोधण्याऐवजी तेवढेच खड्डे जर आपण जमिनीत केले असते तर- आपले रस्ते, रेल्वे ट्रॅक, शाळेची मैदाने आणि सामूहिक जागा अधिक हिरव्या झाल्या असत्या. यामुळे आपला उन्हाळा थोडा सुसह्य झाला असता आणि पावसाने होणारी जमिनीची झीज कमी झाली असती. अजूनही वेळ गेलेली नाही. चला, येत्या पावसाळ्यात काही लहानगे ऑक्सिजनदाते लावण्याचा आणि त्यांची काळजी घेण्याचा संकल्प करूया.

 

महाराष्ट्र शासनाचीच आणखी एक योजना जिला नागरिकांकडून ‘असहकार आंदोलनाचा सामना करावा लागला, ती म्हणजे प्लास्टिकबंदी. आपल्यासारख्या नागरिकांनी बाजारात जाताना स्वतःची पिशवी न्यायला नकार देऊन प्लास्टिकच्या पिशव्या मागणे सुरूच ठेवल्यामुळे, हा निर्णय अयशस्वी होणे अपरिहार्यच होते, परंतु म्हणून प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे प्राणी मारतात आणि गटारे तुंबतात यासाठी प्रशासनाला दोष देणेही आपण थांबवणार नाहीचकेंद्र शासनही त्यांच्या परीने काही चांगले निर्णय घेत आहे - उदा. अक्षय उर्जेच्या क्षेत्रात आपण घेतलेली आघाडी. ११ गिगावॅट अक्षय उर्जेच्या लिलावासह भारत आज जगातील अक्षय उर्जेची सर्वांत मोठी बाजारपेठ ठरला आहे. इलेक्ट्रिक कारचा प्रसारही असाच जोर धरतो आहे.

 

वन्यजीव संरक्षणासंबंधीदेखील देशभरातून काही चांगल्या बातम्या येत आहेत. देशातील वृक्षाच्छादनात झालेली वाढ ही चांगली बातमी होती परंतु त्याहूनही महत्त्वाची बातमी म्हणजे वाघांच्या संख्येत झालेली वाढ. उदाहरणार्थ, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा आज जणू वाघांचा प्रसूती विभाग बनला आहे. येथून नियमितपणे वाघ इतर जंगलांमध्ये पसरत आहेत. वन अि धकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुरविलेल्या सुरक्षिततेमुळे ताडोबा-अंधारीचे जंगल या प्रमुख प्रजातीसाठी आदर्श अधिवास बनले आहे, परंतु काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे ती संरक्षित क्षेत्राच्या बाहेर, जेथे संघर्षाची वारंवारिता सातत्याने वाढत आहे. ही धुरा सुरक्षित आहे असे तुम्हाला वाटावे यासाठी दिलेली ही काही उदाहरणे. याचवेळी हे जग सुंदर ठेवण्यासाठीची आपली जबाबदारी मोठी आहे, हे मात्र आपण विसरता कामा नये. शासनाने सर्व काही करावे आणि आपण फक्त सोशल मीडियावर कीबोर्ड कार्यकर्ता बनून परीक्षण करत राहावे, असे जर आपण म्हणणार असू तर - प्रलयदिन हेच आपले प्राक्त न आणि हेच आपले भविष्य ठरेल, यात शंका नाहीच.

 
 

मूळ लेखक- अनिरुद्ध चावजी

अनुवाद - परीक्षित सूर्यवंशी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/