“विरोधकांच्या महाआघाडीचे भविष्य धोक्यात, मोदीच पंतप्रधान”
महा एमटीबी   07-Jan-2019
 

पाटणा : लोकसभा निवडणूकांचे वेध सुरू असून सर्व पक्षांतर्फे निवडणूकांची रणनिती आखण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पाहता आणि देशातील मोदी लाट कायम असल्याचा अंदाज घेत विरोधकांनीही भाजपविरोधात मोट बांधण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, जेडीयुतर्फे या मुद्द्याला आता नवे वळण देण्यात आले असून त्यांनी महाआघाडीतील हवाच काढून घेतली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील. विरोधकांच्या महाआघाडीचा भरवसा नाही. लोकांना नियंत्रित आणि एकहाती सत्ता व सुशासन हवे आहे. विरोधकांची महाआघाडी किती काळ टीकेल याचा भरवसा नाही. त्यामुळे २०१४ प्रमाणेच पुन्हा नरेंद्र मोदी आणि भाजपवर पुन्हा जनता विश्वास दाखवेल, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली आहे. पाटणा येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले होते.

 

दरम्यान, जेडीयुकडून पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार पंतप्रधान पदाचे उमेद्वार असतील, अशी घोषणा काही कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, त्याचे खंडण करत मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी योग्य असल्याचे मत त्यांनी नितीश कुमार यांनी व्यक्त केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/