शस्त्रप्रदर्शनातून रिव्हॉल्व्हर लंपास, घटनेने खळबळ
महा एमटीबी   05-Jan-2019

काव्यरत्नावली चौकात शस्त्र, श्वान पथक, बॅण्ड पथक, वायरलेस, बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉडचे प्रदर्शन


 
जळगाव : 
 
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन यांच्यातर्फे शुक्रवारी काव्यरत्नावली चौकात शस्त्रप्रदर्शनातून एक रिव्हॉल्व्हर लंपास करण्यात आल्याचा प्रकार सायंकाळी घडला.
 
 
या घटनेने खळबळ उडाली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
शस्त्र प्रदर्शनात शस्त्र चालविण्याची पद्धत विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
 
प्रदर्शनात शस्त्र, श्वान पथक, बॅण्ड पथक, वायरलेस, बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड पथकाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याहस्ते होवून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
 
 
प्रास्ताविक तालुका पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी केले. आभार युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडिया यांनी मानले.
 
 
मंचावर अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडिया, सचिव अमित जगताप, शनिपेठ पो.स्टे.चे निरीक्षक विठ्ठल ससे, एमआयडीसी पो.स्टे.चे निरीक्षक रणजित शिरसाठ, जिल्हा विशेष शाखेचे पो.नि.अनिल शिंदे, जिल्हापेठ पो.स्टे.चे निरीक्षक सुनील गायकवाड, शहर पो.स्टे.चे निरीक्षक एकनाथ पाडळे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देवीदास कुनगर, मोटर वाहन परिवहन विभागाचे पंकज पवार, एपीआय सचिन बेंद्रे, पीएसआय कांचन काळे उपस्थित होते.
 
 
यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाउंडेशनचे उपाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, पियुष तिवारी, विनोद सैनी, सौरभ कुळकर्णी, पवन माळी, राहुल चव्हाण, नवल गोपाल आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमात सहभागी शाळा
 
विद्या इंग्लिश मिडीयम, रुस्तमजी इंटरनॅशनल, आर.आर., विवेकानंद प्रतिष्ठान, भगिरथ, उज्ज्वल, ए.टी.झांबरे, ओरियन इंग्लिश मिडीयम आदी शाळेतील विद्यार्थी, एनसीसी व एनएसएसचे कॅडेटस, मू.जे.महाविद्यालय, नूतन मराठा, बाहेती, जी.एस.रायसोनी, महाविद्यालयाचे विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
शहरवासियांंच्या साहित्याचे काय होणार ?
 
काव्यरत्नावली चौकात पोलीस स्थापनादिनानिमित्त आयोजित शस्त्रप्रदर्शनातून एक रिव्हॉल्व्हर लंपास झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांचा ताफा असताना या ठिकाणावरून हे रिव्हॉल्व्हर लांबविल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
 
 
शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून आता चक्क पोलिसांच्या ताफ्यातून रिव्हॉल्व्हर लंपास झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांचेच रिव्हॉल्व्हर लंपास होत असेल तर शहरवासियांंच्या साहित्याचे काय होणार ?, असा प्रश्न चर्चिला जात आहे. या रिव्हॉल्व्हरची किंमत अंदाजे 15-16 हजार असल्याचे सांगितले जाते.