अर्थशास्त्राचा अभ्यासक, पितृवत मार्गदर्शक कालवश
महा एमटीबी   05-Jan-2019


 


नाशिकमधील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. यशवंत रारावीकर यांचे दि. १ जानेवारी २०१९ रोजी नवी दिल्ली येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. सरांनी अर्थशास्त्रावर विपुल लेखन केले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात केंद्रीय अर्थसंकल्प, नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थशास्त्रज्ञ, युरो चलन, आर्थिक संकल्पना कोश यांचा समावेश होतो. वर्तमानपत्रे, आणि नियतकालिके यात त्यांनी शेकडो विचारप्रवर्तक लेख लिहिले. त्यांची मांडणी सामान्य माणसापासून अर्थतज्ज्ञांपर्यंत साऱ्यांना उपयुक्त आणि दिशादर्शक असे. प्रा. डॉ. यशवंत रारावीकर यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...


नाशिकमधील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. यशवंत रारावीकर यांचे दि. १ जानेवारी २०१९ रोजी नवी दिल्ली येथे पहाटे ४च्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ३० डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस. २०१८ ला त्यांनी ८२ वर्षे पूर्ण केली. ३१ डिसेंबरला त्यांना दिल्लीतील इस्पितळात उपचारासाठी भरती केले आणि १ जानेवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. सरांचा अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास होता. अभ्यासातील सातत्य ही त्यांची विशेष ख्याती! रारावीकर सरांचा जन्म १९३६ साली जळगावला झाला. त्यांचे वडील अॅड. गुरुराव रारावीकर वकील होते. डॉ. रारावीकरांनी अर्थशास्त्रात बी. ए.(१९५९) आणि एम. ए.(१९६१) केले. त्यानंतर त्यांनी १९८० साली पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेतून पीएच.डी. पदवीही मिळवली. शिक्षण क्षेत्रात करियर करायचे ठरवून त्यांनी आपल्या प्राध्यापकी जीवनास कोपरगाव महाविद्यालयातून सुरुवात केली. तेथे ते १९६४ ते १९६७ पर्यंत अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. १९६७ मध्ये ते नाशिकरोड महाविद्यालयात रुजू झाले आणि पुढची ३० वर्षे ते तेथेच ज्ञानदानाचे काम करत होते. १९९६ ला निवृत्त झाल्यावर शिकविण्याची त्यांची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी पुण्याच्या नेस वाडिया महाविद्यालयात चार वर्षे व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणून काम केले. अर्थशास्त्रासारखा क्लिष्ट विषय अतिशय सोप्या भाषेत समजावून देण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणूनच त्यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देण्यात आला. निवृत्तीनंतर लाभलेल्या २२ वर्षांच्या कालावधीत सरांच्या अभ्यासात कधी खंड पडला नाही आणि त्यांच्या विद्यार्थ्यांशी त्यांचा संपर्क कधी कमी झाला नाही. आजही अनेक विद्यार्थी अभिमानाने आणि गौरवाने आपण त्यांचे विद्यार्थी असल्याचे सांगतात.

 

रारावीकर सर स्वतः संशोधक होते. ‘National Investment and Finance, New Delhi’ या नियतकालिकात त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत नऊ संशोधन लेख प्रसिद्ध झाले. केंद्रीय कृषी मंत्रालयाने त्यांच्या कृषी विषयातील संशोधनासाठी पुरस्कार प्रदान केला. भारताच्या आर्थिक आणि वित्तीय धोरणावरील त्यांच्या शोधनिबंधाला ‘Indian Institute of Public Administration, New Delhi’ या संस्थेने पुरस्कार देऊन गौरविले. त्यांनी लिहिलेल्या शोध निबंधांना चार सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन ब्राँझ पदके मिळाली. त्यातील एक तर मा. राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आले. नवीन प्राध्यापकांमध्ये संशोधनाची वृत्ती वाढीस लागावी म्हणून ते सतत प्रयत्नरत असत. पुणे विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली होती. पी.एच.डी.च्या अनेक विद्यार्थांना त्यांनी मार्गदर्शन केले. केंद्रीय अर्थसंकल्प हा सरांचा विशेष आवडीचा आणि व्यासंगाचा विषय! दरवर्षी संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरांची अनेक ठिकाणी व्याख्याने आयोजित केली जात. त्यात सर अंदाजपत्रकाचे विश्लेषण करत. सरकारची धोरणे आणि अर्थव्यवस्थेची स्थिती याबाबत त्यांची निरीक्षणे अतिशय अचूक असत. त्यामुळे येणारा अर्थसंकल्प कसा असेल, या बाबतचे त्यांचे अंदाज खरे ठरत. विश्वनाथ प्रताप सिंग अर्थमंत्री असताना १९८६ साली अर्थमंत्रालयाने अर्थसंकल्पाचा अंदाज बांधून अर्थसंकल्प तयार करून देण्याचे एक आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार डॉ. रारावीकरांनी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प तयार करून पाठविला. सदर अर्थसंकल्प सरकारच्या अर्थसंकल्पाशी तंतोतंत जुळला आणि सरांना ‘बजेट अॅवार्ड’ने सन्मानित करण्यात आले.

 

सरांनी अर्थशास्त्रावर विपुल लेखन केले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात केंद्रीय अर्थसंकल्प, नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थशास्त्रज्ञ, युरो चलन, आर्थिक संकल्पना कोश यांचा समावेश होतो. १९८३ साली अर्थतज्ज्ञ केन्सच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी एक अंक संपादित केला. वर्तमानपत्रे, आणि नियतकालिके यात त्यांनी शेकडो विचार प्रवर्तक लेख लिहिले. त्यांची मांडणी सामान्य माणसापासून अर्थतज्ज्ञांपर्यंत साऱ्यांना उपयुक्त आणि दिशादर्शक असे. पुणे विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. नाशिक महानगर पालिका, अल्प बचत खाते, महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ या सारख्या संस्थांचे ते आर्थिक सल्लागार होते. गुण गौरव न्यास या संस्थेच्या वतीने १९९८ पासून प्रकाशित होणाऱ्या ‘थिंक लाईन’ या अर्थविषयक इंग्रजी द्वैमासिकाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. सर ‘Indian Economic Association’ आणि मराठी अर्थशास्त्र परिषद या संस्थांचे आजीव सदस्य होते आणि ते त्यात सक्रीय होते. सरांचा विवाह १४ जून १९६२ रोजी नाशिकला झाला. त्यांच्या पत्नी अरुणा. माहेरच्या खरवंडीकर. त्या एम.ए. संस्कृत होत्या, उत्तम वक्त्या आणि खेळाडू म्हणून प्रसिद्ध होत्या. सरांना त्यांची साथ १९९६ पर्यंत लाभली. सरांना तीन अपत्ये होती - दोन मुलगे आणि एक मुलगी. दुर्दैवाने त्यातील एक मुलगा वयाच्या नवव्या वर्षी आणि मुलगी वयाच्या सोळाव्या वर्षी निवर्तले. कुटुंबातील असे धक्के सरांनी पचविले, पण त्याने खचून न जाता त्यांनी आपला व्यासंग चालू ठेवला. डॉ. रारावीकरांचे एक चिरंजीव एम.ए.(अर्थशास्त्र), एम.फील., पीएच.डी. आणि एम.बी.ए. असे उच्च शिक्षित असून सध्या रिझर्व्ह बँकेत Policy आणि Research विभागाचे संचालक आहेत. डॉ. रारावीकरांचे अनेक विद्यार्थी त्यांच्या कुटुंबाचे सदस्यच बनून गेले आहेत. त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाची दखल घेऊन मराठी अर्थशास्त्र परिषदेने त्यांना दोन वर्षांपूर्वी ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या मनाचे मोठेपण असे की, त्यांनी हा पुरस्कार आपल्या विद्यार्थ्यांना समर्पित केला होता. काही माणसे व्यासंग करण्यासाठीच जन्माला येत असावीत. अशा माणसात डॉ. रारावीकारांचा फार वरचा क्रमांक आहे. आपला वाटणारा, अभ्यासू, थोर मार्गदर्शक, अर्थतज्ज्ञ आणि अर्थसंकल्पावर अचूक भाष्यकर्ता हाडाचा शिक्षक हरपला याचे दुःख व्यक्त करून परमेश्वर त्यांना सद्गती देवो ही प्रार्थना. विनम्र श्रद्धांजली.

  
विनायक गोविलकर
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/