आलोकनाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर
महा एमटीबी   05-Jan-2019

 

 
 
 
 
 
 
मुंबई : अभिनेते आलोकनाथ यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आलोकनाथ यांच्या विरोधात लेखिका विन्ता नंदा यांनी बलात्काराची तक्रार दाखल केली होती. ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत विन्ता नंदा यांनी सोशल मीडियावरून आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. आजवर अभिनेते आलोकनाथ यांनी साकरलेल्या भूमिकांमुळे सिनेसृष्टीत त्यांच्याकडे एक संस्कारी अभिनेता म्हणून पाहिले जात होते. परंतु विन्ता नंदा यांच्या आरोपामुळे हिंदी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली.
 

ओशिवरा येथील पोलीस ठाण्यात आलोकनाथ यांच्याविरोधात लेखिका विन्ता नंदा यांनी तक्रार केली होती. २० वर्षांपूर्वी झालेल्या बलात्काराच्या आरोपाखाली आलोकनाथ यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. अटक होऊ नये म्हणून आलोकनाथ यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिंडोशी येथील सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आलोकनाथ यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. दिंडोशी सत्र न्यायालयाने आलोकनाथ यांना याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/