कलापंढरीत एकोणसाठावे राज्यकला प्रदर्शन
महा एमटीबी   04-Jan-2019
 

महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या कलासंचालनालयाद्वारे यावर्षी ५९वे ‘महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. हे ‘राज्य कला प्रदर्शन’ १९५६ पासून आयोजित करण्यात येते. १९५६ ते २०१९ एवढ्या प्रदीर्घ काळात चालणारी आणि महाराष्ट्रातील व्यावसायिक कलाकारांना प्रोत्साहन देणारी शासनाची योजना निश्चितच उत्साह वाढविणारी आहे.

 

संपूर्ण भारतात महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे की, याच राज्यात कलासंचालनालय आहे. हा एक व्यावसायिक कलाकारांसाठीचा आणि कलाविषयक विविध स्तरांवरील शिक्षण अभ्यासक्रम चालविणार्‍या कला महाविद्यालयांचं नेतृत्व करणारा विभाग आहे. या कला संचालनालयामार्फत आजपर्यंत हजारो व्यावसायिक कलाकारांना हक्कांचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे, ज्याचं नाव ‘राज्य कला प्रदर्शन.’ मंगळवार, दि. ८ जानेवारी, २०१९ ला या प्रदर्शनाचं उद्घाटन ‘कलाकारांची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या मुंबई, फोर्ट येथील जहांगीर कलादालन येथे सायंकाळी ५च्या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. कलेकडे आस्थेने पाहणार्‍या तद्वतच कलाक्षेत्रातील अनेक मित्र लाभलेल्या राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न होत आहे.

 

तावडेसर हे कलाप्रेमी, कलारसिक आणि कलाकार मित्र अशी ओळख असलेले मंत्री या विभागाला लाभलेले आहेत. साहजिकच या विभागाला आवश्यक असलेल्या अनेक आवश्यकतांची पूर्तता मंत्रीमहोदयांकडून व्हावी, अशा आशा तमाम कलाकार, कलारसिक आणि कलाविद्यार्थ्यांना लागून राहिलेल्या आहेत. १९५६ ला महाराष्ट्रातील कलाकारांची असलेली संख्या आणि २०१९ ला सध्याची महाराष्ट्रातील कलाकारांची संख्या यामध्ये सुमारे दहा ते बारा पटींनी वाढ झालेली आहे. अर्थात, हा अंदाजे आकडा आहे. महाराष्ट्रात कलाकारांची अर्थात ‘चित्रकार उपयोजित कलाकार’ आणि शिल्पकार यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे आणि कलाशिक्षणाबरोबरच कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, या मूळ हेतूने १९५६ ला ‘कलासंचालनालयाची’ स्थापना करण्यात आली आहे. मग कलाकारांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात, त्यांचा ऊहापोह करण्याची ‘ही’ जागा जरी नसली तरी, राज्य कला प्रदर्शन भरविणे याव्यतिरिक्त, कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कलासंचालनालयामार्फत आणखी काही रंगविता येईल, असे कलाकारांना वाटते.

 
 
 
 

या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अनेक उदयोन्मुख, प्रथितयश आणि व्यावसायिकदृष्ट्या ज्येष्ठ, तसेच यशस्वी कलाकार त्यांच्या कलाकृती पाठवित असतात. त्या कलाकृतींमधून प्रदर्शनात मांडण्यासाठी कलाकृतींची निवड केली जाते. ही निवड परीक्षकांमार्फत केली जाते आणि निवडक कलाकृतींचे जहांगीर कलादालनात प्रदर्शन भरविले जाते. त्यामुळे या कलाकृती पाहणे ही एक अमूल्य पर्वणी असते. या प्रदर्शनात तैलरंग, अ‍ॅक्रेलिक रंग, रंगीत पेन्सिली, जलरंग, इंकपेन, चारकोल, कोलाज, पेन्सिली, वॅक्स रंग अशा माध्यमांद्वारे कॅनव्हास, कागद, ड्रॉईंग पेपर्स, पत्रा, लाकूड अशा पृष्ठभागांचा उपयोग करून आशयगर्भ कलाकृती सादर केलेल्या पाहायला मिळतात. मग शैलींचा विचार केला तर मूर्त, अमूर्त, अर्ध अमूर्त किंवा अर्धमूर्त प्रकारांतील शैलीत कलाकृती पाहायला मिळतात. मग आणखी पुढे जाऊन आपणास असेही ध्यानात येते की, या कलाकृतींमध्ये व्यक्तिचित्रणे, निसर्गचित्रणे, पिक्टोरियल फॉर्म्समधील पेंटिंग्ज, क्रिएटिव्ह पेंटिंग्ज, डिजिटल पेंटिंग्ज, फिगरेटिव्ह पेंटिंग्ज, मिनिएचर्स, डेकोरेटिव्ह, स्टाईलाईज्ड पेंटिंग्ज अशा एक नव्हे अनेक शैलींमध्ये आणि विविध तंत्र कौशल्ये वापरून कलाकृती निर्माण केलेल्या पाहायला मिळतात. या कलाकृतींच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या ध्यानात येईल की, विविध प्रकारचे परिणाम म्हणजे ‘इफेक्ट्स’ आणि विविध प्रकारचे पोत म्हणजे ‘टेक्स्चर्स’ मिळवून त्या त्या कलाकृतींच्या सौंदर्यात भर घातलेली असते.

 

पुढील वर्षी ‘साठी’ गाठणारं हे ‘राज्य कला प्रदर्शन’ या वर्षी अनेक आशा-अपेक्षांचं ओझं घेऊन काहीतरी प्रोत्साहन, उत्साह वाढेल, आनंद द्विगुणित होईल अशा प्रत्यक्ष कृतीत येऊ शकणार्‍या ठोस घोषणांच्या आरोळीकडे कानात प्राण आणून वेरुळ-अजिंठ्याच्या महाराष्ट्रातील तमाम कलाकार डोळे लावून बसलेले आहेत. गेल्या अनेक म्हणजे किमान तीसेक वर्षांपासून एकूण पंधरा पुरस्कार एकंदर सहा विभागांतून दिले जातात. हे पुरस्कार म्हणजे रुपये दहा हजार रोख, प्रमाणपत्र या स्वरूपात पंधरा कलाकारांना दिले जातात. येणेप्रमाणे दीड लाख रुपये, या पुरस्कारांद्वारे कलाकारांना सन्मानपूर्वक प्रदान केले जातात. इतर क्षेत्रांतील पुरस्कारांच्या रकमा अनेक पटींनी वाढविण्यात आल्या आहेत.

 
 
 
 

इतर क्षेत्रांसाठी, ते ते उपक्रम राबविण्यासाठीदेखील मोठ्या रकमांच्या स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, राज्य कला पुरस्कारांची रक्कम ही गेल्या दोन तपांहून अधिक वर्षांपासून रुपये दहा हजार प्रत्येकी एवढीच आहे. ती रक्कम किमान रुपये एक लाख प्रत्येकी अशी एकूण पंधरा लाख करावी, अशा प्रकारच्या मागण्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कलाकारांकडून केल्या जातात. त्यावरही सकारात्मक घोषणा होईल, अशी आशा लाखो कलाकार आणि कलारसिकांना आहे. या प्रदर्शनाचे औचित्य साधून राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून एका ज्येष्ठ व्यावसायिक कलाकाराचा यथोचित सन्मान केला जातो. यावर्षी ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांचे, कलेतील योगदान शासनाने विचारात घेऊन त्यांचा आणि त्यांच्या कलेचा सन्मान म्हणून रोख रुपये २५ हजार स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ या स्वरूपात त्यांचा गौरव करण्याचे निश्चित केले आहे. प्राध्यापक म्हणून जेजे वा शासकीय कला महाविद्यालयांमध्ये कला अध्यापन केलेले आणि ज्यांना ‘महाराष्ट्राचे पिकासो’ म्हणून आदरभावाने संबोधले जाते, अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ असलेल्या प्रभाकर कोलतेसरांचा सन्मान यावर्षी केला जातो आहे. योगायोग पाहा...

 

 
 

येत्या १४ जानेवारीला सूर्य म्हणजे प्रभाकर मकर राशीत प्रवेश करतो, असं ज्योतिषशास्त्र सांगते. कोलते सर हेदेखील कलासूर्य प्रतिभा असलेले ‘प्रभाकर’ आहेत आणि भारताची रास ‘मकर’ आहे. म्हणजे हाही एक योगायोग जुळून आलाय की, ‘प्रभाकर’ नावाच्या कलासूर्याच्या कलेचा प्रवाह भारताच्या ‘मकर’ राशीत ‘राज्य कला प्रदर्शना’च्या औचित्यातून ‘ज्येष्ठ कलाकार सन्मान’ घेऊन प्रवेश करीत आहे आणि प्रभाकर कोलतेसर हे अत्यंत प्रभावी, अत्यंत सडेतोड, अत्यंत उच्च कला परिभाषेत बोलणारे वक्ते आहेत. म्हणजे हा सन्मान स्वीकारल्यानंतर त्यांचे मनोगत ऐकणे म्हणजेकलापंढरीची गाथा’ ऐकण्याचे भाग्य उपस्थितांना लाभणार आहे. कलाकारांची याही पुरस्काराच्या रकमेबद्दल मागणी आहे. या सन्मानाप्रीत्यर्थ दिली जाणारी रक्कमदेखील दोन तपांहून अधिक काळापासून रु. २५ हजार एवढीच आहे. याच रकमेतही रु. पाच लाखांपर्यंत वाढ करावी, अशी लाखो कलाकारांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. उपयोजित कला विभाग, चित्रकला विभाग, शिल्पकला विभाग, मुद्रा चित्रण विभाग आणि दिव्यांग कलाकार विभाग अशा विभागांमधून पंधरा कलाकारांच्या कलाकृती या राज्य पुरस्कारासाठी निवडतात.

 

 
 

या उद्घाटन सोहळ्यास राज्यमंत्री मा. रवींद्र वायकर, आ. राज पुरोहित, मा. प्रधान सचिव यांची उपस्थिती लाभणार आहे. हे प्रदर्शन सर्व कलाकार, कलारसिक कला विद्यार्थी आणि कलाप्रेमींनी आवर्जून पाहावे, असे राज्याचे प्रभारी कलासंचालक आणि सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेले आहे. दि. ९ ते १४ जानेवारी, २०१९ पर्यंत जहांगीर कलादालनात हे प्रदर्शन विनामूल्य खुले राहील.

 
 
- प्रा. गजानन शेफाळ  


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/