'बोल्ट'च्या झटक्याने भारताची शरणागती
महा एमटीबी   31-Jan-2019


 


हॅमिल्टन : भारताने सलग तीन सामने जिंकत मालिका खिशात घातली खरी. पण, चौथ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने किवी गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. कर्णधार विराट कोहली आणि धोनीच्या अनुपस्थितीमध्ये भारताला १००चा आकडादेखील पार करता आला नाही. न्यूझीलंडला व्हाइट वॉश देण्यात संघ अपयशी ठरला. ५ सामान्यांच्या मालिकेमध्ये ३-१ अशी स्थिती झाली आहे. ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा निम्मा संघ निष्प्रभ ठरला.

 

न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तो निर्णय केन विलियम्सला चांगलाच फायदेशीर ठरला. भारतीय सलामीवीरांनी संथ सुरुवात करत ५ षटकात केवळ २० धावा केल्या. सहव्या षटकात सलामीचा फलंदाज शिखर धवन २१ चेंडूत १३ धावा काढून बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन स्वस्तात बाद झाला. त्यानंतर आलेल्या शुभम गिलने केवळ ९ धावा केल्या. आंबटी रायडू आणि दिनेश कार्तिक यांना भोपळाही फोडता आला नाही, तर केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार अवघ्या १ धावेवर माघारी परतले. हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल यांच्या अनुक्रमे १६, १५ आणि १८ धावांमुळे संघाला किमान ९२पर्यंत तरी मजल मारता आली.

 

९३ धावांचा सामना करताना न्यूझीलंडच्या संघाने २ विकेटच्या मोबदल्यात हे लक्ष पार केले. यामध्ये रॉस टेलरने सर्वाधिक नाबाद ३७ धावांचे योगदान दिले. तर हेन्री निकोल्स नाबाद ३० धावा करत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने २ विकेट घेतल्या. तत्पूर्वी, न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने भेदक गोलंदाजी करत १० षटकात २१ धावा देत ५ विकेट घेतल्या. तर, ग्रँडहोमने ३ विकेट घेतल्या. टॉड अ‍ॅस्टल आणि जिम्मी नीशाम यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/