मेजर जेफ्री लँगलँडस् - वय वर्षे १०१
महा एमटीबी   31-Jan-2019

 

 
 
 
मेजर जेफ्री लँगलँडस् यांचा मृत्यू आणि त्यांनी गेली ६२ वर्षं पाकिस्तानात राहून केलेलं कार्य, या साध्या गोष्टी नाहीत. पाकिस्तान या नवनिर्मित देशाच्या नव्या पिढ्या त्यांनी घडवल्या, असं म्हणायला हरकत नाही.
 

दि. ३ जानेवारी, २०१९ रोजी प्रसारमाध्यमांनी एक बारीकशी बातमी दिली- ‘पाकिस्तानमधले ख्यातनाम शिक्षक मेजर जेफ्री लँगलँडस् यांचे लाहोर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे कुणीही नातेवाईक नाहीत. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासह त्यांचे असंख्य विद्यार्थी देशात आणि परदेशांतही उच्च पदावर कार्यरत आहेत.” म्हणजे पंतप्रधानांचे एकेकाळचे शिक्षक म्हणून एवढी तरी बातमी आली, नाहीतर एका मास्तराच्या मरण्याला काय किंमत? त्यात ना कसली ‘ब्रेकिंग न्यूज’ ना कसली ‘बॉटम लाईन.’ प्रसारमाध्यमांनी वाचकांचं प्रबोधन करायचं असतं वगैरे बाता फक्त भाषणात ठोकायच्या असतात. प्रत्यक्षात तो धंदा आहे. त्यामुळे सनसनाटी वृत्त, लफडी, भानगडी, कुलंगडी, हिंसाचार आणि आक्रमक कामुकता यांनाच ‘प्रबोधन’ म्हटलं जात आहे.

 

असो, तर मेजर जेफ्री लँगलँडस् यांचा मृत्यू आणि त्यांनी गेली ६२ वर्षं पाकिस्तानात राहून केलेलं कार्य, या साध्या गोष्टी नाहीत. पाकिस्तान या नवनिर्मित देशाच्या नव्या पिढ्या त्यांनी घडवल्या, असं म्हणायला हरकत नाही. अर्थात, पुढे त्या घडविण्याचा उपयोग काहीच नाही, हा भाग वेगळा. कारण, पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आपला देश, आपलं राष्ट्र, आपला समाज समृद्ध व्हावा असं वाटतच नाही, कारण प्रगत समाज हुकूमशाही जुमानत नाहीअर्थात, याला मेजर लँगलँडस् प्रत्यक्ष जबाबदार नाहीत. चांगले विद्यार्थी म्हणजे भरपूर शिक्षण घेतलेले, शिस्तबद्ध, नम्र, समजूतदार नागरिक घडवणं इतपत काम त्यांनी केलं. ते विद्यार्थी पाकिस्तानी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत म्हणून पाकिस्तानचा एकंदर राज्यकारभार रुटुखुटु का होईना चालू आहे, नाहीतर त्यासाठीसुद्धा ‘आऊटसोर्सिंग’ करावं लागलं असतं.

 

काय आहे ही सगळी भागनड? आपल्याशी याचा काय संबंध? खूपच संबंध आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आता सहा दशकं उलटून गेली. पाकिस्तान हा भूभाग एक वेगळा देश म्हणून अस्तित्वात आणून भारताला दुर्बल बनविण्याची इंग्रजी कूटनीती यशस्वी होण्यालाही तेवढीच वर्षे झाली. पण, आजही इथे अप्रत्यक्षपणे इंग्रजच राज्य करीत आहेत, असं म्हटलं जातं. मी तुमच्यासमोर काही उदाहरणं ठेवतो. अलीकडेच मध्य प्रदेश हे राज्य काँग्रेसने जिंकलं आणि कमलनाथ हे मुख्यमंत्री झाले. कोण हे कमलनाथ? त्यांची ओळख काय? काही वर्षांपूर्वी साहित्य जगतात अचानक धूमकेतूसारखं विक्रम सेठ हे नाव उगवलं. विक्रम सेठच्या पाचशे-सातशे-एक हजार पानांच्या कादंबऱ्या टपाटप प्रसवल्या जाऊ लागल्या. त्या विविध भाषांमध्ये अनुवादित होऊ लागल्या. कोण विक्रम सेठ? तसाच तो प्रणय रॉय. दूरदर्शनची एकच वाहिनी होती, तेव्हा हा प्रणय रॉय फाकडू इंग्रजी बोलत ‘वर्ल्ड धिस वीक’ नावाचा चांगला कार्यक्रम सादर करायचा. मग एकाएकी त्याने एनडीटीव्हीची स्थापना केली आणि तो कुठल्या कुठे पोहोचला. कोण हा प्रणय रॉय?

 

तर हे सगळे आणि यांच्यासारखे अनेक जण, जे आज आपल्या देशाच्या, समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर काम करत आहेत, ते सर्वजण ‘डून स्कूल’चे विद्यार्थी आहेत. आलं का लक्षात? १९८४ साली राजीव गांधी एकाएकी पंतप्रधान झाले आणि त्यांनी सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळात आपल्या अनेक ‘डून स्कूल’ मित्रांना आणलं. त्यामुळे एकदम प्रसारमाध्यमांमध्ये ‘डून स्कूल’ प्रकाशझोतात आलं आणि यथावकाश मागे पडलं. पण आजही डॉ. करणसिंग यांच्यापासून ते ज्योतिरादित्य शिंदे, आपले उदयनराजे भोसले ते अगदी राहुल गांधींपर्यंत अनेक उच्चपदस्थ हे ‘डून स्कूल’चे विद्यार्थी आहेत. या सर्वांची राजकीय, सामाजिक कर्तबगारी काय असेल ती असो, पण त्यांची जीवनमूल्ये ही भारतीय नाहीत, तर ब्रिटिश आहेत. म्हणजेच राजकीयदृष्ट्या इंग्रजांना भारत सोडावा लागला, तरी स्वतंत्र भारताच्या समाजजीवनात सर्व क्षेत्रांतील उच्चपदस्थ मंडळी ही ब्रिटिश जीवनमूल्ये मानणारी असतील, याची काळजी इंग्रजांनी अगोदरच घेतली होती. याला म्हणतात दूरदृष्टीयाचा अगदी सर्वसामान्य असा नमुना महाराष्ट्राच्या लाडक्या पु. ल. देशपांड्यांच्या ‘असा मी असामी’ मध्ये सापडतो. पुलंचा त्यातला नायक धोंडो भिकाजी जोशी कडमडेकर हा मुंबईतल्या एका चाळीतला धोतर-सदरावाला बावळट कारकून. एकदम स्वातंत्र्य येतं आणि धोंडोपंतांच्या बेन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन कंपनीची मालकी फेदरवेट साहेबाकडून मंगळदास शेठकडे येते. ‘माय ऑफिस मस्ट लुक अप टू डॅट,’ असा दम मंगळदास शेट सगळ्यांना भरतो आणि आयुष्यभर धोतरात वावरलेले धोंडोपंत एकदम सुटात येतात.

 


 
 

समाजशास्त्रामध्ये ‘मॉडर्नायझेशन’ आणि ‘वेस्टर्नायझेशन’ असे दोन शब्द वापरले जातात.स्वतंत्र भारताचं आधुनिकीकरण काय व्हायचं असेल ते होईलच; पण पाश्चात्त्यीकरण मात्र नक्की होईल, असं इंग्रजांनी पाहिलं. पाश्चात्त्यीकरण झालेला समाज आपल्या स्वत:च्या जीवनमूल्यांचा तिरस्कार करू लागतो आणि पश्चिमी जीवनमूल्ये आपली म्हणून कवटाळू लागतो. जपान, इस्रायल आणि आता चीन हे अत्याधुनिक आहेत, पण त्यांनी आपली जीवनमूल्ये अजिबात सोडलेली नाहीत. जपानी आणि चिनी भाषांच्या लिपी या चित्रलिपी असल्यामुळे अत्यंत किचकट आणि अवघड आहेत. पण, जपानी-चिनी तंत्रज्ञांनी सगळी बुद्धिमत्ता पणाला लावून त्यादेखील संगणकावर आणल्या आहेत. त्या ते इंग्रजीचा द्वेष न करता, पण इंग्रजी इतक्याच सफाईने आणि आग्रहाने वापरतात. एखाद्या विमानतळावर मिळणाऱ्या साध्या बिस्किट पुड्यावरसुद्धा इंग्रजीसोबत चिनी लिपीतही मजकूर असतो. इस्रायलने तर कमालच केली आहे. जवळपास मृतप्राय झालेली हिब्रू भाषा आणि लिपी त्याने पूर्णपणे पुनरुज्जीवित केली आहे.

 

एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेत संपूर्ण सुटाबुटात वावरणारा आणि अस्खलित इंग्रजी बोलणारा एखादा जपानी, चिनी किंवा इस्रायली उच्चपदस्थ माणूस स्वत:च्या घरात स्वत:ची भाषा बोलतो. या उलट आमचे लोक स्वत:ची भाषा, स्वत:चा पोषाख न वापरण्यातच धन्यता मानतात. वाचनाच्या बाबतीत तर अमर्याद आनंद आहे. आमच्या पुढच्या पिढ्यांना ज्ञानोबा-तुकोबा तर सोडाच, पण पु. ल. देशपांडे तरी माहीत असतील का, अशी शंका आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातली मूठभर उच्चपदस्थ मंडळी संपूर्ण समाजाला कसं अस्मिताविहीन करून सोडू शकतात, याचा हा उत्कृष्ट नमुना आहे आणि इंग्रजांनी आपल्या बौद्धिक कूटनीतीने तो यशस्वी करून दाखवला आहे. इसे कहते है दिमागी ताकद!

 

हेच सगळं पाकिस्तानात घडवून आणलं मेजर जेफ्री लँगलँडस्ने. भारत स्वतंत्र होण्याच्या वेळी काही ब्रिटिश लष्करी अधिकारी पाकिस्तानकडे वर्ग करण्यात आले. त्यात लँगलँडस्ही होता. पहिली सहा वर्ष त्याने पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिलं. मग १९५३ साली लष्करप्रमुख जनरल अयुब खान यांनी त्याला लाहोरच्या प्रख्यात अचिसन कॉलेजच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळण्याची विनंती केली. १९५३ ते १९७९ अशी तब्बल २५ वर्ष मेजर जेफ्री लँगलँडस् अचिसन कॉलेजचा सर्वेसर्वा होता. ब्रिटनमध्ये जसं ‘ईटन’ हे अतिप्रख्यात विद्यालय आहे, त्याच धर्तीवर लाहोरचं अचिसन कॉलेज इंग्रजांनीच १८८६ साली सुरू केलं होतं. ब्रिटनचे अनेक पंतप्रधान, मंत्री, मुत्सद्दी, राजकारणी, रणधुरंधर सेनानी हे ईटनचे विद्यार्थी, तसेच अचिसन कॉलेजचे अनेक विद्यार्थी ब्रिटिश भारतात आणि नंतर पाकिस्तानात मोठमोठ्या हुद्यांवर चढले.

 

१९७९ ते १९८९ अशी दहा वर्ष वजिरीस्तान प्रांतात रझमक या ठिकाणी लष्करी विद्यालयाचा प्रमुख, मग १९८९ ते २०१२ अशी २३ वर्ष चित्राळ भागातल्या सायुर्ज विद्यालयाचा प्रमुख अशा जबाबदाऱ्या पार पाडून लँगलँडस् पुन्हा अचिसनमध्ये परतला. आता त्याचं वय ९४ झालं होतं. पण, हृदयविकाराचा एक सौम्य झटका वगळता त्याची प्रकृती चांगली होती. तो विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक होताआज आपण अलिप्तपणे पाहिलं तर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणं, हे जे कोणत्याही शिक्षकाचं मुख्य काम, त्यात मेजर लँगलँडस् चांगलाच पारंगत होता. शिवाय खेळांची आवड, ट्रेकिंगची आवड, शिस्तप्रियता, वेळेबाबत काटेकोरपणा हे खास पाश्चिमात्त्य गुण त्याने विद्यार्थ्यांना लावले. मात्र हे करताना विद्यार्थी स्वभाषा, स्वदेश यापेक्षा इंग्रजी मूल्ये श्रेष्ठ मानू लागतील, हा जो इंग्रजी गनिमी कावा, तोही त्याने अमलात आणला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/