‘पु.लं’ चा बायोपिक दाखविण्यास थिएटर मालकांचा नकार
महा एमटीबी   03-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ ४ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. परंतु प्रदर्शनापूर्वीच या सिनेमातच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पुणे आणि मुंबईतील काही सिंगल स्क्रीन थिएटर मालकांनी ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा सिनेमा आपल्या थिएटरमध्ये दाखविण्यास नकार दिला आहे. अभिनेता रणवीर सिंहच्या ‘सिम्बा’ या सिनेमामुळे पु.लंच्या बायोपिकला अडथळा निर्माण झाला आहे.
 

‘सिम्बा’ या सिनेमाचे वितरक थिएटर मालकांवर दबाव टाकत आहेत. अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. या वितरकांच्या या दबावामुळेच काही थिएटर मालकांनी ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा सिनेमा दाखविण्यास नकार दिला आहे. वितरकांच्या दबावामुळे इच्छा असूनही आपल्या थिएटरमध्ये हा सिनेमा दाखवता येणार नसल्याची खंत काही थिएटर मालकांनी बोलून दाखविली आहे. वर्षाअखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’ला सध्या प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे. मुंबई आणि पुण्यात ‘सिम्बा’ या सिनेमाने भरघोस कमाई केली आहे. देशभरातील ४ हजांराहून अधिक स्क्रीन ‘सिम्बा’ला मिळाल्या आहेत.

 

आतापर्यंत ‘सिम्बा’ने १२४ कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘सिम्बा’ला मिळणारी भरघोस पसंती लक्षात घेऊन जास्तीत जास्त थिएटर्समध्ये सिब्मा हा सिनेमा दाखविला जावा. यासाठी वितरक प्रयत्न करत आहेत. परंतु यामुळे ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या सिनेमाला अडचणींना सामना करावा लागत आहे. पु.ल. देशपांडे हे महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेले एक अजरामर असे व्यक्तिमत्त्व आहे. साहित्य लेखनात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या सिनेमासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही राजकीय पक्षाने याप्रकरणी लक्ष घातलेले नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/