चित्ती असो द्यावे समाधान
महा एमटीबी   29-Jan-2019

 

 

 
 
 
आपण सातत्याने जगाकडे पाहत असतो. जगामध्ये काय चालले आहे, यातच आपण लक्ष केंद्रित करतो. कारण, आपल्यालाच त्यांच्या तुलनेत स्वत:ला महान सिद्ध करायचे असते. या चढाओढीच्या जगात स्वत:चे वैशिष्ट्य सिद्ध करायच्या नादात माणूस घमेंडीचा गुलाम केव्हा होतो, हे त्याचे त्यालाच उमजत नाही.
 

आपण स्वत:विषयी दयाभाव ठेवल्यामुळे आपल्याला अवतीभोवती असणाऱ्या इतरांविषयीसुद्धा दयाभाव वाटू लागतो. विशेषत: जे स्वत:च्या आयुष्यात कठीण परिस्थितीशी सामना करीत आहेत, अशा लोकांबद्दल आपण करुणा व्यक्त करू शकतो. पण मुळात आपण स्वत:शी कठोर का वागतो, हे समजून घ्यायला हवे. अर्थात, या जगात कोणी जाणूनबुजून स्वत:शी निष्ठूरपणे वागत नाही. हा निष्ठूरपणा कळत नकळत माणसाच्या स्वभावात येतो. तो त्याच्या अप्रगल्भ वा आततायी विचारांतून. या अशा अपरिपक्व, स्वयंकेंद्रित आपमतलबी विचार करायच्या प्रवृत्तीची माणसाला स्वत:लाच कल्पना नसते. आपण कितीही यश मिळविले, संपत्ती मिळवली, नाव कमाविले तरीसुद्धा आपल्याला ते पुरेसे वाटत नाही, समाधानकारक वाटत नाही. कुठेतरी, काहीतरी थोडेफार राहिले आहे, अजून प्रयत्न करायला हवेत, अजून कमवायला पाहिजे, अजून मिळवले पाहिजे असे आपल्याला वाटतच राहते. आपण स्वत:ला अधिक कष्ट करण्यास सांगणे यात चूक नाही. कष्टांची महती आपण कायम उत्तम दृष्टीतून अनुभवली आहे. पण स्वत:ला कठोर परिस्थितीत टाकणे, हे चुकीचे आहे व ते व्यावहारिकही नाही.

 

आपल्या संस्कृतीत स्वत:बद्दलचा सन्मान, आदर ही संकल्पना खूप महत्त्वाची मानली जाते. आपण कुणीतरी खास व वैशिष्ट्यपूर्ण असायला पाहिजे, अशी गरज मग माणसाला वाटायला लागते.आपण स्वत: जसे आहोत, ज्या परिस्थितीत आहोत, तसे स्वीकारण्यास अशा व्यक्तीची तयारी नसते. अशावेळी आपण स्वत: तर आनंदी राहू शकत नाही व दुसऱ्यांनाही आनंद देऊ शकत नाही. स्वत:चा सन्मान ठेवण्यासाठी केलेली, ही स्वयंकेंद्रित धडपड एक प्रकारे आपल्यालाच जाळ्यात अडकवून ठेवते. आपण स्वतःतच गुंतत जातो, आत्मरत होतो. आपण मग स्वत:चीच बढाई मारतो, फुशारक्या मारतो. त्यासाठी काही खोट्या गोष्टींच्या आहारी जातो. नसता डामडौल करायला लागतो. आपल्यात गर्व निर्माण होतो. गर्वाचा पिंजराहा धोकादायक आहे. कारण, वास्तवाशी असलेले माणसाचे नाते गर्वाचा राक्षस भक्षण करून टाकतो. माणसं चक्क आंधळी बनतात. सत्याचा मार्ग विसरतात. अशावेळी दुसऱ्यांची मने व नाते आपण समजून घेत नाही. आपलीच मते व आपलाच दृष्टिकोन आपण खरा मानतो.

 
आपली क्षमता आपल्याला वाजवीपेक्षा महत्त्वाची वाटते. आपण दुसऱ्याला वाईट लेखायला लागतो. ही अशी स्वकेंद्रित प्रवृत्ती आपल्याला स्वत:च्या विधायकतेपासून खूप दूर घेऊन जाते. आपण सातत्याने जगाकडे पाहत असतो. जगामध्ये काय चालले आहे, यातच आपण लक्ष केंद्रित करतो. कारण, आपल्यालाच त्यांच्या तुलनेत स्वत:ला महान सिद्ध करायचे असते. या चढाओढीच्या जगात स्वत:चे वैशिष्ट्य सिद्ध करायच्या नादात माणूस घमेंडीचा गुलाम केव्हा होतो, हे त्याचे त्यालाच उमजत नाही. जगात जे जे सुंदर आहे, प्रशंसनीय आहे, यशस्वी आहे, त्यापेक्षा आपली पातळी अधिक असायला हवी ही लालसाच माणसाला स्वत:प्रति कठोर होण्यास प्रवृत्त करते. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ‘अहम् ब्रह्मम्’ या दृष्टिकोनाचा फुगा फुगता फुगता. कधी फुटतो, हे आपल्या लक्षातचयेत नाही.
 
 
स्वत:चा सन्मान अशा तऱ्हेने जेव्हा बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो, तेव्हा खरोखरत्या अर्थाने (जगाने ठरविलेल्या)मिळत नाही, तेव्हा मात्र माणसालाप्रचंड दु:ख वाटायला लागते. आजच्या समाजात ‘सेल्फी’ संस्कृती रुजली आहे.आपण काय विकत घेतले? आपण किती सुंदर आहोत? आपल्याबरोबर कोण आहेत? आपण कोणत्या हॉटेलमध्ये पार्टी दिली? आपण कुठे प्रवास करीत आहोत? यासारख्या अनेक वैयक्तिक गोष्टींनी आपण केवळ दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतो. जर का ती कुरघोडी यशस्वी नाही झाली, तर आपण निराशाग्रस्त होतो. या सगळ्यामध्ये स्वत:ला अद्वितीय सिद्ध करण्याचा प्रयत्न खूप निरर्थक आणि भोंगळ आहे. पण याचा तणाव मात्र तीव्र आहे. हा सगळा प्रकार खरे तर स्वत:शी कठोर वागून स्वत:चेच नैतिक खच्चीकरण करणारा आहे, हे माणसांना कधी कळणार? आपण कधीतरी स्वत:ला दुसऱ्याच्या नजरेतून पाहण्याची प्रवृत्ती बदलायला हवी. स्वत:तल्या स्वत:ला समाधानाने पाहण्यात किती सुख असते हे स्वत:च अनुभवायला हवे.
 
 
 
- डॉ. शुभांगी पारकर 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/