क्लोनिंगद्वारे उपायांचा शोध
महा एमटीबी   29-Jan-2019

 

 
 
 
 
चिनी वैज्ञानिकांनी पाच क्लोन माकडांची निर्मिती केली. एका आफ्रिकन माकडाच्या जैविक रचनेत रासायनिक बदल करून या क्लोन माकडांची निर्मिती करण्यात आली. सर्केडियन रिदममुळे मानवी शरीरात होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या माकडांवर संशोधन केले जात आहे.  
 
 
मानव प्रगतीच्या कार्यपथावर चालत आहे. अश्मयुगीन काळापासून अग्नीचा शोध, चाकाचा शोध, त्यानंतर अनेक उपयुक्त शोध लावून मानवाने प्रगती साधली. अद्याप मानव पूर्णत: प्रगत झालेला नसून त्याच्या प्रगतीची वाटचाल अजून सुरूच आहे. मुळात आपण मानव आहोत, इतर प्राण्यांपेक्षा बुद्धिमान आहोत. हा मानवाला लागलेला पहिला शोध होय! याच बुद्धीच्या जोरावर मानवाने प्रगतीची निरनिराळे शिखरे गाठली, उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून मानवाने मोठी क्रांती केली. अजूनही अशी नवनवीन उदाहरणे समोर येत आहेत व घटना घडत आहेत.
 

चिनी वैज्ञानिकांनी पाच क्लोन माकडांची निर्मिती केली. एका आफ्रिकन माकडाच्या जैविक रचनेत रासायनिक बदल करून या क्लोन माकडांची निर्मिती करण्यात आली. सर्केडियन रिदममुळे मानवी शरीरात होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या माकडांवर संशोधन केले जात आहे. यामुळे अल्झायमर, कॅन्सर, एड्स, स्किझोफ्रेनिया, निद्रानाश, नैराश्य यांसारख्या रोगांवर मात करण्यासाठी मानवाला मदत होईल, असा दावा चीनने केला आहे. असे झाले तर चीनने उचललेले हे संशोधनात्मक पाऊल कौतुकास्पद ठरेल. पण अजून हे संशोधन अपूर्ण आहे. ते कधी आणि केव्हा पूर्ण होईल? या संशोधनातून निर्माण केलेल्या औषधांचा लाभ आपल्या कितव्या पिढीला होईल? हे आता सांगता येणे चीनला शक्य नाही. भूतकाळ पाहता चिनी ड्रॅगनला काहीच अशक्य नाही. चीनमध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे. चीनला लाभलेले हे दीर्घायुष्याचे वरदान नसून चिनी लोकांनी पूर्वापार जपलेला प्राचीन वैद्यकीय खजिन्याचा हा वसा आहे. आपल्याकडे जसा आयुर्वेदिक औषधांनी भरलेला आजीबाईचा बटवा असतो, तसाच चीनमधील लोकांकडे त्यांच्या पूर्वजांनी सांगितलेले औषधोपचार आहेत. पिढ्यान्पिढ्या पाहत आलेल्या चिनी वृद्धांनी त्यांच्या परंपरेचा वारसा जपून ठेवला आहे. आपल्या देशात माणसाची वयोमर्यादा अजूनही निश्चित सांगता येत नाही. एखादा माणूस वयाची शंभरी गाठेल का? हे सांगणे आपल्याला कठीण जाते. पण चीनमध्ये शंभरी पार केलेले अनेक चिनी पूर्वज सापडतील. एकीकडे दीर्घायुष्य प्राप्त करणाऱ्या चीनकडे पाहून या क्लोन माकडांच्या संशोधनावर विश्वास ठेवावासा वाटतो, तर दुसरीकडे बाजारात विकल्या जाणाऱ्या चिनी वस्तू किती काळ टिकतील? याची शाश्वती अजूनही देता येत नाही. आपल्याकडे दिवाळीला चिनी तोरण घ्यायचे म्हटले, तरी पुढच्या वर्षी नवीन तोरण नक्कीच खरेदी करावे लागणार! याची आपल्याला शाश्वती असते. म्हणूनच हीच का चीनने केलेली तंत्रज्ञानातील प्रगती, असे विचारावेसे वाटते.

 

सोबतच चीनने केलेली क्लोन माकडांची निर्मिती आणि त्यांच्यावर होणारे संशोधन म्हणजे वैद्यकीय प्रगती साधण्यासाठी चीनच्या वैज्ञानिक क्षेत्राला तंत्रज्ञानाची दिलेली जोड आहे. या संशोधनातून होणारी औषधनिर्मिती हा पुढे चीनसाठी व्यापारीकरणाचा मुद्दा ठरेल. औषधनिर्मिती आणि त्याचा चिनी जनतेला होणाऱ्या आर्थिक फायद्याकडे चीन व्यापाराची उत्तम संधी म्हणूनच पाहिल. औषधांची उत्पादन क्षमता वाढविताना त्यांचा दर्जा खालावणार नाही, याची दक्षताही चीनने घ्यायला हवी. नाहीतर या औषधांची परिस्थितीदेखील बाजारात मिळणाऱ्या चिनी वस्तूंप्रमाणेच होईल. संशोधन यशस्वी झाले तर जगभरात ते स्वागतार्हच असेल. आजवर मानवाने पोलिओ, गोवर, प्लेग, कॉलरा, क्षय यांसारख्या असाध्य रोगांवर संशोधनाने मात केली. पूर्वी या रोगांवर औषधे उपलब्ध नसल्याने अनेकांचा मृत्यू व्हायचा. औषधे उपलब्ध झाल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले. एखाद्या प्रदीर्घ आजाराने होणाऱ्या वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. वैद्यकीय क्षेत्रात मानवाने साधलेली प्रगती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. अपघातातील जखमींमध्येही वैद्यकीय प्रगतीमुळे सुधारणा होऊ लागली. वंध्यत्वावर मात करणे शक्य झाल्याने जन्मदरही वाढले. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या लोकसंख्येवर हा वैद्यकीय परिणाम हळूहळू दिसू लागला. अजूनही एड्सवर औषधे उपलब्ध नाहीत. नैराश्यामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे होणारा निद्रानाश या सर्वाला आधुनिक मानवाची बदललेली जीवनशैलीच खरी कारणीभूत आहे. आपले आरोग्य जपण्यासाठी मानव आता क्लोननिर्मितीसारख्या प्रक्रियेतही गुंतला आहे, अर्थात याचे बरेवाईट परिणामही वेळोवेळी समोर येतीलच.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/