भारताचा न्यूझीलंडवर 'क्लीन स्वीप'
महा एमटीबी   28-Jan-2019माउंट मॉन्गनुई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने भारतास २४४ धावांचे आव्हान दिले होते. कर्णधार कोहली आणि रोहितने दमदार अर्धशतके ठोकली. या विजयासह भारताने ही मालिका ३-० अशा फरकाने जिंकली. भारताचा हा न्यूझीलंडमधील दुसरा मालिका विजय आहे. यापूर्वी २००९ मध्ये विजय मिळविला होता.

 

न्यूझीलंडच्या २४४च्या धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. पण अवघ्या २८ धावांवर शिखर धवन बाद झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने रोहित शर्माच्या साठी दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण ११३ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अनुक्रमे ६२ आणि ६० धावांचे योगदान दिले. त्यानंतर आलेल्या आंबटी रायडू आणि दिनेश कार्तिकने झटपट ४० आणि ३८ धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

 

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत पहिल्या ५९ धावांमध्ये ३ विकेट गमावले. मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यापुढे सलामीची फलंदाज तग धरू शकले नाहीत. त्यानंतर रॉस टेलर आणि लॅथम यांनी चौथ्या विकेट्ससाठी ११९ धावांची भागिदारी रचली. अखेर यजुवेंद्र चहलने लॅथम अडथळा दूर करत भागिदारी फोडली. त्यानंतर टेलर एका बाजूने फलंदाजीचा किल्ला लढवत असताना भारतीय गोलंदाजांनी इतर किवी फलंदाजांना फार वेळ खेळपट्टीवर स्थिरावून दिले नाही. भारताकडून मोहम्मद शमीने ४१ धावांत तीन विकेट घेतले. तर, भुवनेश्वर, चहल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट टिपले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/