पृथ्वीच्या नकाशाचा मागोवा घेताना...
महा एमटीबी   27-Jan-2019


 


मागील लेखात आपण पृथ्वीच्या इतिहासाचा एकत्रित (As a Whole) अभ्यास केला. या लेखात आपण या अफाट इतिहासाच्या एका लहानशा भागात शिरू व पृथ्वीच्या प्राकृतिक नकाशात कालपरत्त्वे काय व कसा फरक पडला याची माहिती घेऊ.


आपल्याला माहीतच आहे की, पृथ्वीच्या कवचाखाली द्रवरूप मँटल आहे व हे कवच त्या मँटलवर तरंगते आहे. मागील लेखात उल्लेख आल्याप्रमाणे पृथ्वीच्या गाभ्यातून संवेदन प्रवाह (Convection Currents) वर येतात. या प्रवाहांमुळे हे कवच व पर्यायाने सगळ्या कँटिनेंटल प्लेट्स हलत असतात. ही हालचाल शेकडो, हजारो नव्हे, तर लक्षावधी वर्षांपासून सुरू आहे. याच हालचालींमुळे दोन प्लेट्स एकमेकांना येऊन आपटतात (Conversion), एकमेकांच्या खाली जातात (Subduction) वा एकमेकांपासून विलग होतात (Diversion). या तीन प्रकारच्या घटनांमुळेच खंड-खंड, खंड-सागर व सागर-सागर या तीन प्रकारच्या सरहद्दी तयार झाल्या आहेत, याची माहितीही आपण घेतलीच आहे. या सगळ्या हालचालींमुळे पृथ्वीचा नकाशा सारखा बदलत राहिला आहे व भविष्यातही तो बदलत राहावा लागणार आहे. या बदलत्या नकाशाची म्हणजेच पृथ्वीच्या बदलत्या आकाराची आता आपण माहिती घेऊ.

 

पृथ्वीचा जन्म सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाल्यानंतर पाणी येईपर्यंत सुमारे ०.५ अब्ज वर्षे निघून गेली होती. म्हणजेच सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर पाण्याचे अस्तित्व होते. पाणी आल्यानंतर साधारणपणे ३.३ ते ३.५ अब्ज वर्षांपूर्वी पहिली बेटे अथवा खंडे पाण्याबाहेर येण्यास सुरुवात झाली. साधारणपणे २.७५ अब्ज वर्षांपूर्वी बऱ्यापैकी मोठा भूभाग तयार झाला. त्याला ‘केनोरलँड महाखंड’ (Kenorland Supercontinent) असे म्हणतात. हे खंडसुद्धा फार काळ टिकले नाही. प्लेट्सच्या हालचालींमुळे हे खंडही परत विखुरले. असे सतत चालू होते. दरम्यानच्या काळामध्ये नवीन जमीन पाण्याबाहेर येणे तसेच पाण्याबाहेरची जमीन पाण्याखाली जाणे हे प्रकारही चालूच होते. साधारणपणे १.९ अब्ज वर्षांपूर्वी मात्र पृथ्वीवरचा बराचसा भूभाग एकत्र यायला सुरुवात झाली आणि सुमारे १.८ अब्ज वर्षांपूर्वी कोलंबिया (Columbia) नावाचे महाखंड तयार झाले. परत हे महाखंड सगळीकडे विखुरले व सुमारे ८०० दशलक्ष वर्षांपूर्वी एकत्र आले. या महाखंडाला ‘रोडिनिया महाखंड’ (Rodinia) असे म्हणतात. हे महाखंडही परत विखुरले व नंतर सुमारे २४० दशलक्ष वर्षांपूर्वी एक नवीन महाखंड तयार झाला. या महाखंडाला ‘पँजिया’ (Pangea) असे म्हणतात. या पँजियाच्या सभोवती एकच प्रचंड महासागर होता. त्याला ‘टेथिस समुद्र’ (Tethys Sea) किंवा ‘पँथालास्सा’ (Panthalassa) असे म्हणतात. आपण मुख्यतः या पँजियापासूनच आपल्या नकाशाची सुरुवात करणार आहोत. यापुढे पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास करताना आपण भूत, वर्तमान व भविष्य अशा काळात करू म्हणजे समजायला सोपे जाईल.

 

 
 

. भूतकाळ - पँजिया हे महाखंड सुमारे २४० दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झाल्यानंतर सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी त्याचे विखंडन सुरू झाले. काही काळानंतर या पँजियाचे दोन भाग झाले. त्यातील उत्तरेकडच्या भागाला ‘लॉरेशिया’ (Laurasia) व दक्षिणेकडील भागाला ‘गोंडवानालँड’ (Gondwanaland) असे म्हटले जाते. आपला भारत देश हा या गोंडवानालँडचाच भाग आहे. सुमारे १४५ ते १५० दशलक्ष वर्षांपूर्वी या दोन्ही खंडांचे अजून लहान लहान तुकडे होऊ लागले. यापैकी गोंडवानालँडपासून अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया खंडे वेगळी झाली होती आणि याच वेळी आपला भारत, जो एकेकाळी अंटार्क्टिका खंडाचा भाग होता, त्यापासून सुटून निघाला आणि आत्ता जेथे आहे त्या ठिकाणी आला. अरून ८० दशलक्ष वर्षांनी लॉरेन्शियाचे दोन तुकडे झाले व त्यांतून उत्तर अमेरिका, युरोप व आशिया ही खंडे तयार झाली. याच वेळी गोंवानालँडचेही तुकडे विविध दिशांना गेले. यातून दक्षिण अमेरिका व आफ्रिका खंडे तयार झाली. ही खंडे त्यांच्या त्यांच्या प्लेट्सच्या हालचालींप्रमाणे पृथ्वीवर इकडेतिकडे जायला लागली.

 

. वर्तमानकाळ - सर्वांना माहीतच आहे की, सध्या पृथ्वीवर सात खंडे आहेत- आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. आता एकाच प्रचंड मोठ्या महासागराऐवजी पाच मोठे महासागर व अनेक समुद्र आहेत. बऱ्याच ठिकाणी सबडक्शन झोन आहेत. अनेक ठिकाणी प्लेट्सची हालचाल होते आहे. जमीन एकमेकांच्या खाली चालली आहे, तर काही ठिकाणी समुद्राखालून नवीन जमीन वर येत आहे. प्रशांत महासागराची प्लेट अमेरिका खंडाखाली चालली आहे, तर अटलांटिक महासागरातून एक अख्खी पर्वचरांगच उदयास येत आहे. हे चित्रही काही काळानंतर बदलणार आहे. भारतीय उपखंडसुद्धा आशिया खंडाखाली चालला आहेच की.

 

 
 

. भविष्यकाळ - शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, भविष्यात सुमारे २५० दशलक्ष वर्षांमध्ये सगळी खंडे पुन्हा एकत्र येतील आणि त्यांचे एक महाखंड तयार होईल. शास्त्रज्ञांनी याला ‘पँजिया अल्टिमा’ (Pangea Ultima) असे नाव दिले आहे. याला ‘पँजिया प्रॉक्झिमा’ (Pangea Proxima), ‘निओपँजिया’ (Neopangea) किंवा ‘पँजिया २’ (Pangea 2) असेही म्हणतात. याच्या सिद्धांतानुसार पृथ्वीवर एक महाखंड व एक खंडासारखा भाग असे जमिनीचे दोन भाग असतील. हा बाहेरचा भाग ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका खंडांपासून बनला असेल, तर महाखंड हे इतर सर्व खंडांपासून बनलेले असेल. यात दक्षिण अमेरिका आणि आशिया खंडे त्यांच्या दक्षिण टोकाला एकत्र येऊन हिंदी महासागराला भूमध्य समुद्रासारखे रूप देतील. आपला भारत हा या समुद्रातच असेल. उरलेला सगळा समुद्र हा प्रशांत महासागरच असेल. काही शास्त्रज्ञांचे मत मात्र या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. त्यांच्या मते, आशिया व उत्तर अमेरिका ही खंडे एकत्र येतील व त्यांचे महाखंड तयार होईल. याला त्यांनी ‘अमेशिया’ (Amasia) असे नाव दिले आहे.अजून एक मत असेही आहे की, ऑस्ट्रेलिया खंड आशिया खंडाला येऊन मिळेल आणि अंटार्क्टिका खंड सरळ उत्तरेला सरकेल. अर्थात, ही सर्व फक्त अनुमाने आहेत आणि भविष्यात यापेक्षा वेगळेही काही घडू शकते. तर, आपण पृथ्वीच्या आयुष्यातील विविध कालावधींमधील खंडांची स्थिती व त्यांचा साधारण नकाशा यांची माहिती घेतली. पुढील लेखात आपण ‘भूशास्त्रीय कालप्रमाण’ याची माहिती घेऊ.

 

( संदर्भ - https://www.youtube.com/watch?v=UwWWuttntio आणि विकिपीडिया)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/