ज्ञानसूर्याच्या प्रकाशाने झळाळणार पद्मश्री
महा एमटीबी   27-Jan-2019

 

 
 
 
 
ओडिशामधील कटकच्या बख्शी बाजारात एक छोटेखानी चहाचे दुकान चालवणारे प्रकाश राव आज ‘पद्मश्री’पर्यंत पोहोचले. पण पद्मश्री किताब मिळेपर्यंतची त्यांची ही वाटचाल सोपी नव्हती. त्यांना खडतर रस्त्यावरून संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागला.
 

लोकांची मदत करण्यासाठी आधी स्वत:कडे इतरांना देण्यासारखे काहीतरी असावे लागते. एखाद्याला परिस्थितीतून आत्मस्थितीत कणखररित्या उभे करण्यासाठी, त्याला देण्यासाठी आधी आपल्याकडे असावे लागते ते म्हणजे ‘ज्ञान’! स्वत:चा ज्ञानरुपी अमृताचा घडा जर पूर्णपणे भरलेला असेल, तर त्यातून तुम्ही इतरांना शिकवण देऊ शकता. परंतु, आपल्या या ज्ञानाचा वापर इतरांनाही करता यावा, यासाठी असावे लागते ते ‘सज्ञान’ आणि हे सज्ञान समाजातील फार कमी लोकांकडे असते. देवारपल्ली प्रकाश राव हे असेच एक सज्ञानी गृहस्थ! देवारपल्ली प्रकाश राव यांना यंदाचा मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. प्रकाश राव यांच्या कार्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची दखल घेतली. गेल्या वर्षी ३० मे रोजी झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देवारपल्ली प्रकाश राव यांच्या कार्याचा उल्लेख केला होता. प्रकाश राव यांचे कार्य खरोखरंच वाखाणण्याजोगे आहे.

 

 
 

ओडिशामधील कटकच्या बख्शी बाजारात एक छोटेखानी चहाचे दुकान चालवणारे प्रकाश राव आज ‘पद्मश्री’पर्यंत पोहोचले. पण पद्मश्री किताब मिळेपर्यंतची त्यांची ही वाटचाल सोपी नव्हती. त्यांना खडतर रस्त्यावरून संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागला. त्यांचे वडील सैनिक होते. दुसऱ्या महायुद्धात ते लढले होते. युद्ध संपल्यावर त्यांच्या वडिलांनी उपजीविकेसाठी कटकच्या बख्शी बाजारात चहाचे एक छोटेसे दुकान सुरू केले. परंतु, केवळ चहाच्या दुकानावर आपला संसार चालवणे त्यांना कठीण होऊ लागले. अशावेळी वडिलांना चहाच्या दुकानावर मदत म्हणून प्रकाश राव काम करू लागले. त्यासाठी त्यांना आपले शिक्षण मॅट्रिकआधीच सोडावे लागले. पण शिक्षणाची खरी किंमत त्यांना कळली होती. आपण शिक्षण पूर्ण करू शकलो नाही, त्यामुळे आपले नुकसान झाले. इतर कुणाचेही असे नुकसान होऊ नये, ही भावना त्यांच्या मनात होती. याच भावनेतून त्यांनी शिक्षणाचा वसा हाती घेतला. आपल्या आसपासच्या गरीब मुलांना शिकण्यासाठी शाळा नाही, हे लक्षात आल्यावर मुलांचे भविष्य घडविण्याचा त्यांनी निर्धार केला. २००० साली त्यांनी ‘आशा आश्वासन’ नावाची एक शाळा उघडली. ही शाळा इयत्ता तिसरीपर्यंत आहे. जवळपासच्या गरीब वस्तीतील चार ते नऊ या वयोगटातील ८० पेक्षा जास्त मुले आज त्यांच्या या शाळेत शिक्षण घेत आहेत. प्रकाश रावांनी शाळेत मुलांना शिकविण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली. प्रकाश राव स्वत:देखील या विद्यार्थ्यांना शिकवतात. आपल्या उत्पन्नातील अर्धा वाटा प्रकाश राव शाळेला देतात. शाळा इयत्ता तिसरीपर्यंत असली तरी, तिसरीनंतर शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सरकारी शाळेमध्ये प्रवेश घेऊन दिला जातो. प्रकाश राव स्वत: जातीने याप्रकरणी लक्ष घालतात. एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण अर्ध्यातून सुटता कामा नये, ही खबरदारी ते घेतात.

 

 
 

देवारपल्ली प्रकाश राव यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. ओडिया, बंगाली, तामिळ, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, मल्याळम या आठ भाषा त्यांना उत्तमरित्या बोलता येतात. त्यांचा जन्मच मुळात माणुसकी जपण्यासाठी झाला आहे. मृत्यूनंतर देहदान करण्याचा त्यांचा संकल्प आहे. आतापर्यंत २१४ पेक्षा जास्त वेळा त्यांनी रक्तदान केले आहे. तसेच १७ वेळा आपल्या शरीरातील प्लेटलेट्स दान केल्या आहेत. १७ वर्षांचे असताना त्यांना एका आजाराने प्रचंड ग्रासले होते. आजारपणामुळे ते थोडे अधू झाले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने रक्त दिल्यामुळे प्रकाश यांना जीवनदान मिळाले. त्याचवेळी त्यांनी शक्य असेल तोवर रक्तदान करण्याचा निर्धार केला. तसेच मृत्यूनंतर संपूर्ण शरीरातील अवयवदान करण्याचेही त्यांनी ठरवले. प्रकाश रावांच्या उल्लेखनीय कार्यासाठी २०१५ मध्ये मानवाधिकार दिवसाच्या निमित्ताने ओडिशाच्या ह्यूमन राइट्स कमिशनने त्यांचा गौरव केला. प्रकाश राव आणि त्यांच्या शाळेवर आजवर अनेक डॉक्युमेंट्रीज झाल्या आहेत.

 

प्रकाश राव यांची ‘आशा आश्वासन’ शाळा मुलांना केवळ प्राथमिक शिक्षण देत असली तरी, मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे कामही करते. शिक्षणाचे महत्त्व जे प्रकाश यांना कळले, ते या शाळेतील विद्यार्थ्यांनाही कळावे, याची खबरदारी घेतली जाते. या शाळेतून शिकलेले विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात नाव कमावत आहेत. काहीजण परीक्षेत प्रथम येऊन अभ्यासात आपली हुशारी दाखवतात, तर काही विद्यार्थी खेळात, क्रीडास्पर्धांमध्ये आपली चमक दाखवतात. शाळेतील महेश राव या विद्यार्थ्यांने २०१३ साली गोव्यात झालेल्या विंड सर्फिंग स्पर्धेत सहा सुवर्णपदके मिळवली होती. याचे सर्व श्रेय प्रकाश रावांना जाते. ज्ञानाचा प्रसार करणाऱ्या, आपल्याकडे काही नसूनही दुसर्‍यांना भरभरून देणाऱ्या देवारपल्ली प्रकाश राव यांना दै.‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/