भारतीय महिला क्रिकेट संघाने केला 'हा' पराक्रम
महा एमटीबी   24-Jan-2019नेपिअर : विराट सेनेपाठोपाठ आता भारतीय महिला क्रिकेट संघाने देखील न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या विजयात जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांचा मोलाचा वाटा होता. न्यूझीलंडच्या १९३ धावांचा पाठलाग करताना भारताने ९ विकेट राखून विजय मिळवला. जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने सहज विजय मिळविला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली. २००६ नंतर भारतीय महिलांनी प्रथमच न्यूझीलंड महिला संघावर न्यूझीलंडमध्ये विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.

 

न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी करून विक्रम केला. २००३ नंतर भारताच्या पहिल्या विकेटने नोंदवलेली ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली. २००३ मध्ये अंजू जैन आणि जया शर्मा यांनी १४४ धावांची भागीदारी केली होती. जेमिमा आणि स्मृती या जोडीने तोही विक्रम मोडला. तत्पूर्वी, भारतीय महिला गोलंदाजांनीदेखील चांगली कामगिरी करत १९२वर न्यूझीलंडला सर्वबाद केले. एकटा बिश्त आणि पूनम यादवने प्रत्येकी ३ विकेट तर दीप्ती शर्माने २ आणि शीख पांडेने १ विकेट घेतली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/