भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात रचले 'हे' विक्रम
महा एमटीबी   23-Jan-2019नेपियर : न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रम रचले आहेत. न्यूझीलंडच्या १५६ धावांचे आव्हान भारताने अगदी सहजरित्या पार केले. त्यामध्ये शिखर धवनच्या नाबाद ७५ धावा, कर्णधार विराट कोहलीच्या ४५ धावा तसेच, कुलदीप यादवच्या ४ विकेट्सचा समावेश होता. साध्य भारताने ५ दिवसाच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.

 

विराटने मोडला ब्रायन लाराचा सर्वाधिक धावांचा विक्रम

 

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यामध्ये कर्णधार विराट कोहलीने ४५ धावांची महत्वाची खेळी केली. याचसोबत तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता १०व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने ब्रायन लाराचा १० हजार ४०५ धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटच्या नावावर १० हजार ४३० धावा जमा झाल्या आहेत. त्याने हा विक्रम २२० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये केला आहे. यामध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने ४६३ सामन्यांत १८ हजार ४२६ धावा केल्या आहेत.

 

चायनामॅन कुलदीप यादव मोडले यांचे विक्रम

 

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयामध्ये कुलदीपच्या ४ विकेटचा मोठा वाट आहे. त्याने १० षटकांमध्ये ३९ धावा देत ४ विकेट घेतल्या. कुलदीपच्या नावावर ३६ सामन्यात ७३ बळीची नोंद झाली आहे. सुरुवातीच्या ३६ सामन्यांमध्ये ७३ बळी घेऊन त्याने यामध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज डेनिस लिली आणि वकार युनिस यांना मागे टाकले आहे. डेनिस लिलीने पहिल्या ३६ सामन्यांमध्ये ६९ तर वकार युनिसने ७० विकेट घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त अंजथा मेंडिस, मिचेल स्टार्क आणि हसन अली यांनी प्रत्येकी ३६ सामन्यात ७१ बळी मिळविले आहेत. कुलदीपने आशियाच्या बाहेर सर्वोत्कृष्ठ गोलंदाजी केली आहे. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात त्यांनी चांगली कामगिरी केली.

 

गब्बर धवनने केली 'या' दिग्गजाच्या विक्रमाशी बरोबरी

 

भारतीय सलामीवीर शिखर धवनने नाबाद ७५ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. याचसोबत त्याने त्याच्या कारकिर्दीत ५,००० धावांचा टप्पा गाठला. ११८ एकदिवसीय सामन्यात त्याने ५ हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. याचबरोबर त्याने विंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरी साधली. ब्रायन लारा ने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११८ सामन्यात ५ हजार धावा केल्या आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/