भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय
महा एमटीबी   23-Jan-2019नेपिअर : न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने ३८ षटकात सर्वबाद १५७ धावा केल्या. भारताने हे आव्हान ३४.५ षटकांमध्ये २ गडी गमावत पूर्ण केले. भारताकडून कुलदीप यादवने ४ बळी घेतले तर शिखर धवनने नाबाद ७५ धावा करून भारताला विजय मिळवून दिला. ५ एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

 

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, कर्णधार केन विलियम्सनचा हा निर्णय चांगलाच फसला. कर्णधाराने एकाकी झुंज देत ६४ धावांची खेळी केली. याशिवाय एकही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. रॉस टेलरच्या २४ धावांची खेळी वगळता एकही फलंदाजाला १५ पेक्षा जास्त धाव करता आल्या नाहीत. भारतीय गोलंदाजांनी मात्र शानदार कामगिरी केली. कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट घेतली, तर मोहम्मद शमीने ३ विकेट घेतल्या. याव्यतिरिक्त युझवेन्द्र चहलने २ तर केदार जाधवने १ बळी घेत न्यूझीलंडचा डाव ३८ षटकांमध्ये १५७ धावांवर आटोपला.

 

१५८ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात संथ गतीने झाली. त्यातच १०व्या षटकामध्ये रोहित शर्मा अवघ्या ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. अर्ध्या तासानंतर खेळ पुन्हा सुरु झाला तेव्हा भारताला डकवर्थ लूईस नियमांनुसार ४९ ओव्हरमध्ये १५६ धावांचे आव्हान मिळाले. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार कोहलीच्या ९१ धावांच्या भागीदारीने भारताला ध्येय साध्य करण्यास सोपे झाले. ३५व्या षटकामध्ये भारताने १५६ धावांचे लक्ष्य सहज पार केले. शिखर धवनने १०३ चेंडूंमध्ये नाबाद ७५ धाव केल्या ज्यामध्ये ६ चौकारांचा समावेश होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/