‘तुला पाहते रे’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?
महा एमटीबी   22-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एप्रिल महिन्यात ही मालिका संपणार आहे. असे सूचक वक्तव्य अभिनेता सुबोध भावे यांनी केले. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतदरम्यान सुबोध यांनी मालिकेसंबंधी ही माहिती दिली. अभिनेता सुबोध भावे यांनी ‘तुला पाहते रे’ या मालिकेच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले.
 

२००९ साली सुबोध यांची ‘कुलवधू’ ही मालिका झी मराठीवर आली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरु झालेली ‘तुला पाहते रे’ ही मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियेतेचे शिखर गाठले. टीआरपीमध्ये वरच्या क्रमांकावर राहण्याचे सातत्य या मालिकेने ठेवले आहे. ‘वय विसरायला लावणारी प्रेमकहाणी’ अशी या मालिकेची टॅगलाईन असून ईशा-विक्रांत या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

 

“२०१९ या वर्षामध्ये मी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायचे ठरवले आहे. मला काहीही झालेले नाही. त्यामुळे काळजी करू नका, पण खूप गोष्टी डोक्यात आहेत. गेल्या १७-१८ वर्षांपासून मी काम करत आहे. त्यातून आनंद मिळतो, पण कधीकधी खूप दमायला होते. थकवा येतो. झोप पूर्ण होत नाही. खाण्याच्या वेळा बदलल्याने त्याचा परिणाम कुठेतरी मग कामावर दिसायला लागतो. मला असे वाटते की आता या धावत्या घोड्याला थोडा लगाम लावला पाहिजे. यावर्षी एका नवीन पद्धतीने काम करायचे ठरवले आहे. यावर्षी खूप काम न करता थोडे पण चांगले आणि सकस काम करायचे मी ठरवले आहे. ‘तुला पाहते रे’ ही मालिका काही महिने सुरु राहील. मालिका संपेपर्यंत दुसरे कोणतेही काम हाती घेतलेले नाही. असे सुबोध भावे यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

 

‘अश्रुंची झाली फुले’ हे नाटक करणार असल्याची माहिती सुबोध भावे यांनी या मुलाखतीत दिली. गुढीपाडव्यापर्यंत हे नाटक रंगभूमीवर येईल. त्यामुळे यावर्षी एप्रिल महिन्यात तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/