म्हसोबा यात्रा विशेष : २०० वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्रातील प्रसिद्ध म्हसोबा यात्रा
महा एमटीबी   22-Jan-2019
 
 

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील म्हसा हे एक प्राचीन गाव. या गावात महेश्वराची पौष पौर्णिमेपासून यात्रा भरते. यावर्षी ही यात्रा सोमवार, दि. २१ जानेवारीला भरली असून पुढील १० दिवस भाविकांना, यात्रेकरुंना याचा आस्वाद घेता येईल.

 

मुरबाड ते कर्जत या मार्गावर १० किमी अंतरावर, तर कर्जतपासून ४२ किमी अंतरावर म्हसा गावात अतिप्राचीन असे म्हसोबाचे देवस्थान आहे. या देवस्थानावरूनच या गावाला ‘म्हसा’ हे नाव पडले. ‘म्हसोबा’ हे नाव ‘महेश्वर’ या शंकराच्या नावाचा अपभ्रंश असल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे एका लाकडी खांबातून शंकराचे लिंग मिळाले म्हणून या देवस्थानास ‘खांबलिंगेश्वर’ असेही म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून व उत्तर प्रदेश, मध्य, गुजरात असे परराज्यांतूनही लाखो भाविक दरवर्षी जनावरे खरेदीसाठी म्हसोबाच्या यात्रेला आवर्जून हजेरी लावतात. पौष वद्य प्रतिपदेला गुराढोरांची विक्री सुरू होते. जवळ जवळ ३० ते ३५ एकर जमिनीवर बैलांच्या व इतर जनावरांच्या रांगा उभ्या असतात. या दिवसाला ‘बाजार फुटला’ असे म्हणतात. यावेळी कोट्यवधी रुपयांची उलाढाल यात्रेत होते.

 

 
 

पौष शुद्ध पौर्णिमेला नवस बोलण्याचा सोहळा असतो व दुसर्‍याच दिवशी पौष वद्य प्रतिपदेला नवस फेडण्याचा समारंभ असतो. या दिवशी बाजारातील खरेदी-विक्रीला सुरुवात होते. नवस फेडण्याचा उत्सव मंदिराजवळील चौथर्‍याजवळ होतो. नवस फेडण्यासाठी येणार्‍या पुरुषाने पांढरे वस्त्र व महिलेने पिवळे वस्त्र नेसण्याची पद्धत आहे. म्हसोबाच्या नावाने भाविक नवस फेडण्यासाठी कोंबड्याचा व मेंढीचा बळी देण्याची प्रथा आहे. हे बळी मंदिराच्या पाठीमागील बाजूस बाहेर दिले जातात. म्हसोबाच्या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ‘मानाच्या काठ्या.’ म्हसा गावापासून सुमारे १४ किमी अंतरावरील सह्याद्री पर्वतावरील शिवकालीन सिद्धगडावर वसलेले व कोळी समाजातील वस्ती असलेले सिद्धगड गाव व म्हसा गावापासून जवळच असलेले आगरी समाजाची वस्ती असलेले कोरावळे गाव. या गावांच्या ‘मानाच्या काठ्या’ असतात. तिसरी काठी म्हसा गावातील पुजार्‍याकडे असते. पौष शुद्ध पौर्णिमेला या काठ्या सजवून वाजतगाजत मंदिराजवळच्या चौथर्‍याजवळ आणल्या जातात. पुजारी या तिन्ही काठ्यांची पूजा करतो. हा चौथरा शंकराची बहीण नागमाता देवीचा आहे.

  

मंदिराच्या सभोवताली १० ते १५ दिवस यात्रा भरते. या काळात महाराष्ट्रातील सांस्कृतिक ठेवा असलेल्या ‘तमाशा’ हा लोकनृत्य प्रकाराने आजही या यात्रेतील आपले वेगळे अस्तित्वच कायम राखले आहे. तीन ते चार तमाशाचेफड येथे रंगतात. त्याचबरोबर अनेक मनोरंजनाच्या साधनांप्रमाणे सर्कस, मौत का कुआ, आकाश पाळणे इत्यादी मनोरंजनाचे खेळ असतात. जीवनावश्यक वस्तू भांडी, बांबूच्या टोपल्या, मिठाई, प्रसाद यांनीही बाजारपेठ अगदी फुलून गेलेली दिसतेम्हसोबाच्या यात्रेनिमित्त शासनाला अतिरिक्त महसूलही मिळतो. त्याचबरोबर संपूर्ण शासन यंत्रणाही यात्रेनिमित्त लाखो भाविकांचे स्वागत करण्यास सज्ज झालेली असते. या यात्रेमध्ये येणारा बहुतांशी यात्रेकरू ‘हातोली’ हा मिठाईची सुप्रसिद्ध प्रकार विकत घेऊनच जातो. मिठाईमध्ये अनेक पारंपरिक प्रकार जरी मिळत असले तरी, खाजा, मुरुग व अधिक प्रसिद्ध असा ‘हातोली’ यांचा खप जास्त असतो. महाराष्ट्रातून व इतर राज्यांतून आलेल्या भक्तांना खांबलिंगेशरचे दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी देवस्थान ट्रस्टने योग्य नियोजन केले असल्याचे अध्यक्ष बाळू पष्टे यांनी सांगितले.

 

"म्हसा गावच्या विकासासाठी मी निधी कमी पडू देणार नाही." - किसन कथोरे, आमदार

 

म्हसा गावचा विकास !

"म्हसा गावचा विकास हा झपाट्याने होत आहे. गावात काँक्रिटचे सुंदर रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, यात्रेवर कॅमेर्‍याची नजर... यात अधिक भर म्हणून नुकतेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आ. किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. हा जो विकास आहे, तो केवळ आ. किसन कथोरे यांच्यामुळेच होत आहे."

- भास्कर वडवले, शासकीय यंत्रणा
 
 
-  
 - शंकर करडे 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/