सुप्रजा – भाग ४
महा एमटीबी   22-Jan-2019

 


 
 
 
शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी असे सांगितले आहे की, शुद्ध बीजे (बियाणे) पेरली, तर रसाळ (उत्तम दर्जाची) फळे उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे मातेने (स्त्रीने) व पित्याने (पुरुषाने) शरीर, मन शुद्ध करून त्याच्यातील स्त्रीबीज व शुक्राणूंचा दर्जा उत्तम केल्यास होणारे अपत्य हे सशक्त, निरोगी आणि सुंदर होईल. स्त्रीशरीराबद्दल मागील लेखात जाणून घेतले. आजच्या लेखातून पुरुषशरीराबद्दल व शुक्राणूंबद्दल थोडे जाणून घेऊया.
 

गर्भधारणा जरी स्त्रीच्या शरीरात होत असली, गर्भाची वाढ आणि गर्भाचे पोषण हे स्त्रीशरीरामार्फत होत असले तरी, गर्भ राहण्यासाठी शुक्राणूही तेवढेच महत्त्वाचे आहेत. आयुर्वेदशास्त्रानुसार,शरीरात सात धातू असतात. ते म्हणजे- रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. प्रत्येक धातूचे शरीरात विशिष्ट कार्य अव्याहतपणे सुरू असते. त्यापैकी शुक्र धातूचे प्रमुख कार्य हे प्रजननाचे आहेजसे स्त्रीशरीरात जननक्षमता विशिष्ट वयानंतर उत्पन्न होते; त्याचप्रमाणे पुरुषाच्या शरीरातही ठराविक कालावधीनंतर शुक्रधातूचे प्रजननाचे कार्य सुरू होते. आवाज फुटणे, दाढी-मिश्या येणे, जांघेत-काखेत केस येणे इ. शारीरिक, बाह्यांगावरील बदल ज्या वेळेस होतात, त्या वेळेस आंतरिक बदलही सुरू होतात. त्यातील एक बदल म्हणजे शुक्रधातूचे कार्यान्वित होणे होय. तारुण्यावस्थेपासून वार्धक्यापर्यंत ही क्षमता असते. पुरुषाच्या शरीरात शुक्रनिर्मिती ही वृषणात (Testicles) होते. हा शारीरिक अवयव मुख्य शरीराच्या बाहेर असतो. यांचे एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे, शुक्राणूंना अधिक उष्ण तापमान सोसवत नाही. शरीराच्या वृषणप्रदेशी उष्मांक कमी असतो. जर तापमान कमी असले, तर शुक्र उत्पत्ती उत्तम होते. पण, जर तापमान (वृषण प्रदेशाचे-testicular region)चे वाढले, तर शुक्राणू नीट तयार होत नाही. त्यांच्या संख्येत घट होते. तसेच दुष्ट शुक्र अधिक तयार होतात. शुक्राणूंची स्वत:ची एक विशिष्ट गती असते. त्या गतीमुळे ते स्त्रीशरीरात प्रवेशित होऊ शकतात आणि गर्भधारणा होते. पण, उष्णता अधिक असल्यास ही गती मंद होते. म्हणजे सारांश असा की, शरीराची उष्णता अधिक वाढू द्यायची नाही. उष्णता कशाने वाढते? तर अधिक काळ उष्णतेत काम केल्याने (स्वयंपाकघर, अतिउष्णता असणाऱ्या कारखाना) किंवा आहारात खूप मसालेदार, मिरचीयुक्त तिखट पदार्थ खाल्ल्याने, रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने, व्यसन केल्याने (तंबाखू, विडी, सिगारेट, मद्यपान इ.) ने शरीरात विविध दोष उत्पन्न होतात आणि त्याचा परिणाम शुक्राणूंवर होतो.

 
हल्ली अजून एक महत्त्वाचे कारण पुरुषांमध्ये आढळते. ते म्हणजे, घट्ट जीन्स किंवा पॅण्ट घालणे. यामुळे वृषण भाग दाबला जातो. त्या जागी घर्षण होते आणि स्थानिक (Localisad) उष्णता वाढते. महाविद्यालयीन काळापासून जर घट्ट, अगदी मापाच्या पॅण्ट व जीन्स घातल्या, तर उत्पत्ती (Formation) च्या वेळेतच बिघाड, विकृती निर्माण होऊ शकते. म्हणून असे कपडे घालणे टाळावे. काही वेळेस, छोटेसे बदलही मोठ्या आजारांपासून (शारीरिक व मानसिक दोन्ही) आपल्याला वाचवू शकतात. आहारातील कुपथ्यामुळे वारंवार पित्त वाढत असेल, आम्लपित्त, शरीरात उष्णता वाढणे इ. होत असेल, तर तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने विरेचन हा पंचकर्मातील शोधन उपचार करून घ्यावा. शरीरात वाढलेले पित्त शरीराबाहेर काढून टाकल्याने पित्तामुळे होणारे त्रास थांबतात. त्याचबरोबर ज्या कारणांनी (आहारीय, विहारीय व आचारीय म्हणजेच चुकीच्या खाद्य पद्धतीने, राहणीमानाने आणि आचरणाने) पित्त दूषित होते, बिघडते तीही कारणे बदलावीत. यामुळे वारंवार होणारा त्रास संपूर्ण बरा होऊ शकतो.
 

विरेचनाबरोबरच पादाभ्यंग आणि शीत जलस्नान (थंड पाण्याने आंघोळ) इ. उपायांमुळे शुक्राणूंवर होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेचा त्रास कमी होतो. शुक्राणूंची गती, संख्या इ. पूर्ववत प्राकृत आणता येते. शरीरातील उष्णता नियंत्रित राखण्यासाठी गुलकंदाचा वापर करावा, तसेच धणे-जिऱ्याचे पाणी करून प्यावे. डोक्याला तेल लावावे, शांत झोप लागते. रात्री झोपताना गरम दूध आणि तूप प्यावे. त्यामुळे कोठाही साफ राहतो आणि झोपही लागते. काही औषधीचिकित्सा करावी लागल्यास तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. कुठल्याही जाहिरातींना भुलून जाऊ नये. त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतातशुक्राणूवृद्धीसाठी काही विशिष्ट आहारीय कल्प आहेत. जसे उडीद. शरीरशुद्धीनंतर आठवड्यातून दोन वेळा उडदाच्या डाळीचे वरण प्यावे. पण, उडीद पचायला खूप जड असतो म्हणून ही डाळ दिवसाच घ्यावी. रात्रीच्या आहारातून घेऊ नये. तसेच ही डाळ ज्या वेळेस खात असाल त्या दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये शारीरिक हालचाल, व्यायाम अवश्य करावा. अधूनमधून उडदापासून बनविलेले वडेही खावेत. पण, ते दह्यात बुडवून खाऊ नयेत. उडीत जर पचला नाही, तर अजीर्ण होते आणि मग रोजचे आहारही पचेनासे होते. तेव्हा व्यायामाने शरीरक्षमता वाढवावी आणि मगच उडदाचा प्रयोग आहारातून करावा. याबरोबरीने काही औषधेही (गरज असल्यास) शुक्रवर्धनासाठी, तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच सुरू करावीत.

 

बहुतांशी वेळेस व्यसनाधीनता जी असते, त्याचे मूळ मानसिक ताण व चिंता यात दडलेले असते. पण, व्यसनांमुळे ताण कमी होत नाही, फक्त झाकला जातो. त्याबद्दलची संवेदना मंद केली जाते. पण, व्यसनाचा परिणाम कमी झाला की, सगळी स्थिती पूर्ववतच असते हे जाणवते. हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी मानसिक ताण व चिंता यावर नियंत्रण आणणे महत्त्वाचे आहे. शारीरिक कष्ट व व्यायामाने हे नियंत्रण मिळवणे काही प्रमाणात साध्य करता येते. त्याचबरोबर प्राणायाम व विविध ध्यान करण्याच्या पद्धतींचाही फायदा होतो. मानसिक ताण कमी करण्यासाठी शिरोधारा, शिरोभ्यंग, पादाभ्यंग इ. पद्धतींचाही उपयोग होतो. सकारात्मक छंदांचाही (संगीत, वाद्य वादन, लेखन, चित्रकला, क्रीडा कौशल्य इ.) उत्तम फायदा होतो. सकारात्मकता ही सर्व पैलूंवर लख्ख प्रकाशासारखी काम करते. नैराश्यात न जाता काही गोष्टी स्वीकारणे हेदेखील गरजेचे आहे. पण, प्रयत्न करणे मनुष्याच्या हातात असते. त्याचे जे फळ मिळेल ते स्वीकारावे. हे झाले विहारीय बदल आणि आचरणातील बदल. या पद्धतीने बदल घडविल्यास इच्छित फलप्राप्ती अवश्य होते. पुढील लेखात दर महिन्यातील गर्भाची वाढ जी आयुर्वेदशास्त्रात टप्प्याटप्याने सांगितली आहे, त्याबद्दल विशेष जाणून घेऊया.

 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/