आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीला अटक
महा एमटीबी   02-Jan-2019


 


जालना - राज्य तंत्र शिक्षण संस्थेच्या नावाने बनावट प्रमाणपत्र तयार करून २ हजार रुपयांना विकणाऱ्या तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्री अटक केली. बदनापूर तालुक्यातील धोपेश्वर येथे २ तरुण बनावट प्रमाणपत्र तयार करत होते. भगवान खांडेभराड आणि संतोष मनभरे हे दोघे आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र तयार करत आणि केवळ दोन हजार रुपयांत विकत होते. बदनापूरमधील एका फोटो स्टुडिओत आयटीआयचे प्रमाणपत्र बनवून ते दोन हजार रुपयांत विक्री केले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला.

 

आत्तापर्यंत १० गरजूंनी हे प्रमाणपत्र विकत घेतली आहे. वर्षभरापासून हा धंदा चालू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या २ हजार रुपयांच्या प्रमाणपत्रावर अनेक तरुणांना जालना आणि औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरी मिळवली आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून गाव तेथे विद्युत सहाय्यक म्हणून वीज मंडळाच्यावतीने भरण्यात आलेल्या जागांमध्येही या बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून तरुणांनी नोकऱ्या मिळविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

"फोटो स्टुडिओच्या मालकासह आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. बनावट प्रमाणपत्र बनवून अनेकांची फसवणूक केल्याचे देखील प्रथमदर्शनी तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी फोटो स्टुडिओमधून संगणक, स्कॅनर आणि प्रिंटरसह अन्य साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे." अशी माहिती पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/