रजोगुणी-तमोगुणी
महा एमटीबी   02-Jan-2019


 

कपिल महामुनींनी सामान्यपणे सर्वांच्या ठिकाणी असलेल्या सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांची संकल्पना मांडली. सर्व मानवजातीच्या विविध क्रियांचे वर्गीकरण या तीन गुणांत करता येते. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या ठिकाणी सत्त्व, रज, तम हे गुण असतात. त्यांचे प्रमाण व्यक्तीप्रमाणे वेगवेगळे असते. या तीन गुणांपैकी ज्या गुणाचे प्राबल्य दिसून येते, त्यानुसार त्या माणसाचे वर्तन असते.

 

या विश्वातील प्रत्येकजण हा दुसर्‍यापेक्षा वेगळा असतो. असे असले तरी समस्त मानवजातीच्या मुळाशी काहीतरी सामान्य तत्त्वे, गुणधर्म असले पाहिजे. यावर विचार करताना कपिल महामुनींनी सामान्यपणे सर्वांच्या ठिकाणी असलेल्या सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांची संकल्पना मांडली. सर्व मानवजातीच्या विविध क्रियांचे वर्गीकरण या तीन गुणांत करता येते. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या ठिकाणी सत्त्व, रज, तम हे गुण असतात. त्यांचे प्रमाण व्यक्तीप्रमाणे वेगवेगळे असते. या तीन गुणांपैकी ज्या गुणाचे प्राबल्य दिसून येते, त्यानुसार त्या माणसाचे वर्तन असते. या त्रिगुणांत सत्त्वगुण महत्त्वाचा असून त्या सत्त्वगुणामुळे माणूस परमार्थाकडे वळतो, मनःशांती मिळवतो. मानवी देहात या तीनही गुणांचे मिश्रण आढळते. समर्थ सांगतात, सत्त्वगुणामुळे भगवंताची भक्ती करता येते. रजोगुणामुळे विश्वातील घटनांची पुनरावृत्ती होत असते आणि तमोगुणामुळे अधोगती होते. या विधानाच्या पुष्ट्यर्थ समर्थांनी भगवद्गीतेचा एक श्लोक उद्धृत केला आहे.

 

उर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था

मध्ये तिष्ठन्ति राजसाः

जघन्यगुणवृत्तिस्था अधो

गच्छन्ति तामसाः (१४.१८)

 

त्यानंतर समर्थांनी त्रिगुण सविस्तरपणे सांगायला सुरुवात केली आहे. या गुणांमध्ये समर्थांनी ‘शुद्ध’ आणि ‘शबल’ असे दोन भेद केले आहेत. शुद्धगुण परमार्थाची गोडी उत्पन्न करतो, तर शबल गुणामुळे प्राणी प्रपंचात अडकून पडतो. प्रथम समर्थांनी रजोगुण सांगायला सुरुवात केली. या रजोगुणाचा पसारा मोठा असल्याने प्रथम त्याचा परिचय करून देणे समर्थांना योग्य वाटले असावे. त्याची लक्षणे खूप आहेत म्हणून समर्थांनी तो संक्षेप रूपाने मांडला आहे. (संक्षेपे केले कथन । ओवी २.५.४०) मानवाचे नित्याचे रोजचे जीवन गतिमान आहे. त्यात धडपड आहे, संघर्ष आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी माणसाला श्रम करावे लागतात. परिस्थितीशी झगडावे लागते. अनेक गोष्टी मिळवाव्यात, अशी माणसाची इच्छा असते. माणूस अनेक ध्येये उराशी बाळगतो. त्याच्या मनात अनेक आशा-आकांक्षा असतात. त्यांच्या पूर्ततेसाठी त्याला सतत कार्यरत राहावे लागते. यासाठी रजोगुणाची आवश्यकता असते. ही ध्येये चांगली असतात, तोपर्यंत मानवजातीला त्याचा फायदा होतो. मानवाच्या सुखी आयुष्यासाठी विज्ञानाची झालेली प्रगती. वैद्यक शास्त्रातील (डलळशपलश ेष चशवळलळपश) प्रगती अनेक प्रकारची विकासकामे यासाठी रजोगुणाची आवश्यकता असते. परंतु, जेव्हा या रजोगुणाचा उपयोग केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या प्रपंचासाठी केला जातो, तेव्हा त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. असा रजोगुणी मनुष्य स्वार्थी असतो. तो विचार करतो की, हे घर माझे आहे. हा संसार माझा आहे, हे नातेवाईक, कुटुंबातील आई-वडील, बायको, पोरे सर्वजण माझे आहेत. मग यामध्ये हा सर्वश्रेष्ठ देव कोणी आणला? या देवाची आवश्यकता आहे का? तो कशाला पाहिजे? अशा तर्‍हेने तो विचार करू लागतो.

 

माझे घर माझा संसार ।

देव कैंचा आणिला थोर ।

ऐसा करी जो निर्धार ।

तो रजोगुण ॥ (दा. २.५.८)

 

हा रजोगुणी मनुष्य कुटुंबातील माणसांची काळजी करतो. माझे घर, माझा गाव, माझा देश असा त्याला वृथा अभिमान असतो. त्याला वाटते चांगले पदार्थ खावे, चांगली वस्त्रे परिधान करावी, नाटक-सिनेमा वगैरे करमणुकीचे प्रकार सारखे पाहावे. त्याला वाटत असते की, मी नेहमी सुंदर, तरुण दिसावे. लोकांनी मला बलवान समजावे. लोकांनी माझी वाहवा करावी. अशा वासना त्याच्या मनात नेहमी असतात. त्याला असे वाटत असते की, दुसर्‍यांचे सर्व काही जावे. त्यांना जे काही मिळाले आहे, त्याचा नाश व्हावा. परंतु, मला मात्र सर्व काही मिळावे. रजोगुणी व्यक्तीच्या ठिकाणी द्वेष, मत्सर, कपट, तिरस्कार, तसेच कामविकार उत्पन्न होतात. बाहेरील जगात तो जे जे काही पाहतो, ते सर्व माझ्याजवळ असावे, अशी इच्छा तो मनात धरतो. तथापि पाहिलेल्या सर्व गोष्टी त्याला मिळणे शक्य नसते. त्यामुळे हा रजोगुणी माणूस दुःखी होतो. या रजोगुणी माणसाला विनोद करणे आवडते. त्याला शृंगारिक गाणी ऐकायला आवडतात. त्याला जातायेता टवाळी करणे, निंदा करणे व त्यातून भांडण करणे आवडते. त्याला नीच माणसांची संगत आवडते. अशी शबल रजोगुणाची अनेक लक्षणे समर्थांनी २.५ या समासात सांगितली आहेत.

 

वस्तुतः रजोगुण हा मुळात वाईट आहे असे मुळीच नाही. शुद्ध स्वरूपाच्या रजोगुणामुळे माणसाला ऊर्जा मिळते. काम करायची प्रेरणा मिळते. या धडपडीतून समाजाला अनेक उपयोगी गोष्टी मिळत असतात. अनेक सुखसोयींचे वैज्ञानिक शोध रजोगुणामुळे लागले आहेत. परंतु, त्याच रजोगुणांचा वापर जेव्हा स्वतःपुरताच असतो तेव्हा तो बंधनकारक होतो. असा मनुष्य स्वार्थी बनतो. ‘मी व माझे कुटुंब’ या पलीकडे त्याला पाहता येत नाही. सर्व काही मलाच मिळावे, अशी हाव त्याच्या ठिकाणी उत्पन्न होते. परोपकार, सद्गुण, त्याग असल्या गोष्टींचा विचार त्याला सुचत नाही. हा शबल रजोगुण होय. अशा स्वार्थी अहंकाराने रजोगुणात गुरफटलेल्या माणसाची त्यातून सुटका होण्यासाठी काही उपाय आहे का? यातून बाहेर पडण्यासाठी भगवद्भक्ती हा एकच उपाय आहे, असे समर्थ सुचवतात.

 

उपाये येक भगवद्भक्ति ।

जरी ठाकेना विरक्ति ।

तरी येथानुशक्ति ।

भजन करावे ॥ (दास. २.५.३६)

 

आजकाल भगवंताचे भजन-पूजन करणे, भगवंताचे स्मरण करणे (जप करणे) हे मागासलेपणाचे लक्षण समजण्याची एक फॅशन झाली आहे. आमचे पुढारलेपण म्हणजे छानशौकीनपणे राहणे, पोशाखी व्यक्तिमत्त्वाचा बडेजाव करणे, सौंदर्य प्रसाधनांचा अतिरंजीत वापर करून समाजात प्रतिष्ठा मिळविण्याचा प्रयत्न करणे, सद्गुणांची फिकीर न करता उन्मत्त द्रव्याचे सेवन करणे, त्यात काही कमीपणा आहे असे न मानणे, व्यसनाधीनतेची पर्वा न करणे. बेजबाबदारपणे वागणे हीसुद्धा फॅशन झाली आहे. शिस्त आणि बंधने यातील विवेक न समजल्याने मी कशाला पारमार्थिक बंधने पाळू? मी स्वतंत्र आहे, मला कशाला नीतीबंधने हवीत? अशी भाषा ऐकायला मिळते. हसतखेळत, मौजमजा करीत जीवन जगावे. परमार्थाचा, देवाचा, भगवंताचा, नीतीबंधनाचा माझा काही संबंध नाही. मी स्वतंत्र विचारांचा आहे. हे विचार हा शबल रजोगुणाचा परिणाम आहे. तथापि, शुद्ध रजोगुण हा परमार्थाला उपयोगी पडणारा आहे. त्यामुळे या शुद्ध रजोगुणाचा समावेश सत्त्वगुणात करता येतो.

 

दासबोधातील या पुढील समास तमोगुणाचा आहे. प्रपंचातील दुःखामुळे या तमोगुणी माणसाच्या ठिकाणी क्रोध उत्पन्न होतो. क्रोध अनावर झाला की, हा आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुले यापैकी कोणालाही ओळखत नाही. एखाद्या पिशाच्चाप्रमाणे हा वागतो. त्याला राग आवरता येत नाही. तो कोणाचाही घात करतो. प्रसंगी आत्महत्या करायलाही मागेपुढे पाहत नाही. किडा, मुंगी, पशू, पक्षी यांचा गंमत म्हणून वध करायला याला आवडते. हा सर्वांशी उद्धटपणे वागतो. त्याच्या मनात कपट असते. त्याला भांडणे आवडतात. लोकांची भांडणे लावून देऊन हा मजा पाहत असतो. मारामारी, युद्ध पाहणे याला आवडते. या तामसी माणसाला तीर्थयात्रा, देव, धर्म, वेदशास्त्र यापैकी काहीही आवडत नाही. चेटूक विद्या त्याला आवडते. देवालये, मंदिरे तोडून टाकावी, फळे आलेली झाडे उद्ध्वस्त करावी, असे त्याला वाटते. येथे मंदिर तोडणारे, देवाच्या मूर्ती फोडणारे जे मुघल अत्याचारी आहेत, ते तमोगुणी आहेत असे सांगायचे आहे. या तमोगुणी माणसाला अघोरी क्रिया करायला आवडते. तमोगुणी माणसाची अनेक लक्षणे समर्थांनी या समासात सांगितली आहेत. हा तमोगुण माणसाचे पतन करतो. तरी हा तमोगुण विस्ताराने का सांगावा लागला, हे समर्थ या समोरापाच्या ओवीत सांगतात-

 

ऐसा हा तमोगुण । सांगता तो असाधारण ।

परी त्यागार्थ निरूपण । काही येक केले ॥

[email protected]

- सुरेश  जाखडी 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/