अर्जुनाचा पण!
महा एमटीबी   02-Jan-2019


 
अर्जुन काळोखात सर्वांकडे रोखून पाहत विचारू लागला, “तुम्ही सारे हतबल झालेले दिसत आहात, काय झाले आहे? मला कुणी सांगाल का? माझा लाडका पुत्र अभिमन्यू कुठेच दिसत नाही, तो असता तर नक्कीच माझ्या स्वागतासाठी हसतमुखाने पुढे आला असता. कुठे आहे अभिमन्यू? मला असे कळले की, द्रोणांनी अभेद्य असा चक्रव्यूह रचला होता. तुम्ही माझ्या मुलाला त्या व्यूहात पाठवलेत की काय?” यावर कोणीच काही बोलेना. 
 
 
 

त्रिगर्ताशी युद्ध करून अर्जुन सूर्यास्तास परत आला, तेव्हा सर्व पांडव बंधू काळोखातच बसले होते. युधिष्ठिराच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या. भीम शोकाकुल अवस्थेत होता. इतका विकल झालेला भीम अर्जुन प्रथमच पाहत होता. अर्जुनाचे सांत्वन करण्यासाठी तो उठून उभा राहिला आणि जागेवरच कोसळला. नकुल खिन्न अवस्थेत जमिनीकडे डोळे लावून बसला होता. सहदेव शून्यात नजर लावून बसलेला होता. अर्जुन काळोखात सर्वांकडे रोखून पाहत विचारू लागला, “तुम्ही सारे हतबल झालेले दिसत आहात, काय झाले आहे? मला कुणी सांगाल का? माझा लाडका पुत्र अभिमन्यू कुठेच दिसत नाही, तो असता तर नक्कीच माझ्या स्वागतासाठी हसतमुखाने पुढे आला असता. कुठे आहे अभिमन्यू? मला असे कळले की, द्रोणांनी अभेद्य असा चक्रव्यूह रचला होता. तुम्ही माझ्या मुलाला त्या व्यूहात पाठवलेत की काय?” यावर कोणीच काही बोलेना.

 

मग अर्जुन म्हणाला, “अभिमन्यूखेरीज कुणीच चक्रव्यूह तोडू शकत नव्हते. त्यात कसा प्रवेश करावा एवढे मी त्यास शिकवले होते. पण, बाहेर पडावे कसे, हे मी त्याला शिकविले नव्हते. तुम्ही त्याला चक्रव्यूहात पाठवले की काय?” उत्तर येईल म्हणून तो सर्वांकडे अपेक्षेने पाहू लागला पण कुणीच काही बोलेना! फक्त युधिष्ठिर जोरजोरात हुंदके देऊन रडत होता. अर्जुन भीतीने गारठला. त्याच्या नजरेला कुणी नजर देत नव्हता. युधिष्ठिर त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “अर्जुना, आता फक्त एक कर. आधी माझा वध कर! तुझ्या पुत्राचा जीव घेणारा मी तुझ्यासमोर उभा आहे. मला ठार कर! त्यानंतर तू बोलू शकतोस. होय, माझ्यामुळेच अभिमन्यूस मृत्यू आला. मीच त्याला ठार मारलं. तू त्याचा सूड घे आणि मला आधी ठार मार.” इतके बोलून युधिष्ठिर अर्जुनाच्या पायांपाशी मूर्च्छित होऊन पडला. अर्जुन अवाक् झाला! त्याला शब्द फुटेना, आपल्या पुत्राचा वध झाला, ही कल्पनाच त्याला सहन झाली नाही. हे ऐकून श्रीकृष्णही गलितगात्र झाला. तो भीमाशेजारी भूमीवर बसला. कृष्णाचे डोळे पाण्याने भरून आले. त्याने भीमाचा हात आपल्या हाती घट्ट धरून ठेवला. भीम तर दु:खाने मोडून पडला होता. अर्जुनाला ही बातमी ऐकताच मूर्च्छा आली. काही क्षणांनी तो जागा झाला आणि म्हणाला, “सांगा, मला सांगा कुणीतरी, हे कसे झाले? त्याला कुणी मारले? त्याला तर चक्रव्यूहात फक्त प्रवेश कसा करायचा एवढेच माहीत होते, हे त्याने तुम्हाला सांगितलेच असणार! कुणाची हिम्मत झाली, माझ्या पुत्राच्या अंगाला हात लावण्याची? आता त्याच्यामागे मी तरी जिवंत का राहू? अभिमन्यूचा वध झाला आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही.” अर्जुन बराच वेळ शोक करत राहिला. मग तो युधिष्ठिराला म्हणाला, “दादा, तू हे काय केलेस? कसे केलेस? त्याला कोणतीही मदत न देता तू त्याला चक्रव्यूहात पाठवलेस? तू हे कसं करू शकलास? तिथे तू होतास, सात्यकी होते, धृष्टद्युम्न, नकुल, सहदेव सर्व वीर होते. तू त्याला कसे एकटे जाऊ दिले? मला सांगा, त्याचा वध कुणी केला? नक्कीच ही लबाडी आहे. तो असा मरणारा नाही, त्याच्याशी कुणीच युद्ध करू शकत नव्हते.” एवढे बोलून अर्जुनाला पुन्हा ग्लानी आली. तो थोड्या वेळाने सावरला.

 

त्याचा हात हाती घेऊन श्रीकृष्ण म्हणाला, “अर्जुना, आता शोक आवर. अभिमन्यू वीरासारखा लढला आणि त्याला शूरवीराचे मरण आले आहे. इतरांच्या भल्यासाठी त्याने मरण पत्करले. त्याला नक्कीच स्वर्ग प्राप्त झाला आहे. आता तू तुझ्या भावांकडे पाहा. ते दु:खात बुडून गेले आहेत. त्यांचं सांत्त्वन कर. तुला दु:खात पाहून ते अधिकच दु:खात बुडत आहेत. अभिमन्यू त्या सर्वांचाही अतिशय लाडका पुत्र होता, हे तू विसरतो आहेस. त्यांचे सांत्वन आधी कर.” 

 

त्याच क्षणी अर्जुन भीमाकडे गेला. भीम आणि युधिष्ठिराच्या पाया पडून तो म्हणाला, “मी माझ्या दु:खात अंध झालो होतो. मला समजते आहे की, तुम्हाला पण किती दु:ख झाले आहे. मला क्षमा करा. मला तपशीलाने सांगा की, त्याला कुणी कसे मारले?” युधिष्ठिराने त्याला जवळ घेऊन बसवले आणि तो म्हणाला, “आपल्या कुटुंबाचा लाडका पुत्र कसा मारला गेला, हे मी आता तुला सांगतो. त्रिगर्त बंधू तुला दूरवर घेऊन गेले, हाच एक डाव होता. त्यानंतर द्रोणांनी आपल्या सेनेचा चक्रव्यूह रचला. त्यांना सामोरे जाण्याची तयारी आम्ही पण केली. पण, तो महाभयंकर चक्रव्यूह होता. अभिमन्यू म्हणाला, “मी व्यूहाचा भेद करू शकतो. माझ्यामागोमाग तुम्ही सारे या. परंतु, त्याच्या आणि आमच्यामध्ये जयद्रथ आडवा आला. अभिमन्यूने त्यांचा खूप मोठा संहार केला, पण, अखेरीस त्याचा वध झालाच.” एवढे बोलून युधिष्ठिर पुन्हा शोकाकुल झाला. त्याला अश्रू आवरेनात!

 

सहदेव अर्जुनाजवळ आला आणि म्हणाला, ‘’कुरुक्षेत्रावर आज एक फार मोठ्ठा गुन्हा घडला आहे. कसा ते मी सांगतो. तुझा पुत्र अभिमन्यू याला द्रोण, कृप, राधेय, कृतवर्मा, अश्वत्थामा आणि दु:शासनाचा पुत्र या सहा जणांनी एकदम घेरले. राधेयाने त्याचे धनुष्य तोडले. द्रोणांनी रथाचे घोडे मारून टाकले. कृपांनी त्याचा सारथी मारला आणि दु:शासनाच्या पुत्राने त्याचा वध केला. आम्ही काहीच करू शकलो नाही. तू आम्हाला हवी ती शिक्षा कर. आम्ही सर्वांनी मिळून अभिमन्यूला मारले,” हे बोलून सहदेव दु:खात बुडून गेला. अर्जुनाचा संताप झाला. तो बेशुद्ध पडला. सर्वांनी त्याच्या मुखावर गुलाबपाणी शिंपडले तेव्हा कुठे त्याला जाग आली. तो रागाने थरथरत होता. तो म्हणाला, “मी अर्जुन, अशी प्रतिज्ञा करतो की, मी उद्या सूर्य मावळण्यापूर्वी त्या जयद्रथाला ठार करीन! मी जर तसे करू शकलो नाही, तर या माझ्या गांडीव धनुष्यासकट मी अग्निप्रवेश करीन.”

 - सुरेश कुळकर्णी
 

[email protected]

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/