आता उपग्रहांवरही नजर...
महा एमटीबी   02-Jan-2019


देशाच्या संरक्षणासाठी उपयुक्त असलेले उपग्रहदेखील ‘इस्रो’ने यशस्वीरित्या अंतराळात सोडले. इतकंच काय तर इतर देशांचे उपग्रह सोडण्यासही भारताच्या या महत्त्वपूर्ण संस्थेची मदत झाली. त्यामुळेच का होईना, चीनकडून आता यावर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 
 

असे अनेकजण असतात, ज्यांना दुसर्‍यांची प्रगती बघवत नाही. भारताच्या शेजारी देशांच्या बाबतीतही काहीसं असचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकीकडे पाकिस्तानसारख्या देशाने दहशतवादाचं बीज पेरलं, तर दुसरीकडे चीनसारख्या देशाने विस्तारवादी भूमिका स्वीकारत दुसर्‍या देशांची भूमी बळकावण्याचं काम केलं. गेल्या वर्षी सुरुवातीलाही चीनने डोकलाममध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. भारताची प्रगती आणि सर्वच देशांचा भारताकडे बघण्याचा बदलणारा दृष्टिकोन, यामुळे कदाचित चीनला पोटशूळ उठला असावा. भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अनेक उपग्रह अंतराळात सोडले. नुकतेच देशाच्या संरक्षणासाठी उपयुक्त असलेले उपग्रहदेखील ‘इस्रो’ने यशस्वीरित्या अंतराळात सोडले. इतकंच काय तर इतर देशांचे उपग्रह सोडण्यासही भारताच्या या महत्त्वपूर्ण संस्थेची मदत झाली. त्यामुळेच का होईना, चीनकडून आता यावर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

भारताने अवकाशात सोडलेल्या उपग्रहांवर नजर ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ तिबेटमध्ये एक सॅटेलाईट ट्रॅकिंग सेंटर उभारलं आहे. याच सॅटेलाईट ट्रॅकिंग सेंटरचा वापर करून भारताच्या उपग्रहांवर चीनला नजर ठेवता येणार आहे. नियंत्रण रेषेपासून जवळपास १२५ किलोमीटर अंतरावर तिबेटमधील नगारी या ठिकाणी चीनने हे सॅटलाईट ट्रॅकिंग सेंटर आणि वेधशाळा उभारली आहे. काही तज्ज्ञांच्या मते, ही वेधशाळा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आली आहे. या सॅटेलाईट ट्रॅकिंगच्या मदतीने उपग्रहांचा शोध घेण्याबरोबरच त्यांना ‘ब्लाईंड’ही (काहीही पाहू शकणार नाहीत) करता येऊ शकते. दुसरीकडे भारतानेही चीनने उचललेल्या या पावलावर प्रतिबंध म्हणून एक रणनीती आखली आहे. भारतही भूतानमध्ये एक सॅटेलाईट ट्रॅकिंग सेंटर आणि डेटा रिसेप्शन सेंटर उभारत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे सेंटर उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. भारताने उचललेले हे पाऊल म्हणजे चीनला लगावलेली एक चपराकच म्हणावी लागेल. भूतानमध्ये उभे राहणारे हे सेंटर भारताच्या आणि भूतानच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भूतान हा देश भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या मधोमध असल्यामुळे या सेंटरचे महत्त्व अधिकच वाढणार आहे. डोकलाममध्ये चीनच्या सैनिकांनी ट्राय जंक्शनवर रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारतीय सैनिकांनीही ७२ दिवस कडवी झुंज देत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यामुळे अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर हे भारताकडून उभारण्यात येणारे हे सेंटर केवळ भूतानच्या मदतीला येणार नसून आपल्याही सार्वभौमत्वासाठीही मदतीचे ठरणार आहे. भूतानलादेखील हवामानाची माहिती, टेलि-मेडिसीन आणि आपत्कालीन परिस्थितीची माहिती या सेंटरच्या मदतीने घेता येणार आहे. चीनने नगारी या ठिकाणी सुरू केलेल्या सेंटरमुळे त्यांच्या ‘एचक्यू १९/एससी १९’ आणि ‘डोंगेंग २’ या अ‍ॅन्टी सॅटेलाईट मिसाईल वेपन्सच्या विस्तारालाही मदत मिळण्याची शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे.

 

चीनने हे सेंटर समुद्रसपाटीपासून पाच हजार मीटर उंचीवर उभारले असून ही उंची लो ऑर्बिट सॅटेलाईटवर नजर ठेवण्यासाठी योग्य मानली जाते. या ट्रॅकिंग सेंटरची उभारणी २०१४ मध्येच करण्यात आली असून सर्वांनाच याची नुकतीच माहिती मिळाल्याचेही सांगण्यात येत आहे. या सेंटरला नगारी जलविद्युत केंद्रावरून थेट वीजपुरवठा करण्यात येत असून आवश्यकता भासल्यास सौरऊर्जेवरही हे सेंटर चालवले जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्टेशनच्या बेस स्ट्रक्चर्सवर आठ रेडॉम्स आणि दोन कोएक्सियल उपप्रणाली असलेली पॅराबॉलिक अँटिना आहेत. यापैकी चार रेडॉम्समध्ये विविध आकारांचे पॅबॉलिक अँटिना असू शकतात. तसेच मुख्य इमारतीच्या शीर्षस्थानी असलेल्या दोन रॅडमोसमध्ये लेसर किंवा रडार ट्रॅकिंग साधने असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या स्पेस ट्रॅकिंग स्टेशनजवळील इलेक्ट्रो-ऑप्टिकल यंत्रणेचे अंशांकन आणि बोर्ड उपग्रहांवर रडार तसेच जीपीएस उपग्रहांचे अंशांकन करण्यासाठी एक यंत्रणा वापरण्यात आली आहे. यासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या ईओ कॅमेर्‍यांची मदत घेण्यात येत असल्याचीही माहिती समोर आली आहे. अशा प्रकारचे सेंटर यापूर्वी इराणकडून उभारण्यात आले होते. दरम्यान, आता चीन या सेंटरचा कशाप्रकारे उपयोग करतो आणि भारत त्याला कसे उत्तर देतो, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/