‘लागीर झालं जी’ च्या कलाकारांच्या नावाने फसवणूक
महा एमटीबी   02-Jan-2019

 


 
 
 
सांगली : सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी जमविण्यासाठी सेलिब्रिटींना आणण्याचा प्रयत्न आजकाल अनेक आयोजकांकडून केला जातो. त्यासाठी पाहिजे तेवढी रक्कम मोजण्याची आयोजकांची तयारी असते. झी मराठी वरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील कलाकारांना कार्यक्रमाला आणतो. असे अमिष दाखवून सांगलीमध्ये एका आयोजकाची फसवणूक करण्यात आली. कलाकारांच्या नावाने कार्यक्रमाच्या आयोजकाकडून ५० हजार रुपये उकळण्यात आले. फसवणूकीची ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
 

सत्यापा मोरे असे या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सांगलीमधील वाळवा तालुक्यातील माळभागाच्या शिवाजी व्यायाम मंडळाने कार्यक्रम आयोजित केला होता. शहीद जवानांच्या स्मरणार्थ देशभक्तीपर हिंदी गाण्यांचा हा कार्यक्रम होता. ‘जागो हिंदुस्तानी’ असे या कार्यक्रमाचे नाव होते. श्रीकांत गणगटे हे या कार्यक्रमाचे आयोजक होते. ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील कलाकारांना आणण्याचे अमिष दाखवून सत्यापा मोरे याने श्रीकांत गणगटे यांना ५० हजारांचा गंडा घातला. मालिकेतील कलाकारांना कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण दाखवून कार्यक्रम पत्रिकादेखील छापण्यात आली.

 

 
 

सोशल मीडियावर ही कार्यक्रमपत्रिका शेअर करण्यात आली. १००, २०० आणि ३०० असे कार्यक्रमाच्या तिकीटीचे दर ठेवण्यात आले होते. या प्रकरणी अभिनेता दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी लागीर झालं जी या मालिकेतील सर्व कलाकारांच्या वतीने शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. आयोजकांनी चूक झाल्याचे मान्य केले. तेव्हा फसवणूक झाल्याचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तक्रार मागे घेण्यात आली.

 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/