चहलची जादू ; ऑस्ट्रेलिया सर्वबाद २३०
महा एमटीबी   18-Jan-2019मेलबर्न - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना मेलबर्न येथे खेळवण्यात आला. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार कोहलीचा निर्णय सार्थ ठरवताना गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २३० धावांवर सर्वबाद केले आहे. युझवेंद्र चहलने चांगली गोलंदाजी करताना ४२ धावा देताना ६ गडी बाद केले. मालिका विजयासाठी भारताला २३१ धावांची गरज आहे.

 

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली. अॅलेक्स कॅरी केवळ ५ धावा काढून भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार फिंचही मालिकेत सलग तिसऱ्या वेळेस भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर बाद झाला. भुवनेश्वरने दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर आलेल्या उस्मान ख्वाजाने ३४ धावा, तर शॉन मार्शने ३९ धावा केल्या. या दोघांनाही २४ व्या षटकांत चहलने बाद करत ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्के दिले. ऑस्ट्रेलियाकडून पीटर हॅन्डसकोम्बने चांगली फलंदाजी करताना महत्वपूर्ण ५८ धावांची खेळी करताना ऑस्ट्रेलियाला २०० धावांची मजल गाठून दिली. हॅन्डसकोम्ब चहलच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज जास्त संघर्ष करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा डाव २३० धावांवर संपुष्टात आला.

 

भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने नांगी टाकली. भारताकडून युझवेंद्र चहलने एकदिवसीय कारकिर्दीतली सर्वात चांगली गोलंदाजी करताना १० षटकांत ४२ धावा देताना ६ गडी बाद केले. त्याला भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने २-२ गडी बाद करत चांगली साथ दिली. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. मोहम्मद सिराजऐवजी विजय शंकरला संघात स्थान देण्यात आले आहे. तर रायडूच्या जागी केदार जाधवला आणि कुलदीप यादवच्या जागी युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. कुलदीप यादवला यावेळी विश्रांती देण्यात आली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/