बनशंकरी शाकंभरी देवी
महा एमटीबी   16-Jan-2019

 

 
 
 
पौष महिन्यातील शुद्ध अष्टमीला ‘शाकंभरी’ देवीचं नवरात्र प्रारंभ होतं. पौषातली शुद्ध अष्टमी पूर्णपणाने शुद्ध असणारी श्रीशाकंभरी देवीची स्थापना केली जाते. शुद्ध भावाने देवीचे भक्त तिला हृदयरूपी सिंहासनावर बसवतात. या देवाचं दुसरं नाव म्हणजे बनशंकरी. वनात राहणारी ती बनशंकरी. कर्नाटक राज्यात बागलकोट जिल्ह्यात बदामी येथे या देवीचं मुख्य मंदिर आहे. तिलकारण्यात हे जागृत स्थान असल्यामुळे तिला ‘बनशंकरी,’ ‘वनशंकरी’ असं म्हणतात. हे स्थान प्राचीन असून पावन आहे. श्रीशाकंभरी देवीची सिंहावर आरूढ झालेली मूर्ती मोठी विलोभनीय आहे. तिचं तेज चित्ताचा ठाव घेणारं आहे. झाडंझुडपं, वृक्षवेलींची दाटी असलेल्या डोंगरावर देवी वास्तव्य करते. चालुक्यांची कुलदेवता श्रीशाकंभरी. चालुक्यांनी सातव्या शतकामध्ये आपल्या कुलदेवतेचं मंदिर बांधलं. त्यामुळे आजच्या काळातील भक्तांच्या दर्शनाची सोय झाली. पुढे हे मंदिर जीर्ण झालं. परशुराम आगळे या मराठा कुलीन शाकंभरी भक्ताने या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम करून देवी भक्तांची सोय केली.
 

शाकंभरी देवीच्या बदामी येथील स्थानी हजारो भक्त दूरवरून मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. या मंदिराच्या भागात तीन पवित्र तीर्थ आहेत. अगस्तीतीर्थ, हरिद्रातीर्थ, तैलतीर्थ. या तीर्थांचा महिमा मोठा आहे. त्याचप्रमाणे एक मंदिरदेखील आहे. ते म्हणजे चंडभैरव मंदिर होय. हा सगळा परिसर भारावलेला आहे. ही वनशंकरी म्हणजेच श्रीशाकंभरी देवी अष्टभुजा आहे. तिच्या आठ हातांत विविध आयुधं आहेत. ती सिंहाच्या आसनावर बसलेली असून सिंहाच्या पायाखाली दोन हत्ती आहेत. सिंहाचं वाहन असणारी देवी दुष्ट दैत्यांच्या संहारासाठी आयुधांचा वापर करते. प्रत्येक युगात दानव, दैत्य हे असतातच. त्यांचं बाह्यरूप वेगवेगळं असलं तरी अंतरंग क्रूर, कपटीच असतं. सज्जनांना त्रस्त करून त्राही भगवान करणाऱ्या दानवांना नष्ट करण्यासाठी देवी सदैव तप्तर असते. आपल्या सात्विक भक्तांची ती काळजी घेते.

 

मदोन्मत्त झालेल्यांना आपल्या शक्तीने मान वर करू देत नाही. अत्यंत शक्तिमान, सामर्थ्यवान असलेल्या शाकंभरी देवीच्या उपासनेने, पूजनाने भक्त निर्भय होतात. अधर्माचा नाश आणि धर्माचं रक्षण करणाऱ्या देवीचं पौष मासातील नवरात्र म्हणजे पूजनाचा पर्वकाळ. या दिवसांत देवीची अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांना ती शक्तीसंपन्न करते. कलियुगात ठामपणे जगण्यास बळ देते. जेव्हा दैत्यांच्या दुष्टपणाने उच्चांक गाठला, सर्वत्र दुष्काळ पडला, पृथ्वीवरील समस्त जीवांना तग धरणं अशक्य झालं, तेव्हा अशा संकटसमयी भक्तांनी तिची भक्ती आरंभली. देवी भक्तांच्या भक्तीने भारावली आणि प्रसन्न झाली. तिने सृष्टीवर जलवर्षाव केला. अवघी अवनी सुजलाम्-सुफलाम् झाली. सृष्टी सुजलाम्-सुफलाम् झाल्यामुळे तिला ‘शाकंभरी’ नाव प्राप्त झालं. शाकंभरी देवीने नाना प्रकारच्या भाज्या, फळं, मुळं निर्माण करून सकल जीवांचं संरक्षण आणि नंतर संवर्धन केलं म्हणून नवरात्रीमध्ये देवीला अनेक भाज्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवीने दिलेलं देवीला अर्पण करून कृतज्ञ भावाने भजलं जातं.

 

 
 

शाकंभरी देवी समृद्धीची देवता, भक्तांच्या संरक्षणार्थ उभी ठाकलेली आहे. सकल जीवांचं भरणपोषण करणारी अशी देवी आहे. भक्तांचं कल्याण करणारी आहे. तिला अनन्यभावाने शरण जाणाऱ्यांचं ती मंगल करते. तिच्याभोवती एक अत्यंत तेजस्वी वलय असतं. जो श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवीची उपासना करतो, त्याच्या देहाभोवती संरक्षक कवच निर्माण होतं. कलियुगात देवीची भक्ती करणाऱ्या भक्तांचं कलिपासून ती रक्षण करते. शांतता प्रदान करणाऱ्या शाकंभरीचं नवरात्र म्हणजे अशांतता, अतृप्ती यांची समाप्ती करण्याचा शुभ, मंगल काळ होय. असामाधान, अस्वस्थता यांना कायमचं दूर करण्याचा काळ.

 

शाकंभरी देवी म्हटलं की, विविध भाज्यांचं स्मरण होतं. हा नवरात्र काळ, ऋतू छान असतो. थंडीची शाल लपेटलेली वसुंधरा लोभसवाणी दिसते. शेतामध्ये ऊस, बोरं, हरभरा बहरलेला असतो. सुगीचे दिवस असतात. सर्वत्र संपन्नता असते. फळझाडं, फुलझाडं आणि शेतं फळा-फुलांनी, पिकांनी भरलेली असतात. निसर्ग प्रसन्नतेने फुललेला असतो. तृष्णा संपून तृप्तीचा अनुभव देणारा निसर्ग व निसर्गाच्या माध्यमातून भक्तापर्यंत पोहोचविणारी शाकंभरी देवी. सगळीकडे प्रसन्नतेचा दरवळ धूपासमवेत दरवळत असतो. ज्या घराण्याची कुलदेवता शाकंभरी देवी असते, त्यांच्याकडे या आधी शक्तीचा जागर नऊ दिवस चालू असतो. त्रिकाल पूजा, आरती, महाप्रसाद, पारायणं, भजनं, स्तोत्राचे पाठ, उपासना, नामसंकीर्तन अशा नऊ प्रकारांनी भक्ती केली जाते. भक्त मोठ्या विनम्र भावाने मातेच्या चरणी नतमस्तक होतात. मातेला बालकभाव मनापासून भावतो.

 

आपल्या बालकांना ती मोठ्या प्रेमाने, मायेने जवळ घेते. आपल्या अंगावर घेऊन खेळवते. त्यांना अमृतपान देऊन तोषवते, पुष्ट करते. भक्त मातेच्या वात्सल्यात न्हाऊन निघतात. तिचा आशीर्वादाचा अभयंकर मस्तकावर असल्यावर भय, चिंता दूर होतात. कळिकाळाचं भय संपून जातं. शक्तिरुपिणी माता सदैव संतोष पावते. मग काळजीची काजळी जीवनज्योतीवर धरण्याचं कारणच उरत नाही. जगन्माता, विश्वमाता शाकंभरीच्या रूपात प्रत्येक युगात आपल्या निरागस बालकांचं भरण, पोषण आणि रक्षण करण्यास सदैव तत्पर असते. अशा या शाकंभरी मातेची उपासना करणारे भक्त उद्धरून जाणार, यात शंकाच नाही. तिच्या चरणावर जीवनसर्वस्व अर्पण केलं की, अहंकाराचं वर्चस्व सहजपणे संपून जातं. एकदा वज्राप्रमाणे असणारा अहंकार संपला की, द्वैतभाव देवीमध्येच विरघळतो. उरतो तो अलौकिक असा अक्षय आनंद.

 
 - कौमुदी गोडबोले
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/