नागराज यांच्या झुंडमध्ये झळकणार आर्ची-परश्या!
महा एमटीबी   15-Jan-2019

 

 
 
 
 
नागपूर : नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या सिनेमातून रातोरात स्टार झालेले आर्ची आणि परश्या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या आगामी सिनेमातून रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर झळकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा सिनेमा चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाच्या चित्रिकरणासाठी अमिताभ नागपूरमध्ये वास्तव्यास राहिले होते. ‘झुंड’चे चित्रिकरण पूर्ण झाल्यावर नागपूरकरांचा निरोप घेताना बिग बी हळवे झाले. त्यांच्या या भावना त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या. अमिताभ आणि नागराज यांचे एकत्रित काम पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
 

रिंकू आणि आकाश या सिनेमात दिसणार असले तरी त्यांचा एकत्र सीन नसल्याची माहिती मिळाली आहे. झोपडपट्टीतील तरुणांना फुटबॉलचे प्रशिक्षण देणाऱ्या विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकरली आहे. रिंकू आणि आकाश हे संस्थेतील फुटबॉलपटूंच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसतील. झुंड या सिनेमासाठी रिकुं आणि आकाश यांनी नागपूर मध्ये एक आठवडा चित्रिकरण केले. अशी माहिती मिळाली आहे. ‘सैराट’ या सिनेमानंतर अभिनेता आकाश ठोसर हा महेश मांजरेकर यांच्या ‘एफयू : फ्रेंडशीप अनलिमिटेड’ या सिनेमात दिसला होता. तसेच ‘लस्ट स्टोरिज’ या वेब सीरीजमध्येही त्याने काम केले होते. अभिनेत्री रिंकु राजगुरुने ‘सैराट’च्या तेलुगू रिमेकमध्ये काम केले होते. रिंकुचा ‘कागर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/