पाण्यावर उतरणाऱ्या विमानांचा उडान योजनेत सामावेश होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2019
Total Views |
 
 

मुंबई : पहिल्या जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेचे उद्‌घाटन मुंबईत नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. या परिषदेच्या जगभरातील सुमारे ८६ देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रभू म्हणाले की, विमान सेवा ही खूप जटिल सेवा आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी एकत्र येऊन विविध मुद्यांवर चर्चा करणे आवश्यक आहे. भारताचा हवाई प्रवास पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञान, संसाधने आणि भागीदारी गरजेची आहे असे ते म्हणाले.

 

जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे वार्षिक किंवा द्वैवार्षिक आयोजन करण्याची भारताची तयारी आहे, अशी माहिती सुरेश प्रभू यांनी दिली. विविध समस्या चर्चेद्वारे सोडवण्यासाठी शिखर परिषदेचे नियमित आयोजन व्हायला हवे. आज कृत्रिम बुद्धीमत्ता आणि बिग डेटासारखे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हवाई वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आपण त्याचा पुरेपूर लाभ उठवायला हवा असे आवाहन प्रभू यांनी केले. आपल्या विमान सेवा पद्धती पृथ्वीला अनुकूल असतील याकडे आपण लक्ष द्यायला हवे. आपले अवकाश कायम प्रदूषणरहित राहायला हवे. ड्रोन धोरण प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारतात अनेक ड्रोन्सची निर्मिती व्हावी अशी आमची इच्छा आहे. तसेच विमान निर्मितीसाठी देखील लवकरच एक रुपरेषा जारी केली जाईल असे ते म्हणाले. उडानअंतर्गत पाण्यावर उतरणाऱ्या विमानांचा समावेश केला जाईल,यामुळे परवडणाऱ्या दरांना चालना मिळेल. संपूर्ण हवाई वाहतूक क्षेत्राचे व्यावसायिकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

 

सुरक्षेशी संबंधित निकषांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. राष्ट्रीय लॉजिस्टीक्स धोरण लवकरच जाहीर केले जाणार असून देशात अनेक लॉजिस्टीक्स केंद्र निर्माण केली जातील असे ते म्हणाले. यावेळी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले की भारतात प्रति किलोमीटर दरानुसार ऑटो रिक्षातून प्रवास करण्यापेक्षा विमान प्रवास अधिक किफायतशीर आहे. आम्ही ऑटो रिक्षेकडून एअर रिक्षेकडे जाऊ इच्छितो. केवळ भारतासाठीच नव्हे तर जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रासाठी ही शिखर परिषद महत्वपूर्ण ठरणार आहे. गेल्या चार वर्षात भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील वाढ लक्षणीय आहे. किफायतशीर दरात विमान सेवा सुरू केल्यामुळे भारत हवाई क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करेल असे ते म्हणाले. नवी मुंबईतील विमानतळ २०२० पर्यंत सुरू होईल. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात १ टक्के वाढ करण्याची त्यात क्षमता आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उडान योजनेमुळे विमान प्रवाशांची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हवाई तंत्रज्ञानावरील प्रदर्शनाचे उद्‌घाटनही करण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@