रंगभूमीवर लवकरच अवतरणार ‘हे’ ऐतिहासिक नाटक
महा एमटीबी   15-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ यांच्या शौर्याची गाथा सांगणारे ‘अजिंक्य योद्धा’ हे ऐतिहासिक नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. अभिनेता गश्मीर महाजनी हा या नाटकात बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारत आहे. संजय पांडे यांच्या संकल्पनेतून हे नाटक साकारण्यात आले आहे. पंजाब टॉकिजने या ऐतिहासिक नाटकाची निर्मिती केली आहे.
 

दिग्दर्शक वरुणा मदनलाल राणा व लेखक प्रताप गंगावणे हे दोघे गेली दोन वर्षे मिळून या नाटकाच्या संहितेवर काम करत होते. ‘अजिंक्य योद्धा’ या नाटकासाठी भव्य रंगमंच उभारण्यात येणार आहे. या रंगमंचाची लांबी,रुंदी १०० फूट इतकी भव्यदिव्य असणार आहे. या ऐतिहासिक नाटकातील दृष्यांना पूरक असे नेपथ्य देण्यात आले आहे. अजिंक्य योद्धा या ऐतिहासिक नाटकाच्या नेपथ्याचे कलादिग्दर्शन आबीद शेख यांनी केले आहे. घोड्यांचा वापर या नाटकामध्ये करण्यात येणार आहे. नाटकातील व्यक्तिरेखांसाठी भरजरी पेहराव, दागदागिन्यांचा वापर करण्यात येणार आहे. नाटकातील मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांसह तब्बल १३० कलाकारांचा या ऐतिहासिक नाटकात समावेश असणार आहे.

 

श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास अजिंक्य योद्धा या नाटकाद्वारे उलगडला जाणार आहे. अभय सोडये यांनी हे नाटकाचे कार्यकारी निर्माते आणि सहाय्यक दिग्दर्शक आहेत. आदी रामचंद्र यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. वैशाली भैसने माडे, अवधूत गुप्ते, नंदेश उमप, आदर्श शिंदे, अवधुत गुप्ते आणि आदी रामचंद्र यांनी या दिग्गज गायकांनी नाटकातील गाणी गायली आहेत. या नाटकात संगीतासह काही नृत्याविष्कारांचाही समावेश असणार आहे. नरेंद्र पंडित यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. येत्या १८ आणि १९ जानेवारी रोजी या ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभ होणार आहे. अंधेरी येथील होली फॅमिली स्कूल पटांगणात सायंकाळी ७ वाजता हा शुभारंभ करण्यात येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/