स्पर्धा नव्हे; आत्मिक सुख महत्त्वाचे
महा एमटीबी   14-Jan-2019

 

 
 
 
 
स्वत:साठी आणि स्वत:पुरती स्पर्धा व अहमहमिका ही संदिग्ध संकल्पना आहे. तरी जीवनाचे मूलभूत तत्त्वही आहे, पण स्पर्धा ही आपल्या आयुष्याचा मूलभूत हिस्सा बनता उपयोगी नाही. माणसाचे आत्मिक सुख अधिक महत्त्वाचे.
 

जेवढा काळ मानवी आयुष्य अस्तित्वात आहे, तेवढा काळ माणसाची जगण्यासाठी अहमहमिकासुद्धा अस्तित्वात राहिली आहे. आपल्याला दुसऱ्या कोणापेक्षा काहीतरी चांगलं मिळायला हवं, याचा ध्यास माणसाला कायमच राहिला आहे. अगदी साध्यासाध्या गोष्टी जसे की, डाळ-तांदळाची प्रत असेल, एवढेच काय रोजच्या वापरातला साबण असेल, स्त्रिया चांगल्या दुकानाच्या शोधात असतात. अनेक वेळा वेळोवेळी होणाऱ्या परीक्षेत इतरांपेक्षा चांगले टक्के मिळावेत म्हणून मुलाचीच नव्हे तर त्याच्या पालकांची आणि शिक्षकांचीसुद्धा धडपड चालू असते. या गोष्टी अर्थात पुढेपुढे नोकरीधंदा, प्रमोशन, चांगल्या पगाराची वा स्टेटसची नोकरी याकडे वळतात. आमच्या दुकानात इतरांपेक्षा वस्तू कशा चांगल्या मिळतात, यापासून राजकीय पातळीवरसुद्धा दुसऱ्या पक्षांपेक्षा आपल्या पक्षाने चांगली कामगिरी कशी बजावली आहे, अशा विविध प्रकारे व विविध कार्यक्षेत्रांत आपण चढाओढीची प्रक्रिया पाहात असतो. अर्थात व्यावहारिक उत्पादनात जेव्हा जढाओढ होते, तेव्हा फायदा लोकांचाच होतो कारण, चांगली चांगली उत्पादने बाजारात उपलब्ध होतात. स्पर्धेमुळेच व्यक्तीमध्ये अनेकप्रकारे प्रगती होताना आपल्याला दिसून येते.

 

स्पर्धा ही व्यक्तीच्या बालपणापासूनच विकसित झालेली गोष्ट आहे. अगदी लहानपणीच व्यवहाराची भाषा न जाणणारं बाळ आईचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी, तिच्याजवळ जाण्यासाठी अनेक प्रकारचे आविर्भाव करत असतं. मग त्यासाठी ते रडू लागतं वा खिंकाळत राहतं, हटवादीपणा करत राहतं, पण येनकेनप्रकारे आईचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत राहतं. अर्थात पुढे बालपण सुटतं, तसे हे आविर्भावही सुटतात. मुलांकडून आजकाल अभ्यासात व व्यक्तिमत्त्व विकासात खूप मागणी केली जाते. त्यांच्यावर सगळ्या गोष्टीत उत्तमात उत्तम प्राविण्याची मागणी होत असते. आपल्या मुलाने इतरांपेक्षा सगळ्याच बाबतीत अग्रेसर व सरस असावं, असं पालकांना वाटतं. त्या अर्थाने स्पर्धा आयुष्यात अपरिहार्य आहे. जो सामर्थ्यवान आहे, तोच टिकू शकतो, ही खरेतर डार्विनच्या मूलतः उत्क्रांतीवादाची फिलॉसॉफी आहे. आज शैक्षणिक, खेळ वा नोकरी आणि प्रतिष्ठा या सगळ्यांमध्ये सरशी हाच पाया आहे, मग स्पर्धा चांगली की वाईट, हा प्रश्न उभा राहतो.

 

स्पर्धा तसे पाहिले तर विकसनशील अस्तित्वाची प्रेरणा आहे. ती माणसाच्या अस्तित्त्वाला दिशा व वेग देणारी आहे. स्पर्धा ही विद्यार्थ्यांसाठी, खेळाडूंसाठी, कलाकारांसाठी तसेच व्यावसायिकांसाठी आवश्यक असलेले प्रोत्साहन आहे. यामुळे व्यक्तीला उत्तम स्वप्न पाहायची सवय तर लागतेच, पण त्यासाठी कष्ट करून घाम गाळावा लागतो. हे कर्मयोगाचे तत्त्वपण समजायला लागते. चढाओढीशिवाय आयुष्य हे प्रगतीशिवायचे आयुष्य आहे. मग त्यात संथपणा आणि निष्क्रियता आलीच. त्यात आपण शिखरावर पोहोचायला पाहिजे, ही इच्छा नसते. डोळ्यासमोर आकाशाला गवसणी घालणारी ध्येयशिखरे नसतात. एखाद्या प्रयोगाला आहे त्या पातळीवरून वरच्या पातळीवर घेऊन जायची उर्मी नसते. चढाओढीत खरे तर माणसाला आपली ऊर्जा अधिक वाढविता येते. आपली सक्षमता वाढवता येते. स्पर्धेतून नूतन शोध लागतात. विधायकता जोपासली जाते. स्पर्धेच्या माध्यमातून काही सामान्यजनांची आंतरिक ताकद त्यांना असामान्य कर्तृत्त्वाकडे घेऊन जाते, पण दुर्दैवाने काही वेळा काही जणांची ऊर्जा व सक्षमता दोन्हीही गोष्टी स्पर्धेच्या रणांगणात धारातीर्थी पडतात. अशावेळी आयुष्य आपल्याला अन्यायकारक आहे, असे वाटू लागते. तसे पाहिले तर थोड्याफार प्रमाणात आयुष्य अप्रामाणिक व अन्यायकारक सगळ्यांसाठी असतंच. तथापि स्पर्धेचा वैयक्तिक प्रभाव प्रत्येकवेळी विधायक व सकारात्मक असेल, असे नाही. पहिली गोष्ट म्हणजे स्पर्धेत उतरायचे म्हणजे तुम्हाला एक प्रतिस्पर्धी असणे गरजेचे आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला स्वत:चे मूल्य आणि महत्त्व तुम्ही एकटेच असाल तर कळणार नाही, हे नक्कीच खरे नाही. स्पर्धेत माणूस दुसऱ्या कुणाच्या तुलनेतूनच आपले महत्त्व व योग्यतेचे परिणाम पडताळून पाहतो व आपले महत्त्व ठरवतो पण, प्रत्येक व्यक्ती खरेतर स्वत:ची अशी खास व्यक्तिमत्त्व, ऊर्जा व सक्षमता घेऊन आलेली असते. जगातल्या इतर गोष्टी अस्तित्वात असतानासुद्धा तिचे स्वतःचे असे विशेष मूल्य असते. स्पर्धेत हरविलेल्या लोकांना हे मूल्य स्वत:लाच ओळखता येत नाही, हे दुर्दैव आहे. दुसरे असेही आहे की, स्पर्धा माणसाच्या कृतीशीलतेमधला खरा आनंदच संपवून टाकते आणि त्यामुळे त्याची सर्जनशीलता कमी होते.

 

तुम्हाला दुसऱ्यांच्या तुलनेत नेहमीच स्वत:ला वरचढ ठरवायचे असेल व पहिलेच यायचे, हा विचार मनात असेल तर एखादी गोष्ट करताना मिळणारा प्रांजळ आनंद तुम्हाला मिळणार नाही, कारण तुमचे मन तुम्ही करणाऱ्या कृतीत रमण्याऐवजी त्याच्या पर्यवसनात गुंतून राहते. म्हणून तर विधायकतेला महत्त्व न देणाऱ्या स्पर्धेत स्वत:चा कर्मयोग सोडून द्यायचा की, आपल्या स्वत:च्या कर्तृत्त्वाचा आनंद घेत जीवन जगायचे, हे ज्याने त्याने स्वतःच ठरवायची फिलॉसोफी आहे. स्वत:साठी आणि स्वत:पुरती स्पर्धा व अहमहमिका ही संदिग्ध संकल्पना आहे. तरी जीवनाचे मूलभूत तत्त्वही आहे, पण स्पर्धा ही आपल्या आयुष्याचा मूलभूत हिस्सा बनता उपयोगी नाही. माणसाचे आत्मिक सुख अधिक महत्त्वाचे.

 
 - डॉ. शुभांगी पारकर
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/