‘ठाकरे’ सिनेमातील गाणे प्रदर्शित
महा एमटीबी   12-Jan-2019

 

 
 
 
 
 
 
मुंबई : ‘ठाकरे’ सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच पार पडला. ‘ठाकरे’ सिनेमातील गाणी यावेळी प्रदर्शित करण्यात आली. सिनेमाच्या म्युझिक लाँचला अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकी, अमृता राव, यांच्यासह या सिनेमाचे निर्माते आणि खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे आपल्या सहकुटुंबासोबत उपस्थित होते.
 

‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरेहे या सिनेमातील हिंदी गाणे यावेळी प्रदर्शित करण्यात आले. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच या गाण्याला युट्यूबवर लोकांची पसंती मिळत आहे. नकास अजीज याने हे गाणे गायले आहे. या गाण्याच्या मेकिंगविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मला थोडे भान ठेवावे लागते. पण मला ऐकविण्यात आलेल्या गाण्यावर मला ठेका धरावासा वाटला होता.

 
 
 

‘ठाकरे’ हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांपैकी ‘ठाकरे’ या हिंदी सिनेमाला सेन्सॉरने हिरवा कंदील दाखवला आहे. “थोडी आम्हीही धार लावली, पण हा सिनेमा सेन्सॉरच्या हातातून सुटला. उद्या ‘ठाकरे’ हा मराठी सिनेमा सेन्सॉरकडे जाणार आहे. हा सिनेमा आम्ही पक्षाचा प्रचार करण्यासाठी निर्माण केलेला नाही. अशी प्रतिक्रिया या सिनेमाचे निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली. ‘ठाकरे’ या मराठी सिनेमाला अभिनेता सचिन खेडेकर यांनी आवाज दिला आहे. अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकी याने या सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर मराठमोळी अभिनेत्री अमृता राव हिने मीनाताई ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. येत्या २५ जानेवारी रोजी ‘ठाकरे’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/