उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान्निबोधत..!
महा एमटीबी   12-Jan-2019

 

 
 
 
 
 
जगातील सर्व मानवांनो! उठा, जागे व्हा आणि ईश्वराने दिलेल्या वरांचा लाभ घ्या. कारण सत्य व पवित्र मार्ग हा सुरीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण असतो. श्रेष्ठ महापुरुष मात्र या अवघड मार्गावरून नेहमी चालतच असतात, असे कवीजन म्हणतात.
 

जीवन म्हणजे सृष्टीविधात्याकडून मानवास मिळालेले मोलाचे वरदान होय. या जीवनरूपी सुमनांचा दरवळणारा मधुर सुगंध हुंगत आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा जो हसतमुखाने स्वीकार करतो, तो नक्कीच यशस्वी ठरतो. याउलट जो जीवनाच्या कोणत्याही अंगाकडे नैराश्याने पाहतो, तो मात्र सदैव अपयशीच ठरतो... जगात त्यांच्याच कीर्तीचे पोवाडे गायिले जातात, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत क्रांतीचा इतिहास रचला. वैश्विक क्षितिजावर आजही अशा नरशार्दूलांची नावे झळकताना पाहिली की नवे स्फुरण चढते आणि आपणास जीवनाचा अर्थ हळूहळू कळू लागतो. अशा महापुरुषांकरिता शास्त्रांमध्ये इंद्र, कुी, क्रान्तदर्शी, साधु, दिव्यात्मा अशी असंख्य नावे आली आहेत. इंद्र म्हणजे महान आत्मा! विद्युत्शक्ती धारण करणारा असल्याने तो दिव्यात्मा ठरतो. जो की ऐश्वर्याचा स्वामी व अपराजित योद्धा मानला जातो. म्हणूनच तो स्वत:चा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करत ऋग्वेदात वर्णिल्याप्रमाणे हा आत्मा स्वत:विषयी उद्घोष करतो –

 

अहमिन्द्रो न पराजिग्य इद्धनं न मृत्यवेऽवतस्थे कदाचन।

 

म्हणजेच मी इंद्र, शक्तिसंपन्न व ऐश्वर्याने परिपूर्ण आहे. माझा पराजय कदापी होऊ शकत नाही. मी कधीही मृत्यूला भीत नाही! अशी ही दिव्य भावना ज्याच्या अंगी असते, तो निश्चितच इंद्रियांचा स्वामी व श्रेष्ठ आत्मा होय. हा प्रखर आत्मविश्वास बाळगणारे महापुरुष युगानुयुगे अजरामर ठरतात. काळ येतो आणि निघून जातो, पण त्या थोर यशवंतांची कीर्तिगाथा मात्र पिढ्यान्पिढ्या मानवसमूह गातच राहतो. कारण त्यांचे जीवन ‘कीर्ति:यस्य स जीवति।’ या उक्तीप्रमाणे किर्तीमान असते. कठोपनिषदामध्ये वर्णिलेल्या यम व नचिकेता या दोघांतील संवादातून थोर महापुरुष हे अतिशय कठोर मार्गाने वाटचाल करणारे असतात, याचे सुंदर वर्णन आढळते. मोठी माणसे सतत जागृत असतात. विश्रांती त्यांना ठाऊकच नसते. त्यातील खालील श्लोक मानवसमूहाकरिता अत्यंत मोलाचा व मार्गदर्शक स्वरूपाचा आहे –

 

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान्निबोधत

क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया

दुर्गं पथस्तत् कवयो वदन्ति।

 

म्हणजेच जगातील सर्व मानवांनो! उठा, जागे व्हा आणि ईश्वराने दिलेल्या वरांचा लाभ घ्या. कारण सत्य व पवित्र मार्ग हा सुरीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण असतो. श्रेष्ठ महापुरुष मात्र या अवघड मार्गावरून नेहमी चालतच असतात, असे कवीजन म्हणतात. असे हे कठिण जगणे मात्र सामान्य लोकांना नकोसे वाटते. अगदी सहज मार्गाने कष्ट न करता जगावेसे वाटते. पण याला ‘जीवन’ असे म्हणता येत नाही. वैदिक शास्त्रांमध्ये व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी तीन तत्त्वांचा अवलंब करण्याचा उपदेश मिळतो. अथर्ववेदात म्हटले आहे -

 

श्रमेण तपसा सृष्टा ब्रह्मणा

वित्त ऋते श्रिता॥

 

म्हणजेच परिश्रम, तपश्चर्या आणि सत्य मार्गाने धनार्जन या तीन तत्त्वांचा आश्रय घेतल्यासच मानवी जीवनाची तसेच कुटुंब व राष्ट्राची सर्वांगीण उन्नती होऊ शकते. अन्यथा कष्टाविना काहीच साध्य होत नाही. नीतिशतकात आचार्य भर्तृहरी म्हणतो –

 

उद्योगिनं पुरुषसिंह मुपैति लक्ष्मी:।

दैवं हि दैवमिति कापुरुषा: वदन्ति॥’

 

म्हणजेच उद्योगशील अशा पुरुषसिंहाला लक्ष्मी प्राप्त होत असते. दैवावर(भाग्यावर) विसंबून राहून ‘दैव देईल...’ असे म्हणणारे मात्र भ्याड लोक असतात. कारण झोपलेल्या सिंहाच्या मुखात उगीच हरिण येऊन प्रवेश करीत नसतो. म्हणूनच पुरुषार्थ व कठोर परिश्रम करण्याची गरज असतेऐतरेय ब्राह्मण ग्रंथाच्या तेहतिसाव्या अध्यायात अतिशय बोधप्रद कथाप्रसंग आलेला आहे. रोहित नावाचा बटु विद्यार्थी आपल्या आचार्याच्या सेवेत उपस्थित राहतो. त्यावेळी तो आपल्या गुरुंकडे जीवनाच्या यशस्वीतेकरिता उपदेश करण्याची विनंती करतो. तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यास ‘चरैवेति... चरैवेति!’ म्हणजेच चालत रहा, चालत रहा... असा उपदेश केला. त्याप्रसंगी आपल्या शिष्यास ते उपदेश देताना म्हणतात –

 

या जगात परिश्रमी व गतीशील माणसाचेच कल्याण होते. जो बसतो, तो पापी ठरतो. परमेश्वरदेखील गतिशील माणसाचाच मित्र बनतो. म्हणून चालत रहा, चालत रहा...!”

 

ज्याचे पाय गतिशील असतात, त्याचा आत्मा विविध चांगल्या फळांना प्राप्त करतो. परिश्रमाने मार्गक्रमण करणाऱ्याची सर्व पापे नाहीशी होतात. म्हणून चालत रहा, चालत रहा...!”

 

बसणाऱ्याचे भाग्यही बसते. उभे राहणाराचे भाग्य उभे राहते. जो पतनशील आहे, त्याचे भाग्य झोपते आणि जो गतिमान आहे, त्याचे भाग्यही गती करते. याकरिता चालत रहा, चालत रहा...!”

 

जो झोपला आहे, त्याच्यासाठी ते कलियुग आहे. जो झोपेचा त्याग करीत आहे, त्याकरिता ते द्वापार होय. जो उभा राहत आहे, त्याकरिता त्रेतायुग होय आणि जो क्रियाशील आहे, त्याकरिता सत्ययुग होय. याकरिता चालत रहा, चालत रहा...!” (या श्लोकार्थात आचार्यांनी चार युगांची व्याख्या किती सार्थकपणे मांडली आहे.)

 

वरील प्रसंगातून आपणास हेच निदर्शनास येते की, प्रत्येकाने विश्रांती न घेता सतत परिश्रम केले पाहिजे. ‘थांबला तो संपला’ या उक्तीनुसार जो प्रगतीशून्य असतो, त्याचे जीवन व्यर्थ ठरते. कारण आळशी व कर्महीन माणसांकरिता भर्तृहरीने म्हटले आहे - ज्याच्याकडे विद्या, तप, दान, ज्ञान, शील, सद्गुण, धार्मिकता या सात गोष्टी नसतील, तो या धरणीमातेला केवळ भारस्वरूप आहे. ‘मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति!’ माणसे असूनही पशूंप्रमाणे व्यर्थ जीवन जगतात. आजकाल सर्वांनाच जीवनाचा अथांग प्रवास नकोसा वाटतोय. या जीवनाच्या खडतर वाटेवर चालणे कुणालाही रूचत नाही. सर्वकाही सहज, सोपे, सरळ आणि सुखपुर्वक मिळत राहावे, अशी प्रत्येकाची मानसिकता होत चालली आहे. यामुळे कष्ट व मेहनत करण्याची वृत्ती नाहीशी होत आहे. परिणामी माणूस शाश्वत सुखापासून दुरावत चालला आहे... यामुळे पदरी येते ती निराशा आणि जीवनाविषयीचा प्रतिकुल विचार! विद्यार्थी असोत की प्रौढ पुरुष, शेती करणारा असो की नोकरदार.... या सर्वांना अगदी सहजपणे कष्ट न करता धन मिळवावे, असे वाटते. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाविषयी विचारले, तरी तो निरुत्साही दिसतो. त्याकडून मिळालेले निराशादायी उत्तर जाणून एक सूक्ती मानसपटलावरून उमटून गेली -

 

पठितव्यं तदपि मर्तव्यं,

न पठितव्यं तदपि मर्तव्यम्!

 

म्हणजेच शिकलो तरी मरावेच लागणार आणि नाही शिकलो तरी ही मरावे लागणार, मग उगीच व्यर्थच दात वाजवण्यात काय आहे? असा हा आजच्या नवतरुणांचा जीवनाकडे पाहण्याचा नैराश्यवादी दृष्टीकोन! जीवनाप्रती उदासीनता आज मोठ्या प्रमाणात वाढतेय. प्रत्येकाला सुखा-समाधानाने व आनंदाने जगण्याची इच्छा असते... पण ते सुख व आनंद मिळविण्याचा खडतर व अवघड असा मार्ग नकोसा वाटतो... सर्व काही मिळावे ते कष्ट व परिश्रम न करता अगदी ‘दे रे हरि खाटल्यावरी’ अशी आळशी प्रवृत्ती आज मोठ्या प्रमाणावर बळावतेय... अगदी सोप्या मार्गाने पैसाअडका कसा उपलब्ध होईल. आणि लवकरात धनलाभ कसा होईल... असे प्रत्येकाला वाटते... अशा या जीवनी लक्ष्मी कशी काय वास करेल? कारण तिच्याविषयी तर म्हटले आहे - ‘श्रमे श्री: प्रतिष्ठिता।’ धनवैभवाची प्राप्ती श्रमाविना नाही! जर काय ती श्रमाखेरीज अन्य कोण्या मार्गाने येत असेल तर ती चिरकाल टिकणार तरी कशी? कारण तिच्या मुळाशी कष्ट व श्रम असतात. नेमके आज हेच तर लक्षात येत नाही. एकविसाव्या शतकात वावरताना मानव तंत्रज्ञानाद्वारे विकासाकडे झोप घेतोय, पण जगण्याचे तंत्र पूर्णपणे विसरलाय! यांत्रिकीकरण एवढे वाढलेय की, धडधडणाऱ्या यंत्राप्रमाणे माणसाची ही धडधड वाढली आहे. अर्थप्रधान युगात आम्ही जगण्याचा खरा अर्थच विसरून गेलो आहोत... इतके व्यवहारचतुर झालो की, नैतिक व सामाजिक व्यवहाराचीच फारकत घेतली. विज्ञानाने जगाला जवळ तर केले, पण आत्मज्ञानाचा व समाजहिताचा विसर पडला...! जगण्याच्या बाबतीत मानव इतका उदास झाला आहे की थोड्या-थोड्या बाबतीत लगेच आत्महत्या....! अलीकडील काळात वाढत चाललेले आत्महत्यांचे सत्र चिंतेपेक्षा चिंतनाचा विषय बनला आहे... उगीच जीवन संपविणे म्हणजे परमेश्वरीय वरदानाचा अपमान नव्हे काय...? आत्महत्या शेती करणाऱ्यांच्या असोत की युवकांच्या अथवा महिला व इतरांच्या! या सर्वांच्या पाठीमागे कारणे कितीही भयावह असली तरी त्याचे मूळ कारण आहे ‘विचारशक्तीचा अभाव!’ उदासीनता ही आंतरिक असते... संकटे बाहेरची असतात... मनात येईल तसे वागणे म्हणजे आत्म्याची शक्ती डावलणे होय. कारण आत्मा हा अजरामर असून हे एक चेतन तत्त्व आहे, तर मन हे जडतत्त्व होय. मानसिक शक्तीपेक्षा आत्मिक शक्ती बलवती असते. आत्मबलिष्ट लोक हे जीवनाकडे उत्साहाने पाहतात. कधीही निराश होत नाहीत. संकटे व दु:खे कितीही आली तरी त्यांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा विशाल असतो.

 

ईशोपनिषदात जीवनाकडे उदात्त भावनेने पाहण्याचा उपदेश मिळतो. नैराश्याने ग्रासलेल्या मानवास आत्महत्येपासून परावृत्त होण्याचा पुढील संदेश किती मोलाचा आहे -

 

असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसावृत्ता:।

ताँस्ते प्रेत्यापि गच्छन्ति ये के च आत्महनो जना:॥

 

म्हणजेच आत्महत्या करून आपले अमूल्य जीवन संपविणारे जे लोक आहेत. ते मृत्युनंतरसुद्धा वाईट योनीलाच प्राप्त होतात. पुढील जन्मात त्यांचा घनघोर अशा अज्ञानरूपी अंधःकारात प्रवेश होतो. म्हणून आत्महत्या केली तरी दु:खापासून सुटका नाहीच. पुन्हा... ‘पुनरपि जननं पुनरपि मरणम्।’ अशी ही श्रृंखला चालूच राहिली तर मग काय उपयोग?

 

याचकरिता योगेश्वर श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनाला आत्मकल्याणाचाच उपदेश दिला होता. वेदातदेखील आत्मशक्तीने परिपूर्ण होऊनच जीवनाचे गाणे गात राहण्याचा संकेत मिळतो. अथर्ववेदाचा मंत्र सांगतो -

 

आयुष्कृताम् आयुषा जीव,

आयुष्यमान जीव मा मृथा

 

अर्थातच हे माणसा! ज्यांनी यशस्वीपणे जीवन जगत उत्तम आयुष्याचा मूलमंत्र दिला आहे, अशा महान थोर पुरुषांच्या जीवनाचा आदर्श समोर ठेवून आयुष्यमान हो..! उगीच मृत्युला व्यर्थ जवळ करू नकोस. आज मानवाला नेमका याचाच विसर पडलेला आहे. आत्मविस्मृतीचा भयंकर रोग जडल्याने सर्वत्र दु:खाचे व नैराश्याचे वातावरण दिसत आहे. काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी षड्रिपुंना बळी पडून मानव स्वत:च्या जगण्याचा अर्थ हरवून गेला आहे. खरे तर मनुष्य म्हणजेच ‘मननशीलता’ होय. पवित्र बुद्धीद्वारे विवेक आणि ज्ञानपूर्वक कर्म करीत जगताना आपले जगणे इतरांसाठी प्रेरणात्मक ठरले पाहिजे, हा जीवनामागचा उद्देश असावा. धन कमावताना त्याच्या मुळाशी धर्म म्हणजे नीतितत्त्वे असतात, याची जाणीव ठेवली तर कमावलेल्या धनातून खऱ्या अर्थाने सुख-समृद्धी व समाधान मिळते. धन हे जगण्याचे साधन आहे. ते साध्य कदापी नव्हे... आम्ही मात्र या बाह्य साधनामध्ये गुंतून पडलो आहोत की, हा गुंता सुटता सुटत नाही आणि नाना प्रकारच्या प्रश्नांचे ओझे खांद्यावर घेऊन ही न संपणारी यात्रा पार करण्याच्या मार्गावर आहोत. जीवन हे सुख-शांतीपूर्वक होण्यासाठी सद्विचारांची जितकी गरज असते, तितकीच पुरुषार्थ आणि नैतिक तत्त्वांची असते. वैदिक शास्त्रातील हा दिव्य संदेश हृदयी बाळगून आपले जीवन यशस्वी करूया आणि आयुष्याचे सोने बनवू या...!

 
 

-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/