पुरोगामी जादुटोणा
महा एमटीबी   12-Jan-2019



ज्या वर्मांच्या नेमणूकीला याच खरगेंनी जानेवारी २०१७ मध्ये कडाडून विरोध केला होता, तेच खरगे आता वर्मांच्या समर्थनाला पुढे सरसावले. न्या. सिक्री व पंतप्रधान मोदी या दोघांनी वर्मांना हटवण्याच्या बाजूने कौल देताच खरगे विरोधाला उभे ठाकले. आपणच दीड वर्षापुर्वी वर्मांच्या पात्रता व कुवतीवर शंका घेऊन त्यांच्या नेमणूकीला विरोध केल्याचेही स्मरण खरगेंना राहिले नाही. ती नेमणूक रद्द करण्यासाठी न्यायालयात धावलेले प्रशांत भूषण यांना आपली याचिका लक्षात राहिली नाही. हे दोघे दिग्गज एका सेकंदात वर्मांच्या समर्थनाला व वकिलीसाठी धावत येऊन उभे राहिले. याला म्हणतात पौराणिक चमत्कार. कारण वर्मांचा चेहरा बदललेला नाही की १८ महिन्यात त्यांची कुवत बदललेली नाही. मग खरगे-भुषणांना झाले काय? दैवी चमत्कार! नरेंद्र मोदींचा पदस्पर्श आणखी काय?


राहुल गांधी यांना बोफोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफेलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी बहुतेक विरोधी पक्षांनाही ओढून घेतलेले आहे. तेही स्वाभाविक आहे. कारण नरेंद्र मोदी यांच्यावर अन्य काही आरोप करता येत नसतील, तर चिखलफेक करण्यालाही पर्याय नसतो ना? पण ज्या पद्धतीने हा पोरखेळ रंगत चालला आहे, त्याकडे बघता पुराणकथा किती सत्यकथा आहेत, त्याचीच प्रचिती येऊ लागली आहे. रामायणातली एक अशीच कथा आहे, ती अहिल्येच्या उद्धाराची. कुठल्या देव किंवा देवीच्या शापाने अहिल्या शीळा होऊन पडलेली असते. आपल्याला शापातून मुक्ती मिळावी म्हणून अहिल्येने म्हणे उ:शाप मागितला होता. शाप देणाऱ्या देवाने तिच्या दगड होऊन पडलेल्या शिळेला अवतार पुरूष श्रीरामाचा पदस्पर्श झाला तरच पुन्हा अहिल्या मानवीरूप धारण करू शकते, अशी ती कथा आहे. आजच्या विज्ञानयुगात तिला कोणीही भाकडकथाच म्हणणार. कारण त्याचा कोणी वैज्ञानिक पुरावा देऊ शकत नाही. पण डोळसपणे बघितले तर त्याचे पुरावे उपलब्ध असल्याचे दिसून येते. सध्या गाजत असलेल्या राहुलकृत राफेल कथापुराणात वर्मा नावाच्या शिळेचा असाच उद्धार झालेला आहे. पुरोगामी दैवतांनी शापवाणी उच्चारल्याने शिळा होऊन पडलेल्या सीबीआय संचालक आलोककुमार वर्मा यांचा कालपरवा नरेंद्र मोदींचा पदस्पर्श होताच उद्धार होऊन गेला आहे. पण सगळी माध्यमे व विश्लेषक हे विज्ञानवादी पुरोगामी असल्याने वर्मा हे शिळा होऊन पडलेले होते, ही पार्श्वभूमी कथन करीत नाहीत. म्हणून मग या नवोदित अहिल्येचा उद्धार कसा झाला, त्याची चमत्कारीक पुराणकथा आपल्याला ऐकायला मिळत नाही. ती सविस्तर सांगणे भाग आहे. त्यांना शाप कोणी दिला व त्यांची शिळा कशाला होऊन पडली होती. मोदींचा पदस्पर्श त्यांना कसा झाला?

 

२०१७ सालातही या देशात भाजपचेच सरकार होते आणि त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते. अशा पंतप्रधानाला सरन्यायाधीश व विरोधी नेत्यांशी सल्लामसलत करून सीबीआयचा प्रमुख संचालक नेमता येत असतो. नरेंद्र मोदी यांनी विरोधी नेते काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याशी सल्लामसलत करून आलोक वर्मा यांना त्या पदावर नेमले. थोडक्यात मोदींनी वर्मांच्या गळ्यात अधिकारपदाची माळ घातली. तर त्याला जोरदार आक्षेप घेत खरगे यांनी कडाडून विरोध केला होता. पण पंतप्रधान व सरन्यायाधीश यांच्या बहूमताने वर्मा यांची नेमणूक झाली आणि पुढले काम सुरू झाले. खरगे हे अर्थातच काँग्रेसचे नेते, पुरोगामी आणि राहुल-सोनियांचे आश्रित असल्याने त्यांना देवाचा दर्जा आपोआपच प्राप्त होत असतो. त्यांनी तात्काळ आलोक वर्मांना शिळा होण्याचा शाप देऊन टाकला आणि त्या शापवाणीची अंमलबजावणी करण्यासाठी देवदुतासारखे नामांकित वकील प्रशांत भूषण धावून आले. त्यांनी त्या नेमणूकीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आणि वर्मांना हाकलून देण्यासाठी जणू नवसच केला. ही जानेवारी २०१७ मधली गोष्ट आहे. पण पुरोगामी देवांची शापवाणी इतकी प्रखर असते, की ज्या देवाने शाप दिलाय त्याच्याच उ:शापाने मुक्ती मिळू शकत असते. बहुधा वर्मा यांनी नेमणूकीच्या वेळीच खरगे यांच्याकडे विनवण्या केलेल्या व उ:शाप मागितलेला असावा. खरगेंनी दिलेल्या उ:शापामध्ये कुठे प्रशांत भूषण यांचे नामोनिशाण नसेल तर वर्मांचा पुरोगामी उद्धार कसा व्हावा? म्हणूनच भूषण यांची याचिका काही करू शकली नाही आणि वर्मा सीबीआयचे संचालक म्हणून रुजू झाले. त्यांना मोदींनी निवडले, हाच त्यांचा गुन्हा होता आणि मोदींनी लाथ मारून बाहेर काढल्याशिवाय त्यांना पुरोगामी मुक्ती मिळण्याची अजिबात शक्यता नव्हती. अखेर तेच झाले आणि खरगे यांची शापवाणी खरी ठरली.

 

ऑक्टोबर २०१८ मध्ये आलोक वर्मा आणि त्यांचे साहाय्यक राकेश अस्थाना यांच्यात सीबीआयमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. त्यांनी एकमेकांच्या विरोधात आरोप केले व गुन्हेही दाखल करण्यापर्यंत मजल गेली. देशातल्या या प्रमुख तपासयंत्रणेची लक्तरेच चव्हाट्यावर आली. त्यामुळे सरकारला त्यात हस्तक्षेप करण्याची वेळ आली. दक्षता आयोगाच्या माध्यमातून सरकारने त्या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यावर वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि जानेवारीत त्यांना न्याय मिळाला. नेमणूकीचा अधिकार ज्या समितीला आहे, तिलाच वर्मांना बाजूला करता येईल, असा तो निर्णय होता. साहजिकच २०१७ च्या जानेवारीत जी समिती वर्मांना नेमायला बसलेली होती, त्यात फक्त एक बदल झाला. सरन्यायाधीश बदलले होते. बाकी मोदी व खरगे तसेच्या तसे होते. आता गंमत अशी झाली, की वर्मा यांना हटवण्यात मोदींचा पुढाकार होता. सामान्य भाषेत मोदींनी वर्मांना जणू लाथ मारून बाहेर काढण्याचा पवित्रा घेतला होता आणि खरगे कमालीचे सुखावलेच, कारण त्यातून त्यांनी वर्मांना दिलेला उ:शाप खरा ठरणार होता. ज्या वर्मांच्या नेमणूकीला याच खरगेंनी जानेवारी २०१७ मध्ये कडाडून विरोध केला होता, तेच खरगे आता वर्मांच्या समर्थनाला पुढे सरसावले. न्या. सिक्री व पंतप्रधान मोदी या दोघांनी वर्मांना हटवण्याच्या बाजूने कौल देताच खरगे विरोधाला उभे ठाकले. आपणच दीड वर्षापुर्वी वर्मांच्या पात्रता व कुवतीवर शंका घेऊन त्यांच्या नेमणूकीला विरोध केल्याचेही स्मरण खरगेंना राहिले नाही. ती नेमणूक रद्द करण्यासाठी न्यायालयात धावलेले प्रशांत भूषण यांना आपली याचिका लक्षात राहिली नाही. हे दोघे दिग्गज एका सेकंदात वर्मांच्या समर्थनाला व वकिलीसाठी धावत येऊन उभे राहिले. याला म्हणतात पौराणिक चमत्कार. कारण वर्मांचा चेहरा बदललेला नाही की १८ महिन्यात त्यांची कुवत बदललेली नाही. मग खरगे-भुषणांना झाले काय? दैवी चमत्कार! नरेंद्र मोदींचा पदस्पर्श आणखी काय?

 

गेल्या ५-६ वर्षात आपला देश पुराणकाळात जाऊन बसला आहे. इथे दैवी चमत्कार घडतात, कुठलीही, कसलीही तात्विक उलथापालथ घडते. ज्याला कुठे वैज्ञानिक कारण वा तर्क देता येत नाही. निकष एकच असतो. मोदींचा हात ज्याला लागेल त्याची शिळा होऊन पडत असते आणि मोदींचा पाय लागला किंवा त्यांनी लाथ मारली, मग त्याचा उद्धार होत असतो. मोदींच्या सोबत होते म्हणून आंध प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू पक्के प्रतिगामी होते आणि त्यांनी मोदींची साथ सोडली तर तात्काळ ते पुरोगामी आघाडीचे अध्वर्यु होऊन गेले. शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा वा अरुण शौरी हे मोदींच्या विरोधात बोलू लागले आणि उद्धार होऊन गेला. कुशवाहा बिहारमध्ये तात्काळ पुरोगामी होऊन गेले. ही एकविसाव्या शतकातील पुराणकथा आहे की विज्ञानकथा आहे? जगातली प्रत्येक घटना राफेल विमान खरेदीशी जोडलेली आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला विरोधी ठरणारा निकाल दिला, तर तो न्यायाचा विजय असतो. नसेल तर न्यायालाही मोदींची दहशत असल्याची साक्ष मिळत असते. मोदींना रोजच्या रोज शिव्याशाप देण्याइतकी मोकळीक म्हणजे विचारस्वातंत्र्याची गळचेपी असते. न्यायालयाच्या आदेशान्वये कोणाला अटक झाली तर सुडबुद्धीचे राजकारण असते. बाकी संघ, भाजप वा मोदींच्यावर कसल्याही कारणाशिवाय खटले भरणे वा आरोप करणे हा न्याय असतो. थोडक्यात आजकाल पुरोगामी मोक्ष सोपा झालेला आहे. मोदींना शिव्या घाला किंवा मोदींचा पदस्पर्श होईल इतके काही करून घ्या. तुम्ही जगातले सर्वात पवित्र पुरोगामी होऊन जाता. खरगे वा भूषण यांच्यासारखे महात्मे इतके सोपे चमत्कार घडवून दाखवित असतील, तर आपण रामायण काळातून बाहेर कुठे पडलेले असतो? त्या दोघांनी वर्मांच्या नेमणूकीला विरोध करणे आणि त्याच वर्मांच्या हकालपट्टीला तितक्याच आवेशात विरोध करणे, चमत्कारापेक्षा कमी आहे काय? यालाच म्हणतात पुरोगामी जादुटोणा!!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/