संमेलनाचे हार्दिक स्वागत!
महा एमटीबी   11-Jan-2019

 
 
 
मायमराठीवर प्रेम करणार्या कोट्यवधी भाषाप्रेमींची नजर आता, यवतमाळात होऊ घातलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाकडे लागली आहे. मराठी साहित्य संमेलन होणार आणि त्याचे आयोजन या ना त्या कारणाने गाजणार नाही, असे कसे होणार? यंदाच्या साहित्य संमेलनालाही वादाची भलीमोठी किनार लाभली. प्रारंभी संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना महामंडळातर्फे उपस्थित राहण्याबाबत नकार कळवण्यात आला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर महामंडळाच्या अध्यक्षांनी दिलेला राजीनामा यामुळे वातावरण चांगलेच तापले. आरोप-प्रत्यारोप, संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा तथाकथित साहित्यिकांचा निर्णय, झालेल्या घटनाक्रमावर दुर्दैवी अशी झालेली टीका, महामंडळाच्या अध्यक्षांवर पळपुटेपणाचा झालेला आरोप, समन्वयाचा अभाव, आयोजक आणि महामंडळाच्या पदाधिकार्यांच्या विचारसरणीतील संघर्ष, एकाने दुसर्यावर निर्णय थोपणे... असे एक ना अनेक कंगोरे या वादाला होते. पण, आता वाद शमला आहे. मनातून कितीही इच्छा व्यक्त केली तर नयनतारा सहगल यांना पुन्हा निमंत्रित केले जाणे शक्य नाही.
 
 
कदाचित उद्याला उद्घाटक म्हणून शेगावच्या गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील मंचावर बसलेले दिसतील, अशी जी अपेक्षा व्यक्त केली जात होती, ती सुद्धा फोल ठरली आहे. कारण शेवटच्या क्षणी त्यांनीही उपस्थित राहण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे आजवर जे वाद झाले, ज्या शंका-कुशंका उपस्थित केल्या गेल्या, ते सारे बाजूला सारून, कलुषित झालेली मने खुंटीवर टांगून, विरोधकांच्या आरोपांमुळे घायाळ झालेल्या मनःस्वास्थ्यावर समझोत्याची फुंकर घालून, वाक्बाणांनी जखमी झालेल्या आत्म्याला शांत करून, सार्या मराठमुलुखाने या संमेलनाच्या स्वागतासाठी सिद्ध व्हायला हवे. काही गोष्टी घडल्याचे जसे दुष्परिणाम होतात तसेच त्याचे फायदेदेखील होतात. राजीनामा नाट्याचे जे दुष्परिणाम व्हायचे ते झाले, आता त्यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. यवतमाळकरांना यातून शहाणपण सुचले आणि त्यांनी जी एकजूट दाखविली त्याचे स्वागतच करायला हवे. संमेलन हातचे जाऊ नये किंवा संमेलनाला छोट्याशा कारणाने गालबोट लागू नये, यवतमाळकरांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचू नये, यासाठी सारे पुढारी एकवटले. त्यांनी पक्षाभिनिवेश बाजूला सारून 1973 नंतर तब्बल 45 वर्षांनी यवतमाळ जिल्ह्यात होणारे संमेलन अविस्मरणीय ठरवण्यासाठी पुढाकार घेतला. भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, अंकुर साहित्य मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच यवतमाळातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पत्रकार परिषद आयोजित करून ‘या, संमेलन आपलेच आहे...!’ असे केलेले आवाहन वादावर पडदा टाकणारे ठरले नसते तरच नवल. या निमित्ताने निरनिराळ्या विचारांची मंडळी एकत्र आली आणि त्यांनी, संकटसमयी आम्ही एक आहोत, असा दिलेला संदेश संमेलनासाठी यवतमाळात दाखल होणार्या साहित्यरसिकांना आश्वस्त करून गेला. संमेलन होणारच आणि तेदेखील धडाक्यात, याबाबतही साहित्यप्रेमींच्या मनात शंका राहिली नाही.
 
 
यवतमाळसारख्या जिल्हास्थानी उभ्या महाराष्ट्रातील मराठी जनता, मनात कितीही इच्छा असली तरी येणे शक्य नाही. पण म्हणून काही तिचे मराठीवरचे, मराठी साहित्यावरचे, मराठी साहित्यिकांवरचे प्रेम कमी होत नाही. त्यामुळे अनुपस्थित रसिक मनाने यवतमाळात राहणार आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे संमेलनातील घडामोडी टिपून घेण्यासाठी तो आसुसलेला राहणार आहे. त्या रसिकांची भूक कशी भागवायची, यासाठी आता प्रयत्न केले जायला हवेत. आजवरच्या अनुभवातून शहाणे होत पुढे पावले टाकायला हवीत.
 
 
 
 
अनेक वादविवादांनंतर साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्यांनी संमेलनाच्या आजवरचा इतिहासाला दिशा देणारा निर्णय घेतला आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवेच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचा हा निर्णय महामंडळाच्या पदाधिकार्यांच्या नव्हे, तर यवतमाळकर आयोजकांच्या द्रष्टेपणातून आलेला असल्याचे अधोरेखित होत असले, तरी महामंडळाच्या पदाधिकार्यांनी या सूचनेचा केलेला स्वीकार त्यांच्याही सामाजिक जाणिवा प्रगल्भ असल्याचे सांगून गेला आहे. या निर्णयामुळे निश्चितच शेतकरी आत्महत्यांचा विषय ऐरणीवर येणार आहे. शेतकरी आत्महत्या का करतो, सततच्या नापिकीमुळे त्याची कशी दुरवस्था होते, भाऊबंदकीमुळे शेतीचे आक्रसणे, वरुणराजाची अवकृपा, भेदक थंडीची दाहकता आणि कडाक्याच्या उन्हाने पिके करपणे, सिंचनाची कमतरता, घरातील खाणार्यांची डोकी वाढत जाणे, सण-समारंभासाठी काढलेल्या कर्जाची परफेड न झाल्याने सावकारांचा वाढलेला तगादा, आरोग्यावरील खर्चाची तजवीज नसणे, शेतीपूरक व्यवसायाची कास धरण्याची असमर्थता, नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याबाबत असलेली अनास्था, प्रशासकीय योजनांचा लाभार्थींपर्यंत पोहोचण्यातील विलंब... अशा एक ना अनेक समस्यांवर या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी माणसाला आणि शासनालाही चर्चा करावी लागणार आहे. या निमित्ताने महिला प्रगतीशील शेतकरी सुप्रिया सुळे यांनाही बोलवायला हवे होते. त्यांनी 9 एकर शेतीत 12 कोटींचे पीक घेतले आहे. ते कसे घेतले, याचा बोध या संमेलनाच्या माध्यमातून निश्चितपणे झाला असता. आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्यालाही सुगीचे दिवस आले असते. शेवटी, या मंथनातून विष बाहेर पडून अमृतच तेवढे हाती येईल, याबाबत निश्चिंत असावे.
 
 
नव्या साहित्यिकांसाठी, तरुणाईसाठी हा काळ सुगीचा राहणार आहे. साहित्य संमेलनात त्यांना ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांचा सहवास लाभण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या साहित्यविषयक प्रेरणा कोणत्या, साहित्याबाबतचे त्यांचे अनुभव, साहित्यकृती निर्मितीमध्ये आलेले अडथळे किंवा साहित्यकृती साकारताना त्यांना आलेली अनुभूती हे सारे जाणून घेण्याची ऊर्मी त्यांना दाखवावी लागेल. प्रत्येकच साहित्यिक स्वतःहून पुढे येणार नाही. त्यामुळे त्याला बोलते करून, त्याच्याकडून हवे ते काढून घेण्याची कसरत तरुणाईला करवी लागेल. त्यासाठी संबंधित साहित्यिकांच्या मागे तगादा लावणे, एवढे मात्र निश्चितच रसिकांच्या हातात आहे.
 
 
 
साहित्य संमेलनात वाद होतात म्हणून त्यापासून दूर राहणे, यात शहाणपणा मुळीच नाही. रस्त्याने अपघात होतात म्हणून का कुणी त्यावरून चालणे बंद करतो का? जिन्यावरून चढताना घसरून पडण्याची शक्यता असते म्हणून का कुणी पायर्या चढणे नाकारतो? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेत नापास होण्याची शक्यता असल्याने का कुणी परीक्षेला पाठ दाखवतो? तसेच साहित्य संमेलनाचेही आहे. कुणी नकार दिला, बहिष्काराची भाषा बोलली म्हणून काही संमेलन अयशस्वी होणार नाही. संमेलन हा जगन्नाथाचा रथ आहे, तो खेचण्यासाठी लक्षावधी हात तयार आहेत. ते यशस्वी करण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातील जनता तन-मन-धनाने मदत करण्यास तयार आहे. त्यामुळे कुणी बहिष्कारास्त्र उपसून उगाच उपशकुन करून घेण्याच्या भानगडीत पडू नये. संमेलनाला निधड्या छातीने पुढे होत येणारी आव्हाने पेलावी, वादांवर विजय मिळवावे, त्याचे हार्दिक स्वागत कारावे आणि आपली मते वैचारिक पातळीवर टिकावी म्हणून काळाच्या कसोटीवर ती वारंवार तपासून घ्यावी, यातच साहित्यिक आणि रसिक मायबापांचे भले होणार आहे...