दिल्लीत भाजप राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक
महा एमटीबी   10-Jan-2019


नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या द्विदिवसीय बैठकीला शुक्रवारपासून राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर प्रारंभ होत आहे. या बैठकीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातून येणार्‍या भाजपच्या पदाधिकार्‍यांना लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा कानमंत्र देणार आहेत. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव पारित केले जाणार असल्याचे समजते.

 

अबकी बार फिर मोदी सरकारया संकल्पनेवरील भाजपच्या राष्ट्रीय कार्य समितीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, भाजपचे संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदार, सर्व आमदार, यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या व्यूहरचनेला या बैठकीत अंतिम रूप दिले जाणार असल्याचे समजते. 

सकाळी ११ वाजता भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची बैठक रामलीला मैदानावर होणार आहे. दुपारी १ वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षीय भाषणाने राष्ट्रीय कार्य समितीच्या बैठकीचा शुभारंभ होणार आहे. दोन दिवस चालणार्‍या या बैठकीचा समारोप शनिवार १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाने होणार आहे. राष्ट्रीय कार्य समितीची ही विस्तारित बैठक असून, या बैठकीसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील १० प्रमुख कार्यकर्ते तसेच जिल्हा स्तरावरील भाजपाचे अध्यक्ष आणि महामंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. देशभरातील जवळपास १२ हजार भाजप पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/