मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाही?
महा एमटीबी   10-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : अभिनेते सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लव्ह यू जिंदगी’ या सिनेमाला थिएटर मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे. मराठी सिनेमाला डावलेले जात असलेल्याचा आरोप या सिनेमाच्या निर्मात्यांनी थिएटर मालकांवर केला आहे. मराठी ऐवजी हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांना स्क्रीन्स दिल्या जात आहेत. त्यामुळे सिनेमाचे प्रदर्शन जवळ आल्यामुळे निर्माते अस्वस्थ झाले आहेत. ‘लव्ह यू जिंदगी’ हा सिनेमा येत्या ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.
 

‘लव्ह यू जिंदगी’ या सिनेमामध्ये सचिन पिळगावकर, कविता मेढेकर, प्रार्थना बेहरे, अतुल परचुरे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धात जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन देणाऱ्या व्यक्तीची भूमिका या सिनेमात सचिन पिळगावकर साकारत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात एकही हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला नव्हता. अभिनेता रणवीर सिंह याचा ‘सिम्बा’ हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. ‘बटालियन ६०९’, सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा तसेच देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा सिनेमा आणि विजय मल्ल्यावर आधारित सिनेमा ‘रंगीला राजा’ असे ४ हिंदी सिनेमे ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे मराठी सिनेमांना या शुक्रवारी तगडी स्पर्धा असणार आहे.

 

यापूर्वी पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या सिनेमाच्या बाबतीतही असे घडले होते. ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या सिनेमाला देखील स्क्रीन मिळत नव्हत्या. परंतु या अडचणींवर मात करत ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा सिनेमा प्रदर्शित झालाच. त्यानंतर त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या शुक्रवारी ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या सिनेमाचा दुसरा आठवडा सुरु होईल, त्यामुळे मोठ्या पडद्यावर मराठी सिनेमांचीही टक्कर होईल. ‘लव्ह यू जिंदगी’ या सिनेमाची समस्या दूर व्हावी. अशी अपेक्षा निर्मात्यांकडून व्यक्त केली जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/