'सुपर बॉक्सर' मेरी कॉम जागतिक क्रमवारीत 'अव्वल'
महा एमटीबी   10-Jan-2019नवी दिल्ली : भारताची दिग्गज बॉक्सिंग खेळाडू मेरी कोमने जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत (एआयबीए) ४८ किलो महिला वजनी गटात अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी झालेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत शानदार विजय मिळवत मेरी कोमने विक्रमी सहाव्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे.

 

मेरीने २०१८ च्या गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण पदकावर नाव कोरले होते. तर जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत युक्रेनच्या एच. ओखोटोचा ५-० ने पराभव करत मेरीने सहाव्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती. मेरीने केलेल्या या दमदार कामगिरींमुळेच तीला ४८ किलो वजनी गटात अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत मेरीच्या नावावर सध्या ७०० गुण आहेत. जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम हा आयरीश बॉक्सर कॅटी टेलरच्या नाववर होता. मात्र मेरीने सहाव्यांदा सुवर्णपदक जिंकत तीचा विक्रम आपल्या नावावर करत मोठा इतिहास रचला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/