आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिला करणार साहित्य संमेलनाचे उद्घाटन
महा एमटीबी   10-Jan-2019
 
 

यवतमाळ : यवतमाळमध्ये शुक्रवार, दि. ११ जानेवारी रोजी होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिला करणार आहे. शेतकरी महिला वैशाली सुधाकर येडे (रा.कळंब, ता.राजूर)यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळ अध्यक्षा विद्या देवधर यांनी दिली आहे.

 

वैशाली यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन केल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिला जाईल आणि त्यांच्या व्यथा जगासमोर येतील, असे देवधर यांनी सांगितले. श्रीपाद जोशी यांनी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर घटनेप्रमाणे उपाध्यक्ष असणाऱ्या विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपद आले आहे. शुक्रवारी देवधर यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाची सभा झाली. सर्व महामंडळाचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते.

 

 
 
 

यवतमाळ जिल्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असून शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत त्यामुळे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन व्हावे, अशी सूचना आयोजक संस्थेने केली आहे. संमेलनात कुठलाही गोंधळ होणार नाही अशी ग्वाही विद्या देवधर यांनी दिली. 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/