सौभाग्य योजना (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना)
महा एमटीबी   01-Jan-2019
 
 
 
स्वातंत्र्योत्तर काळात देशात वीज जोडणी संथ गतीने झाली. परंतु गेल्या दोन दशकात देशात वीज जोडणीचा वेग बर्‍यापैकी वाढला होता. परंतु ग्रामीण व डोंगराळ भागातील वाड्या वस्त्यांमध्ये वीज पोहचली नव्हती. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबर, २०१७ रोजी शहरी व ग्रामीण भागातील वंचित घरांना विद्युत मिळावी या हेतूने सौभाग्य योजनेची (पंतप्रधान सहज बिजली हर घर योजना) ONGC या सरकारी कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी घोषणा केली.
 
 
 
 
थोर विचारवंत पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी ही योजना देशाला समर्पित केली. या योजनेअंतर्गत गाव व शहरातील प्रत्येक घरापर्यंत गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून ३१ मार्च २०१९ पर्यंत वीज पोहचविणे हे लक्ष्य ठेवले.
 
 
सौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीजजोडणी देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीजजोडणी विनाशुल्क देण्यात येणार असून, इतर लाभार्थ्यांना मात्र ५०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. हे ५०० रुपये संबंधित लाभार्थ्यांने त्याच्या बिलातून १० टप्प्यात भरावयाचे आहे.
 
 
मोफत वीज जोडणीसाठी लाभार्थी कुटुंबांची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
 
 
 
योजनेत वीजपुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीज बिल भरणे बंधनकारक आहे. मात्र थकबाकीमुळे कायमचा वीजपुरवठा खंडित झालेली घरे, तात्पुरत्या शिबिरामधील स्थलांतरित होऊ शकणारी घरे तसेच शेतांमधील घरे या योजनेस पात्र ठरणार नाहीत असा निकष लावण्यात आला आहे.
 
 
या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात येणार आहे. तसेच अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणे शक्य नाही अशा घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्याची व्यवस्था केली गेली आहे. याठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत दिले जाईल अशी ही व्यवस्था आहे.
 
 
पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदीम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुध्दा मोफत वीजपुरवठा देण्यात आला आहे.
 
 
या योजनेंंतर्गत केंद्र सरकार ट्रान्सफॉर्मर, वीज तार, पोल उभे करण्यासाठी मदत देईल. वीज कनेक्शनसोबत स्मार्ट मिटर बसविण्यात येईल जे प्री-पेड कनेक्शन राहील. म्हणजे हे वीज कनेक्शन मोबाईल किवां DTH कनेक्शनसारखे, मोबाईल रिचार्जसारखे भीम ऍपवरुन रिचार्ज करता येईल.
 
 
या योजनेसाठी राखीव १६,३२० कोटी रुपयांसह सरकारी अनुदान म्हणून रुपये १२,३२० व ग्रामीण घरासाठी वीज कनेक्शनसाठी रुपये १४,३२५ कोटी रुपये तसेच शहरी भागासाठी रुपये १७३२.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.
 
 
 
 
राज्यात प्रत्येक घरात वीज पोहचावी यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या निर्देशानुसार महावितरणच्यावतीने सौभाग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
 
 
या योजनेंंतर्गत प्रत्येक घरासाठी वीज कनेक्शन दिल्याने रॉकेल वापरात कमतरता येईल. जेणेकरुन शिक्षण, आरोग्य सेवेत सुधारणा होईल. तसेच प्रत्येक घरात रेडिओ, टीव्ही, मोबाईलचा वापर वाढेल. यामुळे आर्थिक सुधार होईल, रोजगारात वाढ होईल. विशेष म्हणजे अधिकाधिक महिलांना याचा लाभ जास्त प्रमाणात होईल. अशा काही उद्दिष्टांसह सौभाग्य योजना अंमलात आणली गेली.
 
अधिक माहितीसाठी saubhagya.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
 
मुख्य उद्दिष्ट
* वीज नसलेल्या घरांना वीज पुरविणे.
 
* रॉकेलला पर्यायी इंधन पुरविणे.
 
* शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणे.
 
* दळण-वळण आणि सार्वजनिक सुरक्षा पुरविणे.
 
* रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे.
 
* महिलांचे दैनंदिन जीवन सुकर करणे.
 

 
 
लाभार्थी :
* देशभरात आतापर्यंत २१ कोटी ११ लाख घरांमध्ये (९९ %) विद्युतीकरण झाले आहे. तर उर्वरित १३ लाख घरांपर्यंत वीज पोहचविणे सुरु आहे. देशात सौभाग्य योजनेंतर्गत ऑक्टोबर २०१७ पासुन डिसेंबर २०१८ पर्यंत २ कोटी ४८ लाख घरांना वीज जोडणी दिली गेली.
 
 
* राज्यात एकूण २ कोटी ४३ लाख घरांपर्यंत वीज पोहचली असून सौभाग्य योजने अंतर्गत वर्षभरात १० लाख ९३ हजार घरांसोबत १०० % महाराष्ट्र प्रकाशमान झाला आहे. तसेच देशातील ५२८ जिल्हे व ५ लाख ७१ हजार गावे पूर्णत: प्रकाशमान झाले असून उर्वरित १०९ जिल्हे व ४८ हजार गावे प्रगतीपथावर आहेत.
 
 
* जळगाव जिल्ह्यात एकूण ९ लाख ५६ हजार घरांपैकी ८ लाख ९६ हजार घरांपर्यंत वीज पोहचली होती. सौभाग्य योजनेअंतर्गत सरकारने उर्वरित घरांना वीज जोडणी करुन संपूर्ण जिल्ह्यास प्रकाशमान केले आहे.
 
 
- कल्पेश गजानन जोशी