एक आढावा रौप्यमहोत्सवी वर्षाचा
महा एमटीबी   01-Jan-2019

 


 
 
रौप्य महोत्सवी कार्यक्रमा अंतर्गत व्यासपीठावर आबासाहेब पटवारींसह संस्थेचे पदाधिकारी
 
 
 

कै.नाना ढोबळे स्मृतिसेवा प्रतिष्ठान, कुळगाव


नाना ढोबळेंच्या संघ, समाजसेवेच्या कार्याचे निरंतर स्मरण राहावे म्हणून बदलापूरवासीयांनी १९९३ साली त्यांच्या स्मृतीच्या निमित्ताने आपल्या हातूनही स्थानिक नागरिकांची अल्प-स्वल्प का होईना सेवा घडावी, या उद्देशाने ‘नाना ढोबळे स्मृतिसेवा प्रतिष्ठान’ची नोंदणी करून सुरुवात केली. या प्रतिष्ठानच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...

 

नाना ढोबळेंच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची एक मूर्त संकल्पना म्हणजे नाना ढोबळे स्मृतिसेवा प्रतिष्ठान. संस्थेच्या नोंदणीला धर्मदाय आयुक्तांकडून १९९३ साली मान्यता मिळाली, तर आर्थिक वर्ष २०१४-१५ पासून आयकर विभागाकडून ‘८० जी’ प्राप्त झाल्याने देणगीदारांच्या संख्येतही वाढ झाली. सुरुवातीपासून काटेकोर व अपेक्षित असा हिशोब ठेवत असल्याने कर सल्लागार वा सीएच्या मार्गदर्शनाने नियमित ताळेबंदे, नफा-तोटा पत्रक व त्याच्या नियमाप्रमाणे ऑडिटही होते. संस्थाकार्याने प्रभावित होऊन श्रीधर फडके या सीएच्या ओळखीने बदलापूर औद्योगिक विभागातील मे. आयडियल (लक्ष्मी) केमिकल्स यांनी ‘सीएसआर फंड’ जो दोन टक्क्यापर्यंत असतो, त्यातून २०१५-१६ व २०१६-१७ या सलग दोन वर्षी संस्थेला एक लाखांपेक्षा जास्त देणगी दिली. संदीप बळवंत गोखले यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. वैकुंठ बाळगी व गोविंदराव दातार अशा ज्येष्ठांनी ठेवलेल्या चोख कारभाराला जणू ही पोचपावतीच ठरली. २५ वर्षांच्या कालावधीत वसंतराव नामजोशी, सुबोध मोडक, श्रीधर फडके व सध्या उमेश टिपणीस ऑडिटची जबाबदारी सांभाळून विविध उपयोगी सल्लेही संस्थेला देत आहेत.

 

नाना ढोबळेंच्या नावाने सुरू झालेल्या या संस्थेचा मी संस्थापक-सदस्य आहे. माझे आणि संस्थेचे नाते जीवा-शिवाचे म्हणावे लागेल. कारण, समाजसेवेच्या प्रेरणा आणि समाजबंधुत्वाची खरी ओळख मला झाली ती नानांमुळेच! खरे संघयोगी असलेले नाना, त्यांच्या विचारांनी आणि प्रत्यक्ष त्यांनी केलेल्या समरस वर्तनांनी मी भारावून गेले होतो आणि आजही आहे. १९८३ साली तळजाई येथे प्रांतानुसार संघशिबीर होणार होते. त्यावेळी बदलापूर येथे प्रांत बौद्धिक प्रमुख आले होते. त्यावेळी बदलापूर तशी नवीन उदयास येणारी नगर परिषद. बदलापूरमधून जवळ जवळ १०० तरी स्वयंसेवकांनी या शिबिरास जावे असे ठरले होते. या कल्पनेला मूर्त स्वरूप दिले ते नानांनी. त्यावेळी नाना रेल्वेने बदलापूरला येण्यास निघाले. माझी बहीण वसुधा हीसुद्धा त्याच गाडीत होती. तिची आणि नानांची ओळख झाली. वसुधाला जन्मताच पोलिओ झाला होता. त्यावेळी नानांची राहण्याची व्यवस्था माझ्याच घरी केली होती. नाना घरी आले. बहिणीशी तर ओळख होतीच. शिबिराची तयारी जोरदार करत असतानाही नानांनी माझ्यासारख्या स्वयंसेवकाच्या कुटुंबातील समस्येचाही विचार केला. बहिणीच्या उपचारासाठी बंगळुरूला जायचे होते. नानांना हे कळले. त्यांनी तात्काळ बहिणीची तेथील निवासाची आणि इतर व्यवस्था केली. घरातील कर्त्या-धर्त्या ज्येष्ठाने आपुलकीने मायेने घरचा प्रश्न सोडवावा, त्या तळमळीने नानांनी आम्हाला मदत केली. पण, त्या मदतीमध्ये कुठेही ‘मी मदत करतो आहे’ असा भाव नव्हता. ही भावना माझ्या मनावर कायमस्वरुपी अंकीत होती. त्यामुळे नानांच्या नावाने सुरू झालेल्या सेवाभावी संस्थेत कायमस्वरूपी तन-मन-धनाने काम करण्यास मला आनंद आणि अभिमान वाटतो.

 

संस्थेच्या कार्यासाठी वास्तू असावी म्हणून प्रथम भाडेतत्त्वावर देशपांडे बंधूंनी २०१० साली बदलापूर शहराच्या केंद्रबिंदू असलेल्या शिवाजी चौकातील आपल्या एका सदनिकेच्या जागेची देणगी फक्त सामाजिक कार्यासाठीच वापरावी या अटीवर दिली. संघपरिवारातीलच अनघा जोशी या मानधनावर गेल्या दोन वर्षांपासून सकाळ-संध्याकाळ कार्यालयप्रमुख म्हणून काम सांभाळू लागल्या, तेव्हा संस्थेला स्थिरता प्राप्त झाली. वाढत्या वस्तीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी खारीचा वाटा उचलल्यास संस्था सक्षम झाली. दरवर्षी अनुदान वाटपात संस्थेच्या कार्याची दखल घेऊन प्रथम डीएनएस बँक व आता कल्याण जनता परिवारातील सहकारी बँका प्राधान्य देऊ लागले, ही एक समाधानाची बाब आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवाया भावनेने प्रतिष्ठानने २००२ पासून आपल्या अन्य उपक्रमांबरोबरच मुख्य लक्ष केंद्रित केले आहे, संस्थेजवळ १७-१८ प्रकारच्या १००-१२५ वस्तूही आता कमी पडू लागल्या आहेत. एके दिवशी एक व्यक्ती संस्थेची चौकशी करत आली. प्रथम कळेना की, तो का चौकशी करतो आहे. विचारल्यावर त्याने सांगितले की, एक आजी बदलापूर येथे राहत होत्या. त्या एकट्याच राहायच्या. नंतर आजारपणामुळे आणि काही वैयक्तिक कारणामुळे बदलापूर सोडून त्या लेकीकडे राहणार होत्या. बदलापूरच्या राहत्या घरातील काही वस्तू त्यांना निष्ठेने सेवाकार्य करणाऱ्या संस्थेला द्यायच्या होत्या. आजींनी घरातील वस्तू म्हणजे दोन कपाटे संस्थेला द्यायची ठरवली होती. त्यामुळे ती व्यक्ती संस्थेची चौकशी करत होती. संस्थेला वस्तू मिळणेमहत्त्वाचे होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे होते ते की, लोकांचा संस्थेवर विश्वास आहे, प्रेम आहे.

 

अशा सेवाभावी, दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या शुभेच्छांमुळे, प्रत्यक्ष मदतीमुळे संस्थेचे कार्यालय सुसज्ज झाले आहे, तर विद्यमान अध्यक्षांनी नातीच्या वाढदिवसाला एक उपकरण विकत घेऊन ते संस्थेला देऊन स्वत:च्या घरापासून अनुकरण करण्यास सुरुवात केली. पुढील काळातही समाजातील सज्जन यात उत्साहाने पुढाकार घेतील अशी आशा आहे. सढळ हस्ते मदत करण्यास दात्यांनी पुढे यावे हे आवाहन वाचकांना...

 

संस्थेचे अन्य उपक्रम/कार्य

 

) अंत्यविधीचे सामान - संस्थेने २०१२ पर्यंत अंत्यविधीचे सामान अल्पशा दरात व दिवस-रात्र केव्हाही लागले तरी, उपलब्ध करून दिले होते. आता रुग्णोपचाराचे सामान वाढल्यामुळे जागेअभावी ते बंद केले.

 

) शिक्षण/संस्कार, क्रीडाविषयक उपक्रम - सुरुवातीच्या कालावधीमध्ये संस्थेने पुस्तक प्रदर्शन व विक्रीसाठी भरपूर सहकार्य केले, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले, गेल्या चार वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून १५०० रुपये ते २००० हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात आलेली आहे, प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनातील अनुभवांचा अभ्यास व्हावा, म्हणून बारावीपर्यंतच्या मुलांकडून त्यांचा अभ्यास करवून घेऊन, रामायणातील कथांवर परीक्षा घेतल्या गेल्या. बदलापूर बुद्धिबळ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सतत पाच वर्षे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करीत आलेले आहे.

 

) आरोग्यविषयक, देशभक्तीविषयकही उपक्रम- २०१८ या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता करणारे तीन विविध कार्यक्रम डिसेंबर वर्षाला निरोप देताना २३ डिसेंबर ते २७ डिसेंबर या काळात नुकतेच साजरे केले. विशेष म्हणजे तीनही कार्यक्रमात डोंबिवलीच्या संस्थाजीवनातील उपक्रमतेचे महर्षी जनक आबासाहेब पटवारी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ बदलापूर संस्था कार्यकर्त्यांना लाभला. पहिला कार्यक्रम झाला तो, शिरगाव बदलापूर पूर्व येथील शिरगावच्या श्री गजानन प्रासादिक रंगीत संगीत भजनी मंडळाचा भारूड कार्यक्रम. त्याचे संचालक विनोद आपटे व ३० सहकाऱ्यांनी हे भारूड सादर केले. या भन्नाट भारूडाने उपस्थितांचे चांगलेच जागृतीपर मनोरंजन झाले. दुसरी वार्षिक बुद्धिबळ स्पर्धा बदलापूर बुद्धिबळ संस्थेच्या संयुक्तपणे आयोजीत करण्यात आली एकूण ४४ जोड्यांसह ८८ जण सहभागी झाले होते. यामध्ये पहिल्या गटामध्ये इयत्ता पहिली व पाचवीमध्ये प्रथम क्रमांक गुरूप्रसाद प्रल्हाद, द्वितीय क्रमांक आर्यन पाटील, तिसरा क्रमांक देवांशु साकेत यांनी पटकावला. दुसऱ्या गटामध्ये (इयत्ता सहावी ते दहावी) प्रथम क्रमांक साईल कोंयदे, द्वितीय क्रमांक प्रेम शिरसाट, तृतीय क्रमांक वेदांत भालेराव यांनी पटकावला. खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली ती अशोक सरवदे यांनी. या स्पर्धेचे द्वितीय क्रमांक पटकावणारे विजेते होते, डी. आर. नाईक, तर तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले चैतन्य मोहिते.

 

संगीताचा अप्रतिम कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला होता. सध्या कलर्स वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम अंतिम फेरी पोहोचला असतानाच, बदलापूरच्या ११ वर्षाच्या चिमुरडीने सुरेली गायिका सई जोशी हिने अंतिम सहा स्पर्धकांमध्ये धडक मारली आहे. तिचा सत्कार करण्यास बदलापूरकर संगीतप्रेमी नागरिक उत्सुक होते. त्यात तिच्या आई विशाखा व वडील विनीत यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या ‘स्वरगंधार’ मंडळाच्या युवा पिढीतील गायक-गायिकांच्या भावगीतांचा, चित्रपटगीतांच्या बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सईने अनेक मराठी जुनी सदाबहार भावगीते तर गायलीच, त्याशिवाय हिंदी चित्रपटगीतेही गायली. तिने सादर केलेल्या मराठी-हिंदी गाजलेल्या गाण्यांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. सुवर्णयोग म्हणजे सईचा सत्कार जुन्या गायिका आणि सध्या बदलापूर येथेच राहणाऱ्या सुमनताई माटे यांच्या हस्ते संस्थेने घडवून आणला. तो ‘मणिकांचन योग’ म्हणायला हवा. समाजाच्या सर्वांगाचा, आयामांचा विचार करत आरोग्य, शिक्षण, संस्कृती, सकारात्मक जागृती यावर तन-मन-धनाने काम करत असलेली नाना ढोबळे स्मृतिसेवा प्रतिष्ठान सध्या आपल्या परीने काम करत आहे. संस्थेला समाजातील सज्जन शक्तीची साथ हवी आहे. सदैव चांगल्या सेवकार्याला सर्वतोपरीने सहकार्य करणाऱ्या समाजाला विनंती आहे की, तुम्हीही संस्थेच्या कामात मदत करावी.

 
 - अनिल पालये
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/