दिलीप क्षीरसागर - समाजशील मनाचा अभियंता
महा एमटीबी   01-Jan-2019


 
 
 
 
दिलीप क्षीरसागर जलसंपदा खात्यामध्ये अभियंता पदावर कार्यरत होते. ३८ वर्षे सेवा केल्यानंतर ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांची सेवापूर्ती झाली. त्यानिमित्ताने शरद जाधव यांनी व्यक्त केलेले हे मनोगत...
 

सरसंघचालक आपल्या घरी येणार... ही कल्पनाच मनाला मोहवून टाकते. ही कल्पना नाही, प्रत्यक्ष घडलेली घटना आहे, आपल्या दिलीपच्या बाबतीत. शिर्डीवरून मुंबईला जाताना सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवतांनी नाशिकला मुक्काम करण्याचे ठरवले. सरसंघचालकांचा मुक्काम सामान्यपणे स्वयंसेवकाच्या घरीच होत असतो. नाशिकला तो दिलीप क्षीरसागरच्या घरी ठरला. दिलीपला हे समजल्यावर त्याला काहीच सुचेना. तो राहत असलेल्या वंदना पार्कमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय. अपार्टमेंटमधील लोकं कधी फारसे एकत्र येत नाही. या बातमीने मात्र सर्वच एक झाले. वंदना पार्कमध्ये दिवाळीची तयारी सुरू झाली. रांगोळ्या, आकाश कंदील, स्वच्छता, पार्किंगची सुविधा इत्यादी बारीकसारीक गोष्टींचा विचार सुरू झाला. प्रत्यक्ष अंमलबजावणीसुद्धा झाली. सरसंघचालक येण्याची वेळ झाली. अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले. सरसंघचालकांचे औक्षण केल्यानंतर त्यांचा प्रवेश दिलीपच्या घरात झाला. दिलीप व त्याच्या कुटुंबीयांना हा प्रत्यक्ष परमेश्वर घरी आल्याचा आनंद झाला. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. दिलीप गेल्या ३०-४० वर्षांपासून संघकामात गर्क असायचा. त्या कामाची ही एक प्रकारची पावतीच दिलीपला मिळाली.

 

सटाणा हे देव मामलेदार यशवंत महाराजांचे गाव. ते संघाकरिता फारसे अनुकूल गाव नाही. मातब्बर शेतकरी असलेले गाव. राजकीयदृष्ट्या विचार करता काँग्रेसचा बालेकिल्ला असलेले गाव. अशा सटाणा गावात दिलीपचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झाले. त्याच्या घरी संघाचा फारसा संबंध नाही. वडील कोर्टात नोकरीस. दोन भाऊ व एक बहीण असे छोटे कुटुंब. घरी मात्र दै. ‘तरुण भारत’ येत असे. दिलीपला वाचनाची प्रचंड आवड. संपूर्ण दै. ‘तरुण भारत’ वाचून काढणे हा रोजचा परिपाठ. बारावी विज्ञान परीक्षा चांगल्या गुणांनी दिलीप उत्तीर्ण झाला. त्याच आधारावर पुणे येथे स्थापत्त्य अभियांत्रिकीच्या पदविकेत प्रवेश घेतला. दिलीपचा संघाशी प्रथम संपर्क पुणे येथे आला. दिलीपचे पाय महाविद्यालयाजवळ भरत असलेल्या संघ शाखेकडे वळले. संघ शाखेत रोज जाणे-येणे सुरू झाले. तरुण मन त्यामध्ये रमू लागले. ‘संघ विचार’ आता जवळून अनुभवता येऊ लागला. वाचनाने मनाची मशागत झालेली होतीच. संघ संपर्काने ती अधिक दृढ होत गेली. संघ नसानसात भिनायला लागला. शिक्षण संपले. आता पुढे काय, हा प्रश्न पडला नाही. पाटबंधारे खात्यात नोकरीची संधी चालून आली. दिलीपने कोणताही विचार न करता आलेली संधी स्वीकारली. मुळा-मुठाच्या तीरावरून आता वैतरणा येथे रवानगी झाली.दोनच वर्षांत वैतरणेवरून दिलीपची बदली झाली. नाशिक येथील सीडीओ कार्यालयात बदलीने दिलीप रुजू झाला. आता वास्तव्य गोदातीरी सुरू झाले. कार्यालयातील डॉ. मोहनराव भागवत, विलास चौथाई यांच्याशी संपर्क झाला. त्यांच्याबरोबर दिलीप संघ शाखेत जाऊ लागला. संघाचा संपर्क पुन्हा आला. साप्ताहिक ‘मिलन,’ ‘गंगाजळी,’ संघाचे ‘उत्सव’ यामध्ये दिलीप सहभागी होऊ लागला. दैनंदिन शाखेत जाणे- येणेसुरू झाले. गटनायकाची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली. दिलीपने ती जबाबदारी स्वत:हून स्वीकारलेली होती. साहजिकच उत्तम कामकाज घडू लागले.

 
आता अधिकाधिक वेळ संघकामास तो देऊ लागला. त्याला संघाशिवाय काही सुचेनासे झाले. दिलीप संघमय होत गेला. संघाच्या अधिक संपर्कामुळे विविध जबाबदाऱ्याही सहजतेने त्याच्यावर सोपवल्या जाऊ लागल्यात. त्या स्वीकारीत संघ काम अधिक वेळ चालू झाले. शाखा कार्यवाह, नगर कार्यवाह, नाशिक शहर कार्यकारिणी सदस्य, शहर बौद्धिक प्रमुख, व्यावसायिक प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या दिलीपवर येऊ लागल्या. त्याने प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पेलली. आपल्या कामाने प्रत्येक जबाबदारीला वेगळा न्याय दिला. नाशिक महानगर कार्यवाहपदाची जबाबदारी पेलण्याचे भाग्य दिलीपच्या वाट्याला आले. सुमारे सहा वर्षे या पदावर काम करीत असताना संपर्क व्यापक होत गेला. संघ स्वयंसेवक तसेच संघ पदाधिकारी यांच्याबरोबर संपर्क वाढला. विविध मान्यवरांचा सहवास लाभू लागला. वैचारिक जडणघडण होऊ लागली. व्यापकतेने संघ समजू लागला. दिलीपचीही ती तळमळ होतीच. अत्यंत प्रामाणिकपणे तो कामास न्याय देऊ लागला. नाशिक जिल्हा कार्यवाह, विभाग कार्यवाह, विभाग प्रचार प्रमुख अशा चढत्या क्रमाने जबाबदारी स्वीकारीत आज दिलीप पश्चिम महाराष्ट्र प्रचार प्रमुख म्हणून दायित्व पार पाडीत आहे. पश्चिम महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. संघ कामाकरिता या जिल्ह्यांमध्ये दिलीप प्रवास करीत असतो. प्रत्येक शनिवार, रविवार संघकामाकरिता दिलीप प्रवास करतो. कधी नगर, तर कधी सोलापूर, कधी पुणे, तर कधी सातारा अशा लांबवर सतत दिलीप प्रवास करीत असतो.
 

संघातील जबाबदाऱ्या वाढत गेल्या. संघ परिवारातील जबाबदारीही वाढली. संघ परिवारातील विविध संघटनांशी जवळचा संबंध येऊ लागला. पालकत्वाच्या किंवा मार्गदर्शनाच्या भूमिकेत परिवाराच्या कामकाजात दिलीपचा सहजतेने सहभाग वाढत गेला. सामाजिक समरसता मंच, समरसता साहित्य संमेलन, अखिल भारतीय दृष्टिहीन कल्याण संघ (सक्षम), आरोग्य भारती इत्यादी परिवाराच्या कामकाजात सहभाग सुरू झाला. जिल्हा कार्यवाह हा परिवाराचा पालक असतो. दिलीप जिल्हा कार्यवाह असताना जवळपास सर्वच परिवाराशी दिलीपचा संबंध आला. दिलीपला मात्र समरसता मंचाच्या कामात अधिक रस असे. दिलीपने समरसतेवर एक छोटेखानी पुस्तिकेचे लिखाणही केलेले आहे. संघ तसेच परिवारातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी सततचा संपर्क वाढला. दिलीप आता प्रासंगिक लिखाण करू लागला. संघासंबंधी लिखाणात वाढ होऊ लागली. संघ तसेच परिवारातील प्रसंगांवर लिखाण होत गेले. वाचनाची गोडी असल्याने लिखाणाची उंची वाढत गेली. सेवा व वनवासी विभागावर जनजागरण अभियानात दिलीपने दर्जेदार पुस्तिका लिहिली. वनवासी कल्याण आश्रमाच्या स्मरणिकेचे संपादन दिलीपने वेगळ्या धाटणीने केले. मा. जिल्हा संघचालक बाळासाहेब आहिरे यांच्यावरील पुस्तकाचे संपादन मंडळात हिरीरीने तो सहभागी होत राहिला. दिलीपने आपल्या बौद्धिक क्षमतेचे सादरीकरण विविध लेख, विविध पुस्तिकांच्या लिखाणाने केले. प्रवास पहिल्यापासून तो करीत असेच. पश्चिम महा प्रांताची जबाबदारी स्वीकारल्याने प्रवासात वाढ झाली. ३६५ दिवसांत सुमारे ७०-८० दिवस प्रवास तो करू लागला. नोकरी-घर सांभाळून तो प्रवास करीत असतो. त्याच्या या सक्षम योगदानाची निश्चित दखल घेतली पाहिजे.

 

संघकाम करीत असताना बरोबरच्या संघ स्वयंसेवकांशी त्याचा स्वच्छ व पारदर्शक व्यवहार असे. सर्वांशी सलोख्याचे संबंध दिलीप राखत असे. स्वत: मोठी जबाबदारी पार पाडीत असताना आपल्या सोबतच्या स्वयंसेवकांचा तो आदर करीत असे. त्यांनाही वेळप्रसंगी कामाची योग्य ती संधी देत असे. दिलीप बौद्धिक प्रमुख व मी सहबौद्धिक प्रमुख म्हणून काम करीत असू. बरेच वर्ष आम्हा दोघांवरही ही जबाबदारी होती. दिलीपकडून त्यावेळेस बऱ्याच गोष्टी शिकावयास मिळाल्या. सरसंघचालक सुदर्शनजी यांचा बौद्धिक वर्ग सायखेडकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेला होता. त्याचे सूत्रसंचालन दिलीप करणार होता. कार्यक्रमाचे सर्व नियोजन पूर्ण झाले होते. सर्व गोष्टी नियोजन केल्याप्रमाणे घडत होत्या. कार्यक्रम सुरू होण्यास अवघी १५ मिनिटे बाकी होती. दिलीपने सांगितले, “शरद कार्यकमाचे सुत्रसंचालन तुला करावयाचे आहे.” माझी बोबडीच वळली. जाहीर कार्यक्रमात सरसंघचालकांच्या समोर पूर्वकल्पना नसताना कसे सूत्रसंचालन करणार? मी नकार देण्याच्या मनस्थितीत होतो. दिलीपने सर्व जाणले आणि धीराचा शब्द दिला. “मी सांगतो आहे ना, तूच सूत्रसंचालन कर.” त्याने केलेल्या नियोजनाचा कागद माझ्या हातात दिला. कार्यकम सुरू झाला. यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रम संपल्यावर दिलीपने कौतुकाने पाठ थोपटली. चांगले सूत्रसंचालन झालेले होते. पण त्याचे सर्व श्रेय मला देऊन दिलीप मोकळा झाला. दिलीप आपल्या सहकाऱ्यांस सहजतेने चांगल्या संधी सदैव उपलब्ध करून देत असे. स्वत: मागे राहून इतरांना पुढे करणे ही दिलीपची खासियतच होती.

 

संघकाम करीत असताना वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येत होता. एकदा कुणाचा परिचय झाला की, दिलीप त्यास कधीच विसरत नसे. रमेश पतंगे लिखित ‘मी, मनू आणि संघ’ या पुस्तकावर चर्चा सायखेडकर वाचनालयात झाली. त्यास नाशिकचे साहित्यिक डॉ. शंकर बोराडे यांनाही बोलविण्यात आलेले होते. या कार्यक्रमानंतर जवळपास दहा-पंधरा वर्षानंतर रमेश पतंगे यांचे बंडोपंत जोशी स्मृती व्याख्यानमालेत व्याख्यान होते. त्या ठिकाणी दिलीपने शंकर बोराडेंना बघितले. कार्यक्रम संपल्यावर त्याने बोराडेंचा परिचय रमेश पतंगेंबरोबर करून दिला व सायखेडकरमधील ‘मी, मनू आणि संघ’ या पुस्तक परीक्षणावरील चर्चेत बोराडे सहभागी होते, असे सांगितले. एकदा ओळख झाली की, दिलीप त्यांना कधीच विसरत नसे. याबाबत त्याची स्मरणशक्ती अधिक तल्लखच आहेसंघ कामात अधिकाधिक योगदान देत असताना दिलीप सेवाकार्यातही उत्तम सहभाग घेत होता. तो कार्यालयात नियमितपणे वेळेवर जात असे. इतका की त्याच्या येण्या- जाण्यावर लोक घड्याळ लावीत असत. आपल्या कार्यपद्धतीने दिलीपने सेवेत एक नवा मापदंड निर्माण केला आहे. मोठे धरण, उपसा सिंचन यात त्याचे विशेष योगदान आहे. मुख्य अभियंता पांढरे साहेबांकडून दिलीपला गौरविण्यात आलेले आहे. राज्य शासनाचे चर्चासत्र शासकीय इमारती बाहेर प्रथमच घेण्याचे निश्चित करण्यात आले. या चर्चासत्राच्या नियोजनाची जबाबदारी त्याच्यावर होती. हॉटेल ताजमध्ये हे चर्चासत्र झाले आणि दिलीपच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ते सर्वांच्याच स्मरणात राहिले. झोकून देऊन काम करण्याची त्याची प्रवृत्ती आहे. त्याच्या या कार्यशैलीमुळेच त्याची ‘मेटा रिफॉर्म’ कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली होती. ही निवड त्याने सार्थ ठरविली.

 

स्पोर्ट्स व कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटी सुरू करण्याबाबतविशेष प्रबंध त्याने सादर केला. शासनाने त्याचा स्वीकार करून त्यावर नेमकी कार्यवाही झाल्याने हे एक मोठे यश ठरले. संघटनेच्या कामकाजातही दिलीप सहभागी असतात. संघटनेचे अथक परिश्रम, आंदोलन व सततच्या पाठपुराव्यामुळेच अभियंत्यांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा मिळाला. या विशेष आंदोलनात दिलीपचा खूप मोठा सहभाग होता. शासकीय कर्मचाऱ्यांची सामाजिक जाणीव वाढावी म्हणूनही दिलीप सदैव प्रयत्नशील असे. दिलीपचे पुढाकारानेच सीडीओमध्ये दरवर्षी २६ जानेवारीला रक्तदान शिबीर आयोजित केले जात असे. या शिबिरात किमान १०० रक्तबाटल्या जमा केल्या जायच्या. जवळजवळ एक तप हा उपक्रम सुरू आहे. सहकाऱ्यांना वाचनाची गोडी लावणे, विविध लेख सहकाऱ्यांना वाचनास देणे असे उपक्रम दिलीप सदैव राबवितात. सहकाऱ्यांचा सामाजिक कामात सहभाग कसा वाढेल, असा प्रयत्नही दिलीप जाणीवपूर्वक करीत असे. असे विविधांगी सामाजिक प्रयोग त्यांनी सातत्याने केले आहेकार्यालयीन सेवा व संघकाम करीत असताना कुटुंबाकडे दिलीपने कधीच दुर्लक्ष होऊ दिले नाही. कौटुंबिक जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळत दिलीपने संघकामात योगदान दिले. आपल्याप्रमाणेच त्याने आपली लेक निवेदिता हिला अभियंता होण्यास प्रोत्साहन दिले. लेकीने आपल्या वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत यश मिळविले. त्या आज पतीबरोबर पुण्यास वास्तव्यास आहे. अर्थात, या सर्व कौटुंबिक जबाबदारीमध्ये उल्का वहिनींचा मोठा सहभाग आहे. वहिनींच्या पाठबळामुळेच सर्व कामास तो योग्य न्याय देऊ शकला आहे. उल्का वहिनी पोस्टात सेवा करीत दिलीपच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. उल्का वहिनींच्या भक्कम पाठिंब्यामुळेच दिलीप आपल्या कामाचा मापदंड निर्माण करू शकला आहे. सहकाऱ्यांचे समाजशील मन घडविता-घडविता दिलीप ३३ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाला आहे. सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य पूर्णत: संघशरण करण्याचा त्याचा मानस आहे. त्याचे जीवन निरामय व संघमयी व्हावे, त्याच्या सर्व मनोकामना सफल व्हाव्यात हीच याप्रसंगी शुभेच्छा !

 

- शरद जाधव

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/