दहशतवाद, नक्षलवाद आणि माध्यमांची भूमिका
महा एमटीबी   09-Sep-2018

 

 

गुन्हेगारीचा किंवा दहशतवादाचा जर खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार्थी असे वृत्त जर माध्यमांमधून आले तर ते त्यांच्यासाठी ऑक्सिजनचं काम करते. हा खूप गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. यामुळे दहशतवाद्यांचे हेतू तर वाढतातच, मात्र त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेलासुद्धा भीती वाटते


 

गेल्या काही दिवसांमध्ये माध्यमांमधून विविध विषयांतून आलेल्या बातम्या ज्या पद्धतीने मांडल्या गेल्या, त्यामुळे कुठेतरी मनात अस्वस्थता वाटू लागली. देशाच्या विरोधात काम करणाऱ्या फुटीरतावादी शक्तींना ज्या वेळेला माध्यमे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतात, समर्थन दर्शवतात किंवा त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अशी चिंता वाटणे हे साहजिकच आहे. डावे समर्थक, उजवे समर्थक, माओवादी, दहशतवादी, नक्षलवादी, त्यातही पुन्हा ‘हिंदू दहशतवादी’, ‘इस्लामी दहशतवादी’ अशा सगळ्या शब्दांची रचनाच मुळात माध्यमांनी केलेली आहे असे आपल्या लक्षात येते. आपापल्या सोयीने, वेगवेगळ्या विषयांना माध्यमांमध्ये स्थान देण्यात येते आणि त्यातून लोकांमध्ये एकप्रकारे जनमत निर्माण करण्याचा प्रयत्न माध्यमांद्वारे केला जातो. अर्थात, ज्या वेळी आपण माध्यमांना ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ असे म्हणतो, त्या वेळेला ‘चौथा स्तंभ’ म्हणून आपली भूमिका माध्यमे योग्य रितीने बजावत आहेत की नाही याची वेळोवेळी चाचपणी करणे आवश्यक आहे. फक्त भारत नाही तर संपूर्ण जगामध्ये सध्या दहशतवादाने डोकं वर काढले आहे आणि त्यासमोर संपूर्ण मानवजातच लाचार झालेली दिसून येत आहे. जाती, धर्म, पंथ, वंश या नावांवरून अनेक दंगली घडतात. त्यातून अनेक उपद्रवी शक्ती डोकं वर काढतात आणि त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी शासनाची ताकद कमी पडते आहे, असे दिसून येते. यापूर्वी कधीच दहशतवादी शक्तींनी मानवतेच्या समोर एवढे मोठे आव्हान निर्माण केले नव्हते किंवा इतके मोठे संघटीत स्वरूप दिसत नव्हते, असे आपल्याला नक्कीच म्हणता येईल.

 

भारतीय दृष्टिकोनातून दहशतवाद आणि माध्यमांचा विचार

 

भारत हा खंडप्राय देश आहे आणि जिथे भारतीय वेगवेगळ्या भाषांतून, जातीतून, धर्मांतून आपापल्या संस्कृती आणि परंपरांबरोबर जगतात. तिथे कोणत्या ना कोणत्या कारणाने दहशतवाद हा फोफावतोच, असं आपल्याला म्हणता येईल. आपली जी लोकशाही आहे, ती उदारमतवादी आहे आणि ती उदारमतवादी असल्याने आणि इथे येणारे शासन हेसुद्धा वेगवेगळ्या जाती, धर्मावर आधारित असल्याने शासनालासुद्धा दहशतवादाविरोधात थेट भूमिका घेता येत नाही, असे आपल्याला लक्षात येते आणि त्यामुळे कुठे ना कुठे ही बेपर्वाही दहशतवादाला आणखी खतपाणी घालताना दिसते. अशा वेळेला भारतीय माध्यमांच्या भूमिकेवरती विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. खरंच भारतीय माध्यमे ही दहशतवादाच्या विरोधात कोणतीतरी भूमिका घेण्यासाठी सक्षम आहेत का? हा खूप मोठा प्रश्न आहे. भारतीय माध्यमांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, दहशतवादाची मांडणी नेमकी कशा प्रकारे करायची? म्हणजे ज्यावेळी आपण पाकिस्तानात जातो, त्यावेळी तिथल्या गुप्त संघटनांना नायकाच्या स्वरूपात दाखवले जाते आणि त्यांचे राजकारण हेच मुळात भारताच्या त्वेषाचे राजकारण आहे. तसेच पाकिस्तानात जी आता परिस्थिती आहे, त्यात लोकशाही कशी आणि किती दिवस राहणार? हाच खूप मोठा प्रश्न आहे. मात्र, भारतामध्ये तशी परिस्थिती नाही. भारतामध्ये अजूनही आपले स्थान आणि लोकशाही टिकून आहे. भारतामध्ये माध्यमांची परिस्थिती जर आपण बघितली, तर तिथे मुद्रितमाध्यमे विकसित झालेली आहेत असे आपण सांगू शकतो आणि इलेक्ट्रॉनिक आणि नवी माध्यमे अजूनही बाल्यस्वरूपात आहेत, असे आपण म्हणू शकतो. त्यांना परिपक्व होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे हे नक्की. अशा वेळेला दहशतवादासारख्या राष्ट्रीय प्रश्नांवरती माध्यमांच्या भूमिकेवरती विचार करणे आवश्यक आहे. माध्यमे काय आणि कशाप्रकारे दाखवतात, यासाठी सीमा निश्चित करणे आवश्यक आहे. ते त्यावेळी आणखी आवश्यक होते ज्यावेळेला पोलीस, सेना किंवा सुरक्षादल हे महत्त्वाच्या मुद्यावरती किंवा दहशतवादामध्ये थेट असा लढा देत आहेत. माध्यमांवरती सर्वात जास्त आरोप हाच होतो की, ते गुन्हेगारीला किंवा दहशतवादाला खूप जास्त glamorize करतात. त्याचा जो मोह आहे तो आवरत नाही. गुन्हेगारीचा किंवा दहशतवादाचा जर खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार्थी असे वृत्त जर माध्यमांमधून आले तर ते त्यांच्यासाठी ऑक्सिजनचं काम करते. हा खूप गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. यामुळे दहशतवाद्यांचे हेतू तर वाढतातच ; मात्र त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेलासुद्धा भीती वाटते, असे आपण नक्कीच म्हणू शकतो.

 

माध्यमे, माओवाद आणि नक्षलवाद

 

ज्या वेळेला नक्षलवादी कार्यांना माध्यमातून सहानुभूती दाखवली जाते, त्या वेळेला तो राष्ट्रद्रोह ठरतो हे कुठे तरी लक्षात घेणं गरजेचं आहे. खरं म्हणजे, आता या नक्षलवाद्यांना खूप मोठ्या प्रमाणावर चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचं आणि पर्यायाने माओवाद्यांचे समर्थन आहे. आपल्याला खरे नक्षलवादी कोण? माओवादी कोण? मार्क्सवादी कोण? हेच कळणार नाही इतकी मोठी संभ्रमावस्था यांच्या भूमिकेमुळे निर्माण होते. दुसरा प्रश्न असतो, तो सर्वसामान्य जनतेचे कितपत भले होते याचा. रॉबिन हूड यांच्या कथेप्रमाणे इथे संपत्तीचे समान वाटप कुठेच दिसत नाही, तर त्या नक्षलवाद्यांमध्ये मोठे म्होरके असतात. ते चांगले खुशाल जीवन जगतात किंवा त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांवर नेतेगिरी दाखवतात. मात्र, सर्वसामान्य लोकं यामध्ये चिरडले जातात, भरडले जातात. किंबहुना, आजपर्यंत नक्षलवाद्यांच्या, माओवाद्यांच्या कार्यवाहीमध्ये सर्वसामान्य लोकं मारले जातात, त्याच्या कित्येकपटीने हे सर्वसामान्य लोकं याचा बळी ठरले आहेत. तेव्हा यांना खरंच माध्यमांनी सहानुभूती दाखवणे योग्य आहे का? असा विचार माध्यमांनी करणे गरजेचे आहे. जेव्हा त्याच्यामुळे जी माध्यमे मानवतावादाच्या नावाखाली किंवा समान न्यायाची भूमिका पुढे करून हिंसाचार करणाऱ्या नक्षलवाद्यांना हे नायक ठरवतात, तेव्हा त्याचा विपरीत परिणाम हा देशावरती आणि व्यवस्थेवरती होत असतो. व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी आहेत, असतील; मात्र अशा देश विघातक कृत्यांना खतपाणी घालणे किंवा त्यांना सहानुभूती निर्माण करणे हे योग्य वाटत नाही.

 

माध्यमे आणि जनमत निर्मिती

 

माध्यमांचं खूप मोठं कार्य आहे ते म्हणजे जनमत निर्मितीचं. माध्यमांमधून वेगवेगळ्या विषयांवरती लिखाण केले जाते. सादरीकरण केले जाते. त्यांच्यातून लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची मतनिर्मिती केली जाते. तेव्हा माध्यमांना स्वतःची क्षमता ओळखून आणि अशा कोणत्याच प्रकारचे कार्य आपल्याकडून घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून दहशतवादाला, माओवादाला, नक्षलवादाला समर्थन मिळेल किंवा त्या विषयी सहानुभूती मिळेल. हे कुठे तरी माध्यमांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दहशतवादाविरुद्ध लढायला तयार आहेत, अशांची स्तुती ही माध्यमांमधून होणे आवश्यक आहे. त्यांना खरे नायक ठरवणे आवश्यक आहे. आपल्याला ज्या कोणी राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती दाखवली आहे, आपली जी गुप्तहेर संघटना आहे की ज्यांनी अनेक हल्ले हे निकामी ठरवले आहेत, त्यासंबंधी जे आहे ते माध्यमांमधून लोकांपर्यंत त्यांच्या प्रतिमा निर्मितीचे कार्य हे व्हायला पाहिजे आणि ते होत नाही हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. माध्यमांची भूमिका ही खूप प्रभावशाली झाली आहे. त्यामुळे माध्यमांची जबाबदारीसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कारण, कितीतरी लोकांच्या आशा या माध्यमांवर असतात आणि त्यांच्या इच्छांची पूर्तता करणे ही माध्यमांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर माध्यमांनी काय करावे आणि काय करू नये, यासंबंधीची शिस्त स्वतःला घालून घेणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण, ही माध्यमे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनासुद्धा एक स्थान निर्माण करून देतात किंवा लोकांच्या मतनिर्मितीचे काम करत असतात, हे आपल्याला दिसून येते.

 

देशद्रोह्यांशी लढा आणि माध्यमांची भूमिका

 

एकूण आपण सर्व विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येते की, सध्या नक्षलवाद, फुटीरवाद, माओवाद या विरुद्ध खूप मोठा लढा सुरू आहे आणि या लढ्यासाठी माध्यमांना स्वतःच्या भूमिकेचा विचार करणे आवश्यक आहे. फक्त असहमती दाखवून आणि अधिकारांचे नाव घेऊन देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सशस्त्र संघर्ष उभे राहतात. लोकशाहीवर विश्वास नाही, अशा कितीतरी शक्ती या सगळ्या गोष्टींचे समर्थन करताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे माध्यमांनी आपली स्वतःची भूमिका निश्चित करून राज्यातील शासनाला, केंद्र सरकारला, पोलिसांना, सैन्यदलांना, सशस्त्र दलांनाही पाठिंबा देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे फक्त मानवतावादाचे नाव पुढे करून आणि स्वतः माध्यमांमध्ये स्वतःचा ‘अजेंडा’ राबवणे हेसुद्धा चुकीचे आहे, याचासुद्धा विचार करणे आवश्यक झाले आहे. माध्यमांनी आपल्या बातम्यांमधून कोणाला पुढे आणावे, कोणाला मागे घ्यावे, कोणाला नायक करावे, कोणाला खलनायक करावे याचा कुठे तरी विचार करणे आवश्यक झाले आहे. असे जर झाले नाही, तर कदाचित संपूर्ण देशातील एकात्मतेला आणि देशाच्या सीमारेषांना एका खूप मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल आणि किंबहुना देशाचे तुकडेसुद्धा यातून होऊ शकतात. असे होऊ नये म्हणून माध्यमांनी जबाबदारीने वागणेच समाजहिताचे ठरेल.

 
 
-प्रा. गजेंद्र देवडा 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/