मन में हे ‘बिस्वास’
महा एमटीबी   09-Sep-2018

 


‘हम होंगे कामियाब एक दिन, मन हे विश्वास, पुरा हे विश्वास...’ या स्फूर्तीगीताचे शब्द तंतोतंत जगलेले, त्या शब्दांना सर्वार्थाने जागलेले ‘रामकृष्ण सेवा आश्रमा’चे ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेते सुधांशू बिस्वास...


एका ध्येयाने, एका ध्यासाने पछाडलेली अनेक माणसे आपल्या आसपास असतात. तसेच आपण आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही भावना मनात ठेवून अनेकजण स्वत:ला समाजकार्यात झोकून देतात. मात्र, प्रत्यक्ष कृती करायच्या वेळेस अनेकजण माघार घेतात. कारण, एखादं काम करायचं म्हटलं की, त्यासाठी त्याग आणि सर्वस्व अर्पण करणं आलंच. मात्र, आपल्या समाजात असे कितीतरी अवलिया आहेत, ज्यांनी समाजासाठी, देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, संपूर्ण आयुष्य वेचलं. या महान व्यक्तींची समाजाने दखल घेतली काय आणि नाही घेतली काय, यांना काहीही फरक पडत नाही. ते न थांबता, कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न ठेवता, त्यांनी निवडलेल्या मार्गाने ते मार्गक्रमण करत राहतात. एक ना एक दिवस त्यांच्या कामाची दखल या समाजाला व सरकारला घ्यावीच लागते. अशाच एका महान व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी आणि समाजासाठी अर्पित केलं आहे. सुधांशू बिस्वास असं त्यांचं नाव असून पश्चिम बंगालमधील कोलकात्याजवळ असलेल्या रामकृष्णपूर येथे ते राहतात. त्यांच्या त्यागाचा, समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारचा यावर्षीचा मानाचा ‘पद्मश्री पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, हा पुरस्कार त्यांना त्यांच्या वयाच्या ९९व्या वर्षी प्रदान करण्यात आला असून आजही या वयात त्यांनी त्यांच्या कामाचा वसा सोडलेला नाही.

 

महान स्वातंत्र्यसेनानी बेनी मधाब दास, बीना दास आणि कल्याणी दास यांच्या हाताखाली शिक्षण घेतलेले सुधांशू यांना लहानपणापासून देशसेवा व समाजसेवेचे बाळकडू मिळाले. तसेच त्यांचे आईवडील ‘रामकृष्ण मिशन’शी जोडले गेले होते. यामुळे त्यांच्यावर शिस्त, देशसेवा, समाजसेवा आणि साधेपणाचे संस्कार झाले. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी घरच्यांनी त्यांना कोलकात्याला पाठवले. त्यांच्या घरच्यांची इच्छा होती की, आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन नोकरी करावी. परंतु, त्यांना काय माहिती होते की, शहरात गेल्यावर मुलाच्या जीवनाची दिशाच बदलून जाईल आणि आपला मुलगा देशासाठी-समाजासाठी सर्वस्व वाहून घेईल. सुधांशू बिस्वास ज्यावेळी कोलकात्याला पोहोचले, त्या दिवसांत संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य चळवळींचा रणसंग्राम चालू होता. कोलकाता शहरासह अखंड भारतात ‘वंदे मातरम्’ आणि ‘चले जाव’चे नारे ऐकू येत होते. शाळेत गेल्यानंतरही त्यांना याच गोष्टी दिसायच्या आणि ऐकू यायच्या. कारण सामाजिक आणि राजकीय उलथापालथीचे कोलकाता शहर हे केंद्र बनले होते. स्वातंत्र्य सेनानी बेनी मधाब दास, बीना दास आणि कल्याणी दास हे त्यांचे शिक्षक होते. त्यामुळे शाळेच्या परिसरामध्ये सतत सभा आणि चर्चा होत असायच्या. याचा परिणाम जो अपेक्षित होता तोच झाला आणि सुधांशू यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सक्रिय सहभाग घेत अनेक वेळेस तुरूंगवास भोगला व पोलिसांचा मारदेखील खाल्ला. स्वातंत्र्य लढ्याच्या या काळात त्यांना महात्मा गांधी आणि अनेक मोठ्या नेत्यांचा सहवास लाभला. भारत स्वतंत्र होण्यात त्यांनी आपला खारीचा वाटा उचलला होता.

 

भारत स्वतंत्र झाला आणि इंग्रज देशातून गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की, देशातून इंग्रजांना हद्दपार करणं एवढं एकच काम नव्हतं, तर एक देश म्हणून भारताचा अनेक गोष्टीने विकास होणे गरजेचे होते. गरिबी, बेरोजगारी, अज्ञान अशा अनेक समस्यांनी देशाला ग्रासलं होतं, यासाठीदेखील काम करायला पाहिजे, असं त्यांच्या लक्षात आले. याच काळात ते १९४८ साली पुन्हा ‘रामकृष्ण मिशन’च्या संपर्कात आले. यावेळी त्यांना जीवनाचे सार समजून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आणि मनी निश्चय करून ते पुढील साधनेसाठी हिमालयात गेले. त्याठिकाणी त्यांनी एक दशकभर साधना केली. या काळात त्यांनी समाजातील गरजा समजून घेतल्या आणि आपण यावर काम करायला हवं, असा निश्चय करून ते पुन्हा कोलकात्याला परतले. समाजाला अज्ञानातून बाहेर काढायचे असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी नेमकं हेरलं होतं. त्यामुळे कोलकात्याला पोहोचल्यानंतर त्यांनी गरीब आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी काम करायचे ठरवले. यासाठी पैशांची आवश्यकता लागणार असल्याने त्यांनी स्वतः व्यवसाय सुरू केला आणि मिळालेल्या पैशांतून गोरगरीब मुलांसाठी शाळा सुरू केली. या शाळेला त्यांनी ‘रामकृष्ण सेवा आश्रम’ नाव दिले आणि देशाची सेवा केल्यानंतर इथून त्यांचा समाजसेवेचे कार्य सुरू झाले. सध्या कोलकात्यामध्ये ‘रामकृष्ण सेवा आश्रमा’च्या १८ शाळा आहेत. या ठिकाणी अनेक मुलांना शिक्षण दिले जाते. सोबतच त्यांच्या या आश्रमामध्ये मुलांसाठी राहण्या-खाण्याची मोफत व्यवस्थाही उपलब्ध आहे. एवढंच नाही, तर सुधांशू बिस्वास हे आयुर्वेदाचे गाढे अभ्यासक असून परिसरातील गावातल्या गरिबांना मोफत औषधे पुरवण्याचेही काम ते करतात. देशासाठी, समाजासाठी संपूर्ण आयुष्य देणाऱ्या या थोर स्वतंत्र सेनानी व समाजसेवकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/